मीच तुमच्याकडे तुमच्यावरच्या अश्लील comment ची तक्रार करतो आहे, हेरंब कुलकर्णींचं रूपाली चाकणकर यांना पत्र
X
वटपौर्णिमेच्या पुर्वसंध्येला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात मी वटपौर्णिमा साजरी करत नाही. असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी अश्र्लाघ्य भाषेत प्रतिक्रीया दिल्या होत्या. याच प्रतिक्रीया करणाऱ्यांवर राज्य महिला आयोगांतर्गत कारवाई केली जावी याकरता ज्येष्ठ शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी रूपाली चाकणकर यांनाच पत्र लिहिलं आहे.
मा.रुपाली चाकणकर,
मीच तुमच्याकडे तुमच्यावरच्या अश्लील comment ची तक्रार करतो आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची काल मी वटपौर्णिमेला वडाला जात नाही अशा प्रकारची एक भूमिका आली. त्यांच्या एका भाषणाच्या आधारे ती पोस्ट बनवली गेली. त्यात त्यांनी महिलांनी वटपौर्णिमेला जाऊ नये असे कुठेही म्हटलेले नाही फक्त मी स्वतः जात नाही हे सांगितले व त्याच वेळी सत्यवानाची सावित्री समाजाला लवकर कळली.सावित्रीबाई अजून कळत नाही किंवा कळायला हवी अशी भावना व्यक्त केली.
यात खटकण्यासारखे काहीच नव्हते. लोकानुरंजी भूमिका राजकीय पक्ष घेत असताना त्यांनी गोलमाल न बोलता अतिशय धाडसाने हे मांडले. हे अपवादात्मक व कौतुकास्पद आहे.
त्यांच्या वेगवेगळ्या पोस्ट खालच्या कमेंट आवर्जून बघितल्या तेव्हा अक्षरशः लाज वाटली.मला ते टाकताना लाज वाटते आहे पण अतिशय अश्लील भाषेत अनेक कमेंट आहे.
विशेष म्हणजे रूपाली चाकणकर यांचे घटनात्मक पद व तात्काळ कारवाईच्या शिफारस करू शकणारे पद असल्याने त्या सर्व विकृत व्यक्तींवर लगेच कारवाई होऊ शकते हे माहीत असूनही अशा कमेंट करण्याची हिंमत केली याचा अर्थ सोशल मिडियावर स्त्रियांच्याबाबत हिम्मत किती वाढली आहे याचे हे उदाहरण आहे.
अमृता फडणवीस यांच्या भूमिका मान्य असो किंवा नसो त्यांच्याबाबतीत अशाच अत्यंत अश्लील भाषेत कमेंट फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून सुरु आहे..
तेव्हा आता महिला आयोगाच्या अध्यक्षावरच नीच अश्लील comment बाबत मी त्यानाच पत्र लिहितो आहे व सोशल मीडियावर काल त्यांच्याबाबत जे घडले त्यावर त्यांनीच अध्यक्ष या नात्याने त्यांच्यातील स्त्रीबाबत सायबर सेलला कारवाई चे आदेश द्यावी अशी मागणी करणार आहे
त्याचबरोबर सायबर सेलने इथून पुढे कोणत्याही महिलांवर अशा comment केल्या तर सु मोटो कारवाई करावी असे आदेश त्यांनी देण्याची गरज आहे..
पुरुष म्हणून मी मागील वर्षी वटसावित्रीवर टीका केली तर मला फक्त पुरोगामी म्हणून शिव्या दिल्या पण एक स्त्री टीका करते.. तेव्हा थेट अश्लील शेरेबाजी होते ही विकृती रोखायला हवी
हेरंब कुलकर्णी