Home > News > मातीवरच्या निष्ठेमुळेच तिची वादळांवर मात...

मातीवरच्या निष्ठेमुळेच तिची वादळांवर मात...

प्रत्यक्ष शेती कामाचा कुठलाही अनुभव नसताना कुटुंब चालविण्यासाठी मुक्ताबाईंनी शेतीचा मार्ग निवडला. शेतीकाम करण्यापासून ते बैलगाडीने शेतमालाची विक्री करून कुटुंब उभारणी करणार्या मुक्ताबाईंची ही कथा...

मातीवरच्या निष्ठेमुळेच तिची वादळांवर मात...
X

मानूर येथील माहेर असलेल्या मुक्ताबाईंचा 1978 मध्ये एकलहरे येथील रामदास डुकरे- पाटील यांच्याशी विवाह झाला. पती रामदास हे त्या वेळी महावितरण मध्ये चतुर्थश्रेणी कामगार म्हणून नोकरीस होते. त्यांच्या अल्प पगारातून मुलांचे शिक्षण आणि कुटुंबखर्च भागणेही मुश्‍किल होते. घरी शेती होती पण नोकरीमुळे घरच्या शेतीत त्यांना जास्त वेळ देणे शक्य नव्हते. त्यावेळी मुक्ताबाईंनी शेतीसाठी पुढाकार घ्यायचे ठरवले. माहेरी प्रत्यक्ष शेती कामाचा कोणताही अनुभव त्यांना नव्हता. अनुभव नसल्याने पती रामदास यांच्याकडून त्या कामे शिकत गेल्या. सुरूवातीला दुध व्यवसायाचे काम जास्त होते. त्यामुळे मुक्ताबाईंनी आधी शेळीचे दूध नंतर गायीचे व पुढे म्हशीचे दूध काढण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यावेळी त्यांची साडेसात एकर एकर जमीन होती. त्यात गहू, हरभरे कांदे ही सर्व पिकं घेतली जात. हळूहळू मुक्ताबाई सर्व कामं शिकत गेल्या. पती कामावर गेल्यानंतर शेतीची सर्व जबाबदारी मुक्ताबाई सांभाळून घेत. पिकाची काढणी झाल्यानंतर पती रामदास क्रेट भरून सायकलवर विक्रीसाठी घेऊन जात. उद्या शेतात काय करायचं याचं नियोजन त्या रात्रीच रामदास यांच्यासोबत करून घेत. त्यावेळी शेतीतील जास्त उपकरणे नसल्याने बरीचशी कामे स्वतः हाताने करावी लागत. नंतर शेताला पाण्यासाठी विहीरीचे काम सुरू केले. त्यावेळी मजुरांची कमतरता असल्याने मुक्ताबाई स्वतः मजुरासोबत कामं करत. त्यावेळी घर आणि शेतमळा यांच्यातील अंतर जास्त असल्याने खूप गैरसोय होत होती. त्यामुळे विहीरीचे काम सुरू असतांना त्यातून निघालेल्या दगडांचा वापर करुन त्यांनी मळ्यात घर बांधण्याचा निर्णय घेतला. प्रसंगी स्वतः या घरासाठी दगडं फोडून घराचे बांधकाम केले. घरासाठी एकदा वाळू कमी पडत असताना त्या गर्भवती असताना सातव्या महिन्यात त्यांनी नदीवरून वाळू वाहून आणली. हे प्रसंगच त्यांना जास्त बळकटी देत होते.

हळूहळू शेतीतील नवनवीन प्रयोगांचा विचार त्या करू लागल्या. मुक्ताबाईंच्या माहेरी द्राक्षशेती केली जात. ते पाहून आपल्या शेतीतही त्यांनी द्राक्षबाग लावण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला उत्पन्न कमी पडत असल्याने मुक्ताबाई आजूबाजूच्या शेतावर रोजाने काम करायला जात. त्यातून थोडी आर्थिक मदत तर व्हायची पण द्राक्षशेतीतील त्यांचा अनुभव वाढत गेला. हे सगळं करत असताना घर आणि शेती या दोन्ही जबाबदार्या मेहनतीने त्या सांभाळत होत्या. सोबत तीन मुलं असून त्यांचेदेखील शिक्षण चालू होते. शेती करत असताना शेतमालाच्या विक्रीचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. घरात एक बैलगाडी होती. तिच्या सहाय्याने त्या शेतमाल विक्रीसाठी बाहेर पडू लागल्या. लहान मुलाला घेऊन या बैलगाडीतून त्या मालाची वाहतूक करत. एकदा पाऊस जास्त झाल्याने वाटेल चिखलात गाडीचे चाक फसले. तसेच पाण्यातून गाडी जात असल्याने बैल पाण्यावर तरंगू लागले. त्यावेळी आपली हिम्मत न हारता त्यांनी त्या प्रसंगावर मात केली. असे अनेक कठीण प्रसंग या प्रवासात आले होते ज्याच्यावर त्यांनी जिद्दीने लढा दिला. पुढे शेतीतून चांगले उत्पन्न येत गेले. शेतीत जेव्हा उत्पन्न येत होते तेव्हा मुक्ताबाई त्याचे सोनं घेऊन गुंतवणूक करत. वेळप्रसंगी भांडवलाची गरज पडल्यास त्याचा उपयोग होत. साडेसात एकरवरून आज 10 एकरवर जमीन वाढवली आहे. मुलांना मोठे करून उच्चशिक्षित करण्याचे मुक्ताबाईंचे स्वप्न होते. आज मोठा मुलगा डॉक्टर असून लहान मुलगा शेतीची जबाबदारी सांभाळत आहे तसेच मुलगी महावितरण मध्ये नोकरीस आहे. आज शेतीत द्राक्षांची निर्यात केली जात आहे. द्राक्षासोबत टोमॅटो, भात, भाजीपाल्यात काम चालू आहे. मुक्ताईच्या जिद्दीची ही कथा इथेच थांबत नाही. आयुष्यभर नीट निगुतीने केलेला संसार आणि कष्टाने केलेल्या शेतीमुळे चित्र पालटले आहे. परिस्थिती कितीही बिकट असो आपल्याला ठामपणे उभे राहता आले पाहिजे. हिंमत, चिकाटी आणि सातत्य असेल तर दिवस बदलल्याशिवाय राहत नाही हाच संदेश मुक्ताताईंची ही कथा देते. या नवदुर्गेला सलाम!

Updated : 30 Sept 2022 8:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top