लता मंगेशकर यांच्या निधनाने देशात दोन दिवसांचा राष्टीय दुखवटा जाहीर
X
लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वजदेखील दोन दिवस अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच आता ब्रीच कँडीतून लतादीदींचे पार्थिव त्यांच्या पेडररोडवरील घरी काही काळ ठेवलं जाणार आहे.
दोन दिवसाच्या राष्ट्रीय दुखवट्यात सर्व शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही लतादीदींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एका युगाचा अस्त झाल्याची भावना सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली आहे
राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यानंतर काय प्रकिया असते..
ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला जातो.
राष्ट्रपती राष्ट्रध्वज किती दिवस अर्ध्यावर राहणार याचा निर्णय घेतात.
पार्थिवास मानवंदना देऊन पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात येतं.
राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यानंतर सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येतं.
अंत्यसंस्कारावेळी मानवंदना म्हणून बंदुकांची सलामी देण्यात येते.