माजी आमदार ज्योती कलानी यांचं निधन; पती पप्पू कलानी पॅरोलवर सुटण्याची शक्यता
X
उल्हासनगरमध्ये आपल्या कामाने राजकीय वर्चस्व निर्माण करणाऱ्या ज्योती कलानी यांच ह्दय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आज सायंकाळी त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ७० वर्षांच्या होत्या. उद्या त्यांच्यावर अंत्यसंसकार करणार असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, ज्योती कलानी यांचे पती पप्पू कलानी तळोजा येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून पत्नी ज्योती कलानी यांच्या अंत्यसंसकारासाठी ते पॅरोलवर सुटण्याची शक्यता आहे.
ज्योती कलानी यांचा राजकीय प्रवास...
ज्योती कलानी यांनी उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक पदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर स्थायी समिती सभापती, महापौर व आमदार अशी पद त्यांनी भूषवली. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राजकारणात त्यांची ओळख भाभी म्हणून होती.
उल्हासनगरमधील राजकारण त्यांच्या शिवाय पूर्ण होत नव्हते. कुख्यात टाडा फेम माजी आमदार पप्पू कलानी यांच्या त्या पत्नी होत्या. पप्पू कलानी यांच्या राजकीय वलयामुळे त्या या पदापर्यंत पोहचल्या होत्या. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्या आजमितीला राष्ट्रवादी सोबत होत्या. त्यांच्या निधनाने उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीची जी पोकळी निर्माण झालीय ती न भरून निघणारी आहे.