MAHARASHTRA LOCKDOWN: सर्वपक्षीय बैठकीनंतर काय आहेत राज्यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया?
कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाला रोखण्यासाठी (ब्रेक द चैन) राज्यात 8 किंवा 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या सर्वपक्षीय बैठकीत वर्तवली आहे.
X
करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत लॉकडाऊनचा अंतिम निर्णय घेण्यात आला नसून कडक लॉकडाऊनची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. लॉकडाऊनचा अंतिम निर्णय दोन दिवसात घेतला जाणार आहे. या बैठकीत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तज्ज्ञांच्या मतांशी मी सहमत आहे.असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी कारण ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य द्यावेच लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
उद्या प्रशासकीय अधिकारी आणि टास्क फोर्सच्या बैठकीनंतर लॉकडाऊनच्या संदर्भात घोषणा केली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी लॉकडाऊन बाबत आपली भूमिका मांडली.
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस...
संपूर्ण लॉकडाऊन करताय तर जनतेसाठी काय प्लान आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. संपूर्ण लॉकडाऊनला भाजपाचा विरोध असल्याचं सांगत जनतेची, व्यापाऱ्यांची परिस्थिती लक्षात घ्या. मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा विचार करावा. कोरोना रिपोर्ट (आरटीपीसीआर) तात्काळ कसे मिळतील? याची उपाययोजना करा. मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी मंत्र्यांना समज द्यावी. छोट्या उद्योगांना पर्याय दिला पाहिजे. खासगी स्तरावर रेमडेसिव्हिर मिळत नाही गंभीर बाब आहे. ऑक्सिजन आणि बेडची संख्या वाढवावी. आरोग्य व्यवस्था तात्काळ उभ्या कराव्या लागतील असे मुद्दे फडणवीस यांनी बैठकीत मांडले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार
करोना मोठ्याप्रमाणात वाढत असल्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं गरजेच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील त्याला माझे समर्थन असल्याच पवार यांनी म्हटलं आहे.
…तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.
लॉकडाऊनला भाजपाचा विरोध नाही. परंतु करोना नियंत्रणात आणता-आणता सर्व सामान्य भूकेने मरणार नाहीत.याचा विचार सरकारने केला पाहिजे. छोट्या उद्योगांचाही विचार करणं गरजेचं आहे. लॉकडाऊन लावायचा असेल तर जनतेला मदत जाहीर करा. तसेच जनता-व्यापारांच्या खात्यावर पैसे टाका आणि मगच लॉकडाऊनचा विचार करा असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख सांगतात की,
सरकारसमोर लोकांचा जीव कसा वाचवायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे? सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्री निर्णय घेतील. लॉकडाऊनच राजकारण करु नये. लॉकडाऊन टाळण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र लॉकडाऊन लावणं आवश्यक आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
या बैठकीत करोनावर नियंत्रण आणण्यासाठी गंभीर चर्चा झाली असं दरेकर यांनी सांगितलं आहे. भाजपची भूमिका सर्व सामान्यांच्या हिताची आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या आर्थिक विवंचना बघून आणि टास्क फोर्सचा विचार घेऊन सरकारने निर्णय घ्यावा.
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सुचना मांडल्या.