"फिन्द्री" बनली प्रोफेसर ... बापासाठी नकुशी ,आईसाठी साहेबीन
X
मुलगी झाली म्हणून तिला लहानपणी बाळ असताना फेकलं गेलं ,नकोशी असणारी ती मोठेपणी मात्र शिकली आणि प्रोफेसर बनली.पण बापाला मुलगी नको होती म्हणून तिचं फेकलं जाणं ते ती सुशिक्षित होईपर्यंत तिचा प्रवास यामध्ये अनेक महिलांची जीवनकहाणी समाविष्ट होते.तिची आई अडाणी होती. पण आपल्या लेकीनं शिकावं यासाठी दारुड्या नवऱ्याशी केलेली खटपट ,सोसलेला अन्याय आणि मुलीचं शिक्षण पूर्ण करताना बनलेली रणरागिनी म्हणजे फिन्द्री या कादंबरीतील संगीताची आई. या अन्यायातूनही मार्ग काढला आणि आपल्या मुलीला अशिक्षित राहण्यापासून वाचवलं. या मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका दलित आईच्या जीवन संघर्षाची अस्वस्थ करणारी कहाणी म्हणजेच फ़िन्द्री ...
मराठवाड्यातील एका दलित कुटुंबात एका मुलगीचा जन्म होतो . वंशाला दिवा म्हणून मुलगी नको मुलगाच हवा या इच्छेपोटी वडील त्या जन्मलेल्या गोळ्याला फेकून देतात. नुकताच जन्मलेला तो जीव रक्तबंबाळ होतो. लोकांना वाटतं याच्यात आता प्राण उरलेला नाही . लोकं त्या बाळाला जिवंत नाही असं समजून निराश होतात. पण काही वेळाने ते बाळ श्वास घेतो आणि रडायला लागतं . खरंतर एखादा चमत्कार व्हावा तशीच ही घटना... एखाद्या सिनेमातील सीन आठवावा अशीच ही घटना... मराठवाड्यातील एका दलित कुटुंबात घडली आणि फ़िन्द्री म्हणजेच ही नकोशी असलेली मुलगी जगायला लागली...
ती जगताना मरणाच्या यातना मात्र नेहमीच भोगत होती . बापाचा जरी राग असला ,तरी आईने मात्र आपल्या मुलीला शिकवायचं ठरवलं ... एक वेळेस आपण उपाशी राहिलं तरी चालेल ,पण माझी मुलगी शिकली पाहिजे ... असा निश्चय मुलीच्या आईने केला.
मुलगी बारावी बोर्डात पहिली आली. सत्कार होता आणि हा सत्कार करून आल्यानंतर बाबाने मारलेली थोबाडीत म्हणजे तिच्या यशाला मिळालेलं उत्तर होतं. या अशा परिस्थितीत आईने लाथा बुक्क्या खाल्या . त्यातील काही लाथा संगीताला पण खाव्या लागल्या . पण ना संगीता, थांबली ना तिची आई ... संगीता पुढे शिक्षण घेऊन पदवीधर झाली आणि पुढे जाऊन ती प्रोफेसर सुद्धा बनली.
पण संगीता प्रोफेसर बने पर्यंतचा प्रवास सोपा मुळीच नव्हता. जितका त्रास संगीताला झाला नसेल , त्याहून अधिक त्रास तिच्या अशिक्षित आईने झेलला . पण आज फिन्द्री या पुस्तकाच्या माध्यमातून संगीताची कथा लिहिणाऱ्या लेखिका म्हणजेच सुनीता बोर्डे. संगीता म्हणजेच सुनिता बोर्डे आणि संगीताची कहाणी तीच कहाणी आहे. सुनीता बोर्डे यांच्या आयुष्याची स्वतःची कहाणी लिहिताना त्यांनी संपूर्ण जीवन प्रवास फ़िन्द्री या पुस्तकातून मांडला आहे.
मुलींचे शिक्षण हा सर्वात जिवंत विषय आहे. एखादी मुलगी शिकते त्यावेळी ती मुलगी तिच्या घराला सुद्धा सुशिक्षित बनवते . पण ज्यावेळी ती मुलगी एखादा दलित कुटुंबातून येते त्यावेळी तिचा दारुडा बाप तिला शिकू देईल का? हाच पहिला प्रश्न तयार होतो . अशाच आशियाची कहाणी सुनीता बोर्डे यांनी फिन्द्री या कादंबरीतून समाजासमोर आणली आहे .
फिन्द्री म्हणजे काय ?
फिन्द्री म्हणजेच नको असलेली ... सुनिता यांचं आयुष्य हालाखीच्या परिस्थितीत गेले . दारुडा बाप ... अशिक्षित आई आहे . पण पितृसत्ताक परिस्थितीला फाट्यावर मारत आपल्या मुलीला शिक्षण देण्याची धमक असलेली आई हीच सुनीताचा आदर्श होती . शिक्षण हाच बाईची गुलामी संपवण्याचा मार्ग हे सुनीताच्या आईने पूरते जाणले होते .लेकीच्या शिक्षणासाठी नवऱ्याचा छळ ,अन्याय ,अत्याचार ,अपमान सगळं सहन केलं . पितृसत्ताक कुटुंब नेहमीच बाईला आपल्या बंधनात ठेवायला बघतं . तिने वागावं कसं ? बोलावं कसं ? काय खावं ?काय वापरावं ?हे सर्व काही पुरुषाच्या मर्जीवर ठरतं आणि जर हे नियम मोडण्याचा कोणत्याही स्त्रीने प्रयत्न केला, तर तिथे जन्म घेते ती म्हणजे हिंसा . घरातील रक्ताची नाती असणारा पुरुष आंधळेपणाने त्या बाईवर हिंसा करायला सुरुवात करतो आणि या हिंसेची शिकार झालेली बाई तिच्या स्वप्नांना तिलांजली देते. तिच्या इच्छा आकांक्षा संपूर्णपणे संपवते . पण फिन्द्री कादंबरीतील आईने आपल्या मुलीची स्वप्न तशीच जिवंत ठेवली. स्वतः मरण यातना भोगल्या पण आपल्या मुलीला शिकवलं.
गरिबीचं किरकूड बसल्यावर त्याचे विष उतरवायला शिक्षणाशिवाय जालीम उपाय नाही : सुनीता बोर्डे
हि कादंबरी लिहली त्यामागचा हेतू लेखिका सुनीता बोर्डे सांगतात कि ,"लेखकाचे लेखण आणि त्याचं जीवन याचा अंतर जितकं कमी तितकी ती कलाकृती वाचकाला मनाला जास्त भिडते. “As you write more and more personal becomes more and more universal.” या कादंबरीत असणारी नायिका संगीता आणि तिच्या शिक्षणासाठी धडपडणारी तिची आई यांच्या संघर्षापूर्तीच ही कहाणी मर्यादित नाही तर पिढ्यानपिढ्या स्त्रियांचा होणारे शोषण त्यांच्या संघर्षाचे प्रतिबिंब मला या कादंबरीतून दाखवून द्यायचं होतं . काहीही झालं तरी आडव्या येणाऱ्या ओढ्याची ,सापाची ,चिखलाची,फुपाट्याची ,काट्यांची, चिंचेच्या हिरव्या फोकाची तमा न करता शिकायचं होतं ... दुःख धरून बसलेल्या परिस्थितीला बदलण्यासाठी खऱ्या किरकुड्याचं विष एखाद्यावेळी उतरवता येतं ,पण गरिबीचं किरकूड बसल्यावर त्याचे विष उतरवायला शिक्षणाशिवाय जालीम उपाय नाही"
त्यामुळेच आज सुनीता बोर्डे यांनी स्वतःची कहाणी फिंद्री या कादंबरीतून जगासमोर आणली आणि जन्म झाला एका ज्वलंत कथेचा... तसं पाहता एखादी कादंबरी तात्विक चर्चाकडे झुकते तेव्हा ती नकोशी वाटते . सामान्य माणसांना ती वाचायला आवडत नाही . पण सुनीता बोर्डे यांनी सामाजिक संबंध, जात संस्था, पितृ संस्था आणि त्यातून जन्मलेली स्त्री हिंसा ही अगदी साध्या भाषेत हाताळली आहे . हे अनुभव त्या जगल्या असल्याने या कादंबरीला अजून जिवंतपणा आला आहे.
ही कादंबरी प्रत्येक मुलीसाठी आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी आपल्या स्वप्नांची उंची गाठणारी अशी शिदोरी आहे आणि त्याचबरोबर पुरुषसत्ताक मानसिकतेला स्त्रीच्या शक्तीची जाणीव करून देणारी ज्वलंत कादंबरी आहे.