पोरी, मानलं तुला..; आईच्या वाढदिवसाला केलं १८०० नागरिकांचे मोफत लसीकरण
X
मुंबई: वाढदिवस म्हंटल की, डोळ्यासमोर पार्टी, कुटुंबासोबतचा घरातील जल्लोष, जेवणाच्या मेजवान्या असे काही चित्र उभं राहते. मात्र या सगळ्याला फाटा देत कोरोनाचा संकट लक्षात घेत भांडूपच्या राजोल संजय पाटील या तरुणीने आपल्या आईचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. यावेळी तिने तब्बल १८०० नागरिकांचे मोफत लसीकरण करत आईचा वाढदिवस साजरा करत तिला भेट दिली.
राजोल सांगते की, गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहे. लोकांना दिवसभर रांगेत उभा राहून सुद्धा लस मिळत नाही. तसेच अनेक ठिकाणी गर्दीचा सुद्धा लोकांना सामना करावा लागत, असल्याने आई अनेकदा खंत व्यक्त करायची. अशातच तिचा वाढदिवस आला.
आईच्या वाढदिवसाला काय खास गिफ्ट देऊ शकते, ज्यामुळे ति आनंदी होऊ शकते याचा राजोल विचार करत होती. या विचारात मोफत लसीकरण मोहीम राबवण्याचे राजोलने ठरवलं. यात तरुणांपासून जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग सर्वांनी उपस्थिती राहून लसीकरण केल्यानंतर राजोलच्या आईला शुभेच्छाही दिल्या. तसेच राजोलने राबवलेल्या या मोफत लसीकरण मोहीमेचं अनेकांकडून कौतुक केलं जात आहे.