Home > News > क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे वृद्धापकाळाने

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील यांचे वृद्धापकाळाने  निधन
X

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर कराड मधील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावर विटा जवळील हणमंतवडिये या गावात शासकीय इतमामत अंत्यसंस्कार होणार आहे. क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांनी देखील वडिलांप्रमाणेच स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेत अभूतपूर्व कामगिरी केली होती. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी वंचितांना न्याय देण्यासाठी आपला लढा सुरूच ठेवला होता. आयुष्यभर त्या गोर,गरीब वंचितांसाठी झटत राहिल्या. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून हौसाताई पाटील यांनी काही काळ समाजकारण व राजकारणातही सहभाग घेतला. पुरोगामी चळवळीच्या आधारस्तंभ म्हणून हौसाताई पाटील यांची ओळख आहे. हौसाबाई पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सोबत काही काळ स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता.

हौसाताई पाटील यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी निर्भीडपणे लढा उभारला होता. क्रांतीकारांना आवश्यक असणारा शस्त्रपुरवठा करण्याचं काम तरुण काळात हौसाताई यांनी केले होते. इंग्रजांविरोधातील लढ्यात पत्री सरकारमधील कार्यकर्त्यांनी विविध प्रकारची सोंग, वेषांतर करून इंग्रज सरकारला जेरीस आणलं होतं. इंग्रजांनी ठिकठिकाणी उभारलेले डाक बंगले जाळणं असो, रेल्वेचे रूळ उखाडणे असो, फोनच्या तारा तोडणं असो वा इंग्रजांचा खजिना लुटणं असो, या सर्वच गोष्टीमध्ये हौसाताई आघाडीवर असायच्या. भवानीनगर रेल्वे स्थानकावर इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी वेषांतर करून हौसाताईंनी योजना आखली आणि ती योजना त्यांनी यशस्वी करून दाखविली. हौसाताईंना देशभक्तीचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. क्रांतीसिंह नाना पाटलांची एकुलती एक मुलगी असलेल्या हौसाबाई 3 वर्षांच्या असतानाच त्यांच्यावरील आईचं छत्र हरवलं. देशवसेवेचा वसा घेतलेल्या वडिलांचा सहवासही त्यांना पुरेशा प्रमाणात मिळाला नाही. स्वातंत्र्य लढ्यासाठी वडील भूमिगत राहत असल्यामुळे हौसाबाई अत्यंत खडतर परिस्थितीत जीवन जगावं लागलं. मात्र देशभक्तीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं असल्याने त्यांनी या स्वत:ला झोकून दिलं. इंग्रजांच्या नजरा चुकवून भूमिगत असलेल्या कार्यकर्त्यांना निरोप पोहोचवणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, पत्रीसरकारला लागणाऱ्या हत्यारांची ने-आण करणे, अशी कामं त्यांनी केली.त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

Updated : 23 Sept 2021 9:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top