नानांचं मोठं मन; उपचारांसाठी चिमुकलीला स्वतःच्या हेलिकॉप्टरने मुंबईला पाठवलं
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःचं हेलिकॉप्टर एका लहान मुलीला जाण्याकरीता देऊ केलं आणि स्वतः मात्र रेल्वेने प्रवास करत मुंबई गाठली.
X
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी पक्ष मेळाव्यासाठी सोलापूरात आले होते. ठरलेल्या वेळेपेक्षा दोन तास उशिरा गेल्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी रात्री रेल्वेने सोलापूरहून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. नानांनी मग त्यांच्या हेलिकॉप्टरमधून हृदयविकाराने त्रस्त असलेल्या झोपडपट्टीतील एका चार वर्षाच्या मुलीला वैद्यकीय उपचारासाठी तिच्या आई-वडिलांसह मुंबईला पाठवलं.
सोलापूरच्या अक्कलकोट रोड भागातील सुनील नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या तुकाराम दासी या श्रमिकाच्या मुलीला उंजलला जन्मतःच हृदयविकाराचा त्रास आहे. दासी कुटुंब हालाकीच्या परिस्थितीत राहतं. उंजलला मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी जावं लागणार होतं. वैद्यकीय उपचार आर्थिकदृष्ट्या झेपत नसल्यामुळे दासी कुटुंबीयांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची नुकतीच भेट घेऊन मदत मागितली होती. त्याप्रमाणे दासी कुटुंबीयांना आधार देत, लहानग्या उंजलवर मुंबईत वैद्यकीय उपचार मिळवून देण्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी नियोजन केलं होतं.
योगायोगाने रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे हेलिकॉप्टरने सोलापुरात दाखल झाले होते. पक्ष कार्यकर्त्यांसह भटक्या विमुक्त जाती जमाती समाजाच्या मेळाव्यासाठी पटोले यांना सोलापुरात येण्यास दुपारनंतर दोन तास उशीर झाला. त्यामुळे त्यांनी पुढील कार्यक्रमात बदल करून रात्री रेल्वेने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हेलिकॉप्टर रिकामेच परतणार होते. तेव्हा आमदार प्रणिती शिंदे यांनी चिमुकल्या उंजल हिच्यावरील उपचारासाठी तिला आई-वडिलांसह याच हेलिकॉप्टरने मुंबईला पाठविण्याची विनंती पटोले यांना केली. पटोले यांनीही तात्काळ प्रतिसाद देत दासी कुटुंबीयांची विचारपूस करत त्यांना मुंबईला जाण्यासाठी स्वतःचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले.