मदत सोडा निराधार महिलांना नेहमीच मानधन सुद्धा मिळेना
X
कोरोनाचा फटका जसा सर्वच घटकांना बसला आहे तसाच राज्यातील निराधार महिलांना सुद्धा बसला आहे. त्यामुळे सरकारने निराधारांसाठी मदतीची घोषणा केली होती. मात्र सरकारची मदत सोडा नेहमीच मानधन सुद्धा निराधार महिलांना वेळत मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे हतबल झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील सुकळी (बुद्रुक) येथील निराधार महिला आपल्या मागण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून सेनगांव तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसल्या आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाची कोणतेही दखल घेतली जात नसल्याचा आंदोलक महिलांनी केला आहे.
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना या निराधारांना आर्थिक आधार देण्यासाठी असल्या, तरी लाभार्थींना वेळेवर लाभ मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी अनेक वृद्ध महिला तीन दिवसांपासून सेनगांव तहसील कार्यालयासमोर ठाण मांडून बसल्या आहेत. तसेच यावेळी त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला.
तसेच निराधारांचे विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी महिला आंदोलकांनी केली असून, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निराधार महिलांनी दिला आहे. तर आमच्यावर आता मरायची वेळ आली असून, आम्हाला आमचं मानधन मिळाले नाही तर आम्ही आत्महत्या करू असा इशारा सुद्धा यावेळी आंदोलक महिलांनी दिला आहे.