सावत्र पित्याच्या साथीला वैरीण माता; बलिकेच्या गुप्तांगात मिरची पुड भरुन अत्याचार
X
आपण आजपर्यंत वडिलांनी स्वतःच्या पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या बातम्या वाचल्या असतील पण या कृष्णकृत्यात पिडीत मुलीच्या आईचाही सहभाग असल्याचे आपण कधीच ऐकले किंवा वाचले नसेल. औरंगाबाद येथे १४ वर्षीय मुलीवर तिच्या सावत्र पित्याने अत्याचार केले आहेत. अचंबित करणारी गोष्ट म्हणजे त्याच्या या कृष्णकृत्यात त्याला पिडीत मुलीच्या आईनेही साथ दिल्याची घटना घडली आहे.
पोटच्या १४ वर्षीय मुलीचे गेल्या वर्षभरापासून सावत्र बापासह शेजाऱ्याच्या मदतीने खुद्द आईनेच लैंगिक शोषण केले. एवढ्यावरच न थांबता या दोघांनी अक्षरश: तिच्या गुप्तांगात मिरची पुड भरुन अत्याचाराची परीसीमाच गाठली. या छळाला कंटाळलेल्या चिमुकलीने अखेर वाचा फोडत पोलिस ठाणे गाठले. त्यावरुन वैजापूर पोलिसांनी सावत्र बाप आणि गरोदर मातेला अटक केली आहे. तर शेजाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत.
औरंगाबादच्या एका वसतिगृहात शिक्षण घेत असलेली १४ वर्षीय बालिका पायाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे वर्षभरापूर्वी वैजापूरात आईकडे राहण्यासाठी गेली. मोंढा मार्केट परिसरात वास्तव्यास असलेली तिची आई दुसऱ्या पतीसोबत राहते. सावत्र पित्याची सुरुवातीपासूनच तिच्यावर वाईट नजर होती. नेहमी कोणत्या न कोणत्या बहाण्याने तो बालिकेशी लगट करायचा. त्यासोबतच मग शेजाऱ्यानेही तिच्याशी अश्लिल वर्तनाला सुरुवात केली. कालांतराने या दोघांनी बालिकेवर अत्याचाराला सुरुवात केली. बालिकेने विरोध दर्शविला तर तिला वैरीण माता व पिता मारहाण करायचे. आईच्या संमतीनेच हा प्रकार सुरु असल्यामुळे व्यथा मांडावी तरी कोणाकडे असा प्रश्न या बालिकेला नेहमी सतावत होता. दोघांनी अत्याचाराची परीसीमा गाठली. अत्याचाराला विरोध करणाऱ्या बालिकेच्या गुप्तांगात २४ ऑक्टोबर रोजी मिरची पूड भरेपर्यंत त्यांची हिंमत गेली. या घृणास्पद प्रकारानंतर मात्र बालिकेच्या सहनशीलतेचा बांध फुटला. त्रास होऊ लागल्याने बालिकेने शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील तिच्या मावशीकडे पळ काढला.
मावशीकडे गेलेल्या बालिकेचा पिच्छा पुरवत शेजारी तेथेही पोहोचला. मात्र, तिच्या मावशीने त्याला पिटाळून लावले. अखेर १ नोव्हेंबर रोजी बालिकेने मावशीसह वैजापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत वैरीण मातेसह सावत्र पित्याला अटक केली. तर शेजाऱ्याचा शोध सुरु केला आहे. याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील करत आहेत.