#Bullibai प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश, गृहराज्य मंत्र्यांनी दिली माहिती
X
#bullibai प्रकरणात मुंबई पोलिसांना तपासात मोठा ब्रेकथ्रू मिळाला आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्विट करून तशी माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी bulli app वर मुस्लिम समाजाच्या महिलांचे फोटो लावून बोली लावण्याचा प्रकार घडला होता. त्याच प्रकरणी देशभरातील महिला नेत्यांनी आवाज उठवला होता.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पुरावे पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांना सुपूर्द केल्याचं म्हटले होते. त्याच अनुषंगाने मुंबई पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे. आता या तपासात मुंबई पोलिसांना नवी लीड मिळाली आहे. पण भविष्यात तपासात कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी ही माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. सुल्ली डील बुल्ली बाई प्रकरणातील पीडितांना लवकरच तपास पूर्ण होईल आणि सर्व आरोपी कायदेशीर कारवाईला सामोरे जातील असं आश्वासन राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिलं आहे.
सतेज पाटील यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे,"#बुल्लीबाई प्रकरणाचे अपडेट:
मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. जरी आम्ही सध्या तपशील उघड करू शकत नाही कारण त्यामुळे चालू तपासात अडथळा येऊ शकतो, मी सर्व पीडितांना आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही गुन्हेगारांचा सक्रियपणे पाठलाग करत आहोत आणि त्यांना लवकरच कायद्याला सामोरे जावे लागेल."
Update on #BulliBai case:@MumbaiPolice has got a breakthrough.Though we cannot disclose the details at this moment as it may hamper the ongoing investigation, I would like to assure all the victims that we are proactively chasing the culprits & they will face the law very soon.
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) January 3, 2022
काय आहे bulli bai प्रकरण?
सुल्ली डील Sulli deals वादानंतर मुस्लिम महिलांना पुन्हा एकदा टार्गेट केलं जात आहे. शनिवारी 1 जानेवारी शेकडो महिलांचे फोटो एका अज्ञात ग्रुप द्वारे Github चा वापर करून बुल्ली बाई Bulli Bai नावाच्या अँप वर अपलोड करण्यात आले आहेत.
यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचं म्हटलं आहे. तसेच या संदर्भातील सर्व डिटेल्स महाराष्ट्रातील सायबर टीमला दिल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.
सहा महिन्यांपूर्वी सुल्ली डीलचं प्रकरण समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये आणि दिल्लीमध्ये यासंदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
"सुल्ली" भावना भडकावण्याचा प्रयत्न
सुल्ली या शब्दाचा संदर्भ 'सुल्ला' या मुस्लिम समाजाशी असून या समाजामध्ये हा शब्द अत्यंत संतापजनक मानला जातो. तर 'बुल्ली बाई' हे त्याचं एक बदललेलं रूप मानलं जात आहे. द वायरच्या पत्रकार इस्मत आरा यांचं नाव देखील या ॲपमध्ये आहे. सुल्ली डील ॲपमध्ये लेखिका नबीया खान यांच्याही फोटोचा समावेश आहे. एकंदरीत या सर्व प्रकरणावर सोशल मीडियावर अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.