कार्यालयीन इमारतींमध्ये हिरकणी कक्ष बंधनकारक
X
सार्वजनिक, शैक्षणिक, वाणिज्यिक, निम शासकीय कार्यालयांसह ज्या इमारतींत महिलांचा वावर मोठ्या संख्येने आहे, तेथे आता नगरविकास विभागाने हिरकणी कक्ष सुरू करणे सक्तीचे केले आहे. त्यासाठी शासनाने एकात्मिक बांधकाम नियमावलीत बदल केला असून, हा कक्ष चटई क्षेत्राचा हिस्सा राहणार नाही, अशी तरतूद केली आहे. सध्या तरी फक्त एसटी स्थानकांवर आणि रेल्वे स्थानकांवर हिरकणी कक्षाची सोय आहे. महिलांच्या हिताला प्राधान्य देताना गरोदर माता, स्तनदा मातांची गैरसोय होऊ नये, यासाठी समस्त महिलांच्या सोयीसाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी एकात्मिक बांधकाम नियमावलीत बदल करताना हा हिरकणी कक्ष कोठे असावा, याबाबत काही अटी व सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्याच्या महिला धोरणाअंतर्गत या हिरकणी कक्षाची तरतूद केली आहे. विकास आणि नियोजन प्राधिकरणांसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी खबरदारी घ्यायची आहे. राज्याच्या नगररचना संचालकांशी चर्चा केल्यानंतरच हे आदेश देण्यात येत असल्याचे नगरविकास विभागाने म्हटले आहे.
काय आहेत अटी?
१) ज्या ठिकाणी महिलांचा वावर मोठ्या संख्येने आहे, अशा सार्वजनिक, शैक्षणिक, निमशासकीय इमारतीत ये-जा करणाऱ्या गरोदर महिलांना विश्रांती घेता यावी, स्तनदा मातांना त्यांच्या बाळाला स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्षाची संकल्पना करण्यात आली.
२) हा हिरकणी कक्ष संबंधित इमारतींच्या तळमजला अथवा पहिल्या मजल्यावर जिन्यानजीक बांधावा, जेणेकरून गरोदर माता, स्तनदा मातांना तिथे ये-जा करणे सोपे होईल.
३) प्रत्येक हिरकणी कक्षात महिलांसाठी प्रसाधनगृह, विद्युत व्यवस्था, हवा खेळती राहावी यासाठी खिडक्यांची रचना नीट असावी.
४) प्रत्येक हिरकणी कक्षात महिलांच्या विश्रांतीसाठी किंवा बाळाच्या स्तनपानासाठी अत्यावश्यक असलेल्या फर्निचर व इतर साहित्याची व्यवस्था असावी
५) प्रत्येक कक्ष चटई क्षेत्र म्हणून गणले जाणार नाही. जेणेकरून तो बांधण्यासाठी विकासकांना प्रोत्साहन मिळेल.
६) हिरकणी कक्षाची मालकी संबंधित सोसायटी, असोसिएशन किंवा इमारतीच्या मालकांकडे राहील.