Home > News > मुलाचं हे अनोखं गिफ्ट पाहून आईला आनंदाश्रू अनावर

मुलाचं हे अनोखं गिफ्ट पाहून आईला आनंदाश्रू अनावर

आईला 50 व्या वाढदिवशी मुलाचे आनोखे गिफ्ट

मुलाचं हे अनोखं गिफ्ट पाहून आईला आनंदाश्रू अनावर
X

आईने दुसच्यांची मोलमजूर करून शिक्षण दिले. आईने आयुष्यात स्वतःसाठी काहीही न करता नेहमी फक्त मुलांचा विचार केला. अनेक अडचणींना सामोरं जात मोठं केलं, त्या आईला तिच्या 50 व्या वाढदिवशी मुलाने चक्क हेलिकॉप्टर मध्ये बसवत अनोखी भेट दिली आहे. मुलाचं हे अनोखं गिफ्ट पाहून आईला आनंदाश्रू अनावर झाले. उल्हासनगरच्या प्रदीप गरड यानं त्याच्या आईला दिलेल्या या अनोख्या गिफ्टची सर्वत्र मोठी चर्चा सुरू आहे.

रेखा दिलीप गरड या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत. लग्नानंतर त्या उल्हासनगर या ठिकाणी आल्या. मुलगा लहान असतानाच पतीचे अचानक निधन झाले. त्यानंतर मुलाची सर्व जबाबदारी त्यांनी एकट्याने पार पाडली. लोकांच्या घरी धुणीभांडी करून त्यांनी मुलांना शिकवले. मोठा मुलगा प्रदीप याने अतिशय जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीला लागला. एक दिवस घरावरुन हेलिकॉप्टर गेलं. यावेळी आपल्याला कधी यात बसायला मिळेल? असं त्यांच्या आईने सहज म्हंटल होत. ती गोष्ट प्रदीपच्या मनात पक्की बसली. पुढे नोकरीत प्रगती करत प्रदीप हा आई आणि कुटुंबाला घेऊन चाळीतून स्वतःच्या फ्लॅटमध्ये आला. लग्न झालं, दोन मुलं झाली, पण आईची इच्छा पूर्ण करायचे तो विसरला नव्हता. अखेर आईच्या 50 व्या वाढदिवसाला तिला सरप्राईज म्हणून आज सकाळी वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं असल्याचं सांगत आईला थेट जुहू एअरबेसला नेलं.

तिथं हेलिकॉप्टर पाहून आईला आनंदाश्रू आवरता आले नाहीत. आईसह प्रदीप, प्रदीपचं लहान भाऊ संदीप, प्रदीपची पत्नी, मुलं यांनीही हेलिकॉप्टर राईडचा आनंद घेतला. ज्या आईने आपल्याला बोट धरुन चालायला शिकवलं, त्याच आईची इच्छा पूर्ण करत तिला घेऊन हेलिकॉप्टरने आकाशाला गवसणी घालणारा प्रदीप गरड हा आजच्या युगातला श्रावणबाळच म्हणावा लागेल त्यामुळेच असा मुलगा सगळ्यांना मिळो अस म्हणत त्यांचे आनंदअश्रू अनावर झाले.

Updated : 18 Aug 2021 11:11 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top