स्त्रियांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ काळाची गरज
Mental , physical, health , women, maxwoman
X
आपण म्हणतो ‘नारी नारायणी’, 'बाईपण भारी देवा' हे सगळं म्हणायला, वाचायला सोपं. पण हे सत्यतेत तेव्हाच येईल जेव्हा स्त्रीचं मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम असेल. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. स्त्रीचे मानसिक व शारीरिक आरोग्य निरोगी असले तरच ती चांगले कुटुंब घडवू शकेल. त्यातूनच चांगला समाज घडेल. स्त्रीचं जीवन म्हणजे तारेवरची कसरत असते. कुटुंबाची जबाबदारी तिला अतिशय शिकस्तीने पार पाडावी लागते. घरातील वडीलधारकांसाठी स्वतःच्या जीवाचा आटापीटा करते. परिवाराच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता ती स्वतःच तन-मन हरपून टाकते. देवाने स्त्रीला प्रेम, वात्सल्य, त्याग ह्या गुणांनी परिपूर्ण बनवले आहे. या गुणांचा इतरांवर वर्षाव करता करता ती स्वतःला इतके विसरून जाते की स्वतःचं मानसिक व शारीरिक स्वास्थ्य हरवून बसते.
प्रत्येक स्त्रीने कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळता-सांभाळता स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. योगा, मेडिटेशन, आहाराचा समतोल, निसर्गासोबत राहणे, निसर्गाचा आनंद घेणे, निरनिराळे छंद जोपासणे ज्यामुळे मानसिक शांती, समाधान प्राप्त होईल. काही शारीरिक पीडा असल्यास वेळेत योग्य वैद्यकीय सल्ला घेणे. स्वतःच्या मनाची, शरीराची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. कारण, मनाच्या आरोग्यावर शरीराचे आरोग्य अवलंबून असते. स्त्रीचे मन दुखी असते तेव्हा तिला सतत काहीतरी वेदना जाणवतात. कधी डोकं दुखणे, हातपाय दुखणे, अस्वस्थ वाटणे. तेच मोकळ्या हवेत फिरायला गेले, संगीत, नृत्य, चित्रपट बघणे, गप्पा मारणे अशा आनंददायी गोष्टींमुळे मानसिक समाधान लाभते आणि सतत काहीतरी दुखत असल्याची किरकिर बंद होते. म्हणूनच मानसिक स्वास्थ्य चांगले, निरोगी असले कि शारीरिक स्वास्थ्यही निरोगी राहते. सर्व स्त्रीयांनी मनाची व शरीराची काळजी घेतलीच पाहीजे.
स्त्री ही कुटुंबाचा, भक्कम घराचा पाया असते. हा पाया असेल तरच कुटुंबरूपी इमारत भक्कम उभी राहू शकते. म्हणूनच स्त्रीचं मन प्रसन्न असेल तर शरीर निरोगी राहील,पण कुटुंबातील, समाजातील लोक हा विचार करत नाही. स्त्री कितीही शिकली, जग कितीही बदलले तरीही स्त्रीवर होणारे मानसिक व शारीरिक अत्याचार, स्त्रीचं मानसिक खच्चीकरण या गोष्टी बंद होत नाही. एक गृहिणी पूर्ण घर सांभाळते. घरातील सर्वांची काळजी घेते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणाला काय हवे नको ते बघते. मुलांवर संस्कार करते. सर्वांना प्रेमाने सांभाळते तरीही तिला घरातील सदस्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते.
कारण ती फक्त घरातच काम करते.
घरातील पुरुषप्रधान संस्कृती तिचा वारंवार अपमान, मार जोड, शिवीगाळ, तिच्या माहेरच्यांचा अपमान अशा गोष्टी करून तिच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याची हानी करतात. त्यामुळे अशा अत्याचारा विरोधात स्त्रीने लढले पाहिजे आणि स्वतःला जपले पाहिजे. गृहिणींना समाजात व कुटुंबात मानाची वागणूक कधीही मिळत नाही कारण ती फक्त घर काम करते. तिच्या कामाचा कुठलाही मोबदला मिळत नाही. तिचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्यांना हेच माहीत नसते तिचे घरकाम म्हणजे कुटुंबाला तिने दिलेली सेवा असते आणि तिच्या सेवेमुळे कुटुंब उभे असते. हे सगळं थांबविण्यासाठी व स्वतःचे स्वास्थ जपण्यासाठी स्त्रीने जागरूक असले पाहिजे. स्त्रीचा छळ करून तिची मानसिक व शारीरिक अवस्था खराब करणाऱ्या कुटुंबकंटक लोकांना एक वेळ कायदा माफ करेल पण देव माफ करणार नाही.
स्त्री गृहीणी बनून कुटुंब सांभाळते तेव्हा तिला वारंवार घरातील पुरुषांकडून ऐकवले जाते. ‘मी कमवतो, तुला खाऊ घालतो, माझ्यामुळे घर चालते. अशी अहंकाराची भाषा तिला ऐकावी लागते, आणि त्या स्त्रीला मग डिप्रेशन, भित्रेपणा, मानसिक संतुलन हरविणे या गोष्टींचा सामना करावा लागतो. या सर्व गोष्टींपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी स्त्रीला सक्षम झालं पाहिजे. निसर्गनियमानुसार स्त्रीच्या शरीराला झीज जास्त असते. तिला प्रजनन प्रसुतीचे कार्य करावे लागते. त्यात तिची शारीरिक झीज होते. त्यामुळे स्त्रीने स्वतःच्या आहाराकडे नीट लक्ष दिले पाहिजे. जीवनसत्वयुक्त पौष्टिक आहार घेतला पाहिजे तेव्हाच ती स्त्री सक्षम बनून श्यामच्या आईने घडविलेला श्याम, जिजाबाईंनी घडवलेला शिवाजी, या देशाचा चांगला नागरिक, डॉक्टर, इंजिनिअर, पंतप्रधान घडवू शकेल. स्त्रीने कोणत्याही दडपणाखाली जीवन न जगता स्वच्छंद मनाने, माधुर्याने जीवन जगले पाहिजे.
आज स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन प्रत्येक क्षेत्रात आपली मोलाची कामगिरी बजावतात. त्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी कुटुंबासोबत समाजानेही हातभार लावला पाहिजे. अगदी लष्करात युद्धाच्या मैदानापासून तर विमान, रेल्वेगाडी ते देशाच्या पंतप्रधान, संशोधक, उत्तम आई, उत्तम गृहिणी यात याच स्त्रिया आघाडीवर आहे. त्यांचे स्वास्थ उत्तम, सुदृढ, निरोगी राहणे हे अत्यंत आवश्यक आहे. स्त्रीने कुणावरही अवलंबून न राहता स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. पुरेशी झोप, योग्य आहार, रोज व्यायाम, मेडिटेशन, स्वच्छ मन कर्तव्याची निष्ठा या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्य कसे ठेवता येईल याचा विचार केला पाहिजे.
स्त्रीची मानसिक कमजोरी शारीरिक कमजोरी बनते. त्यापासून सावध राहिले पाहिजे. स्त्रियांनी जास्तीत जास्त मैदानी खेळ तसेच क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, बास्केटबॉल यात सहभाग घेतला पाहिजे. ताण तणावापासून जास्तीत जास्त दूर राहावे. मनाचा आणि शरीराचा अगदी जवळचा संबंध असतो. स्त्रियांचे मन खराब असले तर जीवनातल्या चांगल्यात चांगल्या गोष्टी त्यांना खराब वाटतात. स्त्रियांचे मन जेव्हा घाबरलेले असते तेव्हा त्या स्त्रिया कुठलेही काम नीट करू शकत नाही. स्त्रियांनी मनाचं आरोग्य परिपक्व ठेवण्यासाठी सात्विक आहार घेतला पाहिजे.
सात्विक आहारामुळे स्त्रियांचे विचार सात्विक आणि सकारात्मक बनण्यास मदत होते. स्त्रियांचे विचार करण्याची शक्ती नेहमी मजबूत असली पाहिजे. हेच मजबूत विचार कुठल्याही शारीरिक समस्येसोबत लढण्यात यशस्वी ठरतात. स्त्रियांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे शरीराला आपण जितके हलविले तेवढे ते मजबूत बनते आणि मनाला जेवढे स्थिर ठेवले तेवढे ते मजबूत बनते म्हणून मन स्थिर आणि एकाग्र असले पाहिजे. मनाला भटकण्यापासून थांबविले पाहिजे. स्त्रियांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ जपले जाईल, त्याचा योग्य विकास होईल तेव्हाच स्त्रिया त्यांची स्वप्न पूर्ण करून शकतील. कारण ती स्वप्न पूर्ण करण्याची ताकद स्त्रियांमध्ये असते. स्त्री नोकरी करणारी असो किंवा गृहिणी ती भाग्यवानच असते तिच्या पंखांमध्ये सर्व स्वप्ने साकार करण्याचं बळ असतं.
नारी तुम नारायणी हो, ये कभी मत भुलना,
एहमियत खुद की तुम हमेशा याद रखना,
सच मे जैसे हो बहोत बढीया हो,
इस बढियापन को मत भुलना,
नारी तुम नारायणी हो, ये कभी मत भुलना,
आरोग्यंधनसंपदा का द्वीप हमेशा जलाना,
अपने स्वास्थ्य की एहमीयत तुम हमेशा याद रखना,
नारी तुम नारायणी हो, ये कभी मत भुलना ||
- लेखिका- मंगला रविंद्र शिरोळे