वैद्यकीय अधिकाऱ्याचा जळालेल्या कारमध्ये आढळला मृतदेह
X
नाशिक - गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. तर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह कारमध्ये आढळून आल्याने नाशिक जिल्हा हादरून गेला आहे.
प्रजासत्ताक दिनानिमीत्त देशात उत्साहाचे वातावरण असतानाच नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह कारमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिकमधील वेल्होळी परिसरात एक कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली. तर त्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. तर त्या मृत झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव डॉ. सुवर्णा वाजे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर त्या गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होत्या. मात्र मंगळवारी रात्री ऊशीरा वेल्हाळे परिसरात जळालेल्या कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
डॉ. सुवर्णा वाजे या नाशिक महापालिकेच्या स्वामी समर्थ रुग्णालयात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या. तर तीन दिवसांपुर्वी सायंकाळी साडेचार वाजता घरातून सुवर्णा वाजे कामावर गेल्या होत्या. मात्र रात्री नऊ वाजले तरी सुवर्णा वाजे घरी न आल्याने बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीने सुवर्णा वाजे यांना मेसेज केला. मात्र पत्नीच्या मोबाईलवरून मी कामात आहे. येण्यासाठी वेळ लागेल, असा रिप्लाय आला. त्यानंतर काही वेळाने सुवर्णा वाजे यांचा मोबाईल स्विच ऑफ लागला. तेव्हा पतीने पोलिसात तक्रार दाखल केली. तर रात्री ऊशीरा सुवर्णा वाजे यांची चारचाकी विल्होळी परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळून आली. तसेच गाडीत सुवर्णा वाजे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासातूनच या प्रकरणाचे कोडे उलगडणार आहे. मात्र परिसरात हा घातपात की अपघात अशा चर्चांना उधाण आले आहे. तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून लवकरात लवकर आरोपीला गजाआड करावे, अशी मागणी महापालिकांनी केली आहे.