Home > News > पोषण ट्रॅकरमुळे अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन, भत्ता थेट बँक खात्यात जमा होणार

पोषण ट्रॅकरमुळे अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन, भत्ता थेट बँक खात्यात जमा होणार

अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा प्रोत्साहन भत्ता थेट बँक खात्यात, महिला बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर यांची माहिती

पोषण ट्रॅकरमुळे अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन, भत्ता थेट बँक खात्यात जमा होणार
X

पोषण ट्रॅकरचे काम उत्कृष्ट पद्धतीने केल्याने राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता थेट बँक खात्यात लवकरच जमा केला जाईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली आहे. यासाठी सुमार ५१ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

३६ जिल्ह्यातील ५५३ तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना या निर्णयामुळे अनुक्रमे प्रत्येकी ५०० रु आणि २५० रु दरमहा प्रोत्साहन भत्ता मागील थकबाकीसह उपलब्ध होणार आहे. १ एप्रिल २०२१ ते ३१. ऑक्टोबर २०२१ या ७ महिन्यांच्या कालावधीसाठी सदर प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या थेट बँक खात्यावर देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातील अंगणवाडी केंद्रातून ० ते ६ वयोगटातील मुले, गर्भवती महिला, स्तनदा माता यांना सकस पोषण आहार दिला जातो. याद्वारे दररोज जवळपास ७६ लाख लाभार्थ्यांपर्यंत शासन पोहोचत आहे. ३६ जिल्ह्यातील ५५३ तालुक्यातील अंगणवाड्यांमधून पोषण आहार देत असतानाच पोषण ट्रँकर या अँपच्या माध्यमातून लहान मुलांची, तसेच नवजात शिशुच्या पोषणाची, वाढीचीही नोंद ठेवली जाते. या मुलांचे वजन, उंची आदीबाबतची माहिती अँपच्या माध्यमातून अद्ययावत केली जाते. त्यानुसार या मुलांकडे लक्षही दिले जाते. या पोषण ट्रँकर अँपमधून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या, कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना हा प्रोत्साहन भत्ता मिळेल.

राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याच मध्यमातून केंद्र आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून निधीची तरतूद करून असे उपक्रम राबविले जातात. कोरोनाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी फार मोठी कामगिरी पार पाडली आहे, त्यामुळे त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे हे शासन म्हणून आपले कर्तव्य असल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Updated : 29 March 2022 8:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top