भारतीय लष्करात प्रथमच महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर बढती
लष्करात प्रथमच महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर बढती देण्याचा निर्णय महिला अधिकाऱ्यांसाठी सकारत्मक निर्णय समजला जात आहे.
X
भारतीय लष्कराने (Indian Army ) पहिल्यांदाच पाच महिला अधिकाऱ्यांना (women officers) कर्नल पदावर बढती दिली आहे. लष्करात 26 वर्षे सेवा पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोर ऑफ सिग्नल, इलेक्ट्रॉनिक, मैकेनिकल इंजीनियर्स (EME) आणि कोर ऑफ इंजिनिअर्समध्ये सेवा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदासाठी प्रथमच मान्यता मिळाली आहे.
यापूर्वी कर्नल पदावर पदोन्नती केवळ आर्मी मेडिकल कोर (AMC), जज एडवोकेट जनरल (JAG) आणि सेना शिक्षा कोर (AEC) मधील महिला अधिकाऱ्यांना लागू होती. आता या निर्णयानंतर भारतीय लष्कराच्या अधिक शाखांमध्ये पदोन्नतीचा मार्ग विस्तारणे हे महिला अधिकाऱ्यांसाठी सकारत्मक निर्णय समजला जात आहे. भारतीय लष्कराच्या बहुतांश शाखांमधून महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या निर्णयाबरोबरच, हे पाऊल भारतीय लष्करातील महिला सैन्याकडे पाहण्याचा सकारत्मक दृष्टिकोन दर्शवत आहे.
या पाच महिलांची निवड करण्यात आली
कर्नल टाइम स्केलच्या रँकसाठी निवडलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांमध्ये, कोर ऑफ सिग्नलचे लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, ईएमई कोरचे लेफ्टनंट कर्नल सोनिया आनंद आणि लेफ्टनंट कर्नल नवनीत दुग्गल आणि कोर ऑफ इंजिनियर्समधून लेफ्टनंट कर्नल रीनु खन्ना आणि लेफ्टनंट कर्नल रिचा सागर यांचा समावेश आहे.