मोफत नको...सुरक्षित प्रवास हवा!
X
त्या बस स्टॅण्डवरून आतापर्यंत हजारो वेळा ये-जा केली आहे,अगदी कोणत्याही वेळेस! बिनधास्तपणे.. रात्री ९ नंतर, मध्यरात्री, मुंबई -ठाण्याच्या बसेस मधून तिथंच उतरले आहे.भल्या पहाटे ऑफिस गाठण्यासाठी त्याच बस स्टॅण्डवरून बसेस पकडल्या आहेत. एकटी,जोडीनं तर अनेकदा मुलगा लहान असल्यापासून ते आता तो एकटा येईपर्यंत कितीदा याच बस स्टॅण्ड वरून प्रवास केला आहे...पण खरंच सांगते, आतापर्यंत एकदाही भीती वाटली नव्हती... माझ्या माहेरच्या शहराची ओळख असलेला स्वारगेट बस स्टॅण्ड! मीच नाही, माझ्यासारख्या कितीतरी जणी इथून रोज एकेकट्या प्रवास करतात. काही वेळेस सकाळी, दुपारी, रात्री बसची वाट बघत इथंच बसतात. आणि कितीदा तरी बस कुठे लागणार हे इतरांना विचारतातही! तिनंही तसंच विचारलं असेल कदाचित!पुढे काय होणार हे तिला कुठे माहिती होतं? पण घडू नये तेच घडलं. म्हणजे सुरक्षितता, सावधानता, खबरदारी, जबाबदारी या सगळ्याबरोबरच कुणावर विश्वास ठेवायचा की नाही इथपासून आता प्रश्न पडायला लागले आहेत.
पुणे शहराची ओळख असलेलं स्वारगेट बस स्थानक! दिवसाच्या, रात्रीच्या कोणत्याही वेळेस गजबजलेलाच असतो. अगदी मध्यवस्तीत असणाऱ्या या स्थानकातून पहाटेपासून राज्यात आणि अगदी परराज्यांतही बसेस सुटतात आणि येत असतात. पुणे-ठाणे किंवा पुणे-दादर, बोरिवली सारख्याच सातारा, बारामती, सोलापूर इथं विनावाहक बसेस इथून धावतात. या बसेसमध्ये अगदी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत मुली, महिला, तरूणी सगळ्याजणी प्रवास करतात. कुणी शिक्षणासाठी, कुणी नोकरीसाठी, कुणी माहेरी-सासरी जाण्यासाठी, लग्नकार्यासाठी अशा अगदी सगळ्या कारणांसाठी बिनदिक्कतपणे प्रवास केला जातो. त्यातही महिलांना बस तिकीटात ५० टक्के सवलतीनंतर तर ही संख्या वाढलेलीच दिसून येते. रोजच्या रोज शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी अपडाऊन करणाऱ्या महिलाही आहेत. स्वारगेटहून जाणं-येणं सुरक्षित आहे असंच आतापर्यंत त्यांनाही वाटत असेल आणि त्यांना एकट्यांना प्रवास करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांनाही. पण या एका घटनेनं सगळं वातावरण ढवळून निघालं आहे, गढूळ झालं आहे.
अत्याचार करून फरार झालेला आरोपी पकडला गेला. आता कारवाई, प्रश्न सुरू होतील. पण मुख्य मुद्दा आहे तो महिलांच्या सुरक्षित प्रवासाचा! बाई घराबाहेर पडली की तिला सुरक्षित वाटेल असं वातावरण आपण का देऊ शकत नाही? अर्थात घरात सुरक्षित असतेच असं नाही. पण तो वेगळा मुद्दा आहे.स्वारगेट बस स्थानकातील घटनेनं फक्त महिला सुरक्षिततेची चर्चा पुन्हा सुरू होईल. 'इतक्या सकाळी कशाला एकटीनं बाहेर पडायचं? असे प्रश्न विचारणे बंद होऊन कोणत्याही वेळेस ती बाहेर पडली तरी तिला सुरक्षित वाटलं पाहिजे यासाठी काही ठोस होईल का?काही झालंच तर मला वेळेवर मदत मिळेल हा विश्वास मिळेल का? राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून महिला जर विश्वासानं प्रवास करत असतील तर तो विश्वास सार्थ ठरावा ही जबाबदारी कोणाची आहे? बसमध्ये हा प्रकार घडला तेव्हा ती बस बंद होती. पण आजूबाजूला तर गजबज होती. आरोपी सरळ एकटाच बंद पडलेल्या बसमधून बाहेर पडला आणि निघूनही गेला. अशा घटना घडू नयेत म्हणून पोलीस आणि प्रशासन तर सजग असायलाच हवे. पण नागरिक म्हणून आपल्या आसपास काय घडतंय याबद्दल थोडं आपणही जागरूक असणं खूप महत्वाचं आहे. ज्या महिला किंवा तरुणी एकट्या प्रवास करतात त्यांनी तर जास्तच सावधानता बाळगायला हवी.
या घटनेनंतर स्वारगेट स्थानकातील बसची तपासणी केली तेव्हा तिथे कंडोम्स, महिलांचे-पुरुषांचे कपडे अशा अनेक गोष्टी आढळल्या. म्हणजे हे असे प्रकार इथे राजरोस होत होते का ? असा प्रश्न पडतोच. बस स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त, पोलीस गस्त वाढवणे, बसेसमध्ये सीसीटीव्ही लावणे या गोष्टी हे उपाय आहेत. पण त्याहीपेक्षा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे असे अत्याचार घडलेल्यांना कठोर शिक्षा मिळते हा मेसेज जाण्याचा.
आरोपीला फक्त पकडून जेलमध्ये टाकणं पुरेसं नाही. तर कडक शिक्षा आणि लवकरात लवकर शिक्षा होणे गरजेचे आहे...त्यावर चर्चा करणं, आरोप-प्रत्यारोप करणं, सरकार-विरोधकांनी एकमेकांवर आगपाखड करणं, बेताल विधानं करणं याची ही वेळ नाही. उलट अशा प्रसंगी राज्याचे प्रशासनकर्ते आणि विरोधक आपल्या पाठिशी उभे आहेत असं प्रत्येक महिलेला वाटलं पाहिजे.
महिलांचा कामकाजाताला सहभाग वाढावा, त्यांनी बाहेर पडावं म्हणून बसच्या तिकीटात सवलत देणं हा खूप महत्वाचा निर्णय आहे. त्यामुळे सकारात्मक फरक पडलाही. पण तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे, तिला तो प्रवास कोणत्याही वेळेस करायला सुरक्षित वाटणं!