'बोक्या'च्या भावाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल - मनीषा कायंदे
X
सिंधुदुर्गमधील शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यातच आता त्यांचे भाऊ आणि माजी खासदार निलेश राणे हे देखील अडचणीत आले आहेत. निलेश राणे यांच्याविरोधात पोलिसांना शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल होताच शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी बोक्याच्या भावाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल''असं ट्विट केलं आहे.
पोलिसांशी हुज्जत, जमावबंदीचे उल्लंघन... 'बोक्या'च्या भावाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल #शिवसेना #महाराष्ट्र #भाजपा_हटाओ_देश_बचाओ #Shivsena #Maharashtra #Mumbai #MumbaiPolice @AUThackeray @the_yuvasena @DGPMaharashtra pic.twitter.com/RS9vCiPiCo
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) February 2, 2022
मनीषा कायंदे यांनी ट्विट करत ''पोलिसांशी हुज्जत, जमावबंदीचे उल्लंघन... 'बोक्या'च्या भावाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल'' असं म्हंटल आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे कोर्टापुढे शरण आल्यानंतर मंगळवारी कोर्टाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे कोर्टाबाहेर आले आणि आपल्या गाडीमधून निघाले असताना त्यांची गाडी पोलिसांनी अडवली होती. यानंतर नितेश आणि निलेश राणे यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली होती. पण सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना १० दिवस अटक न कऱण्याचे आदेश दिल्याने त्यांना अटक करता आली नाही. याच दरम्यान निलेश राणे यांनी पोलिसांना शिविगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचप्रकरणी निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांशी अर्वाच्च भाषेत वाद घातल्याप्रकरणी ओरोस पोलीस ठाण्यात रात्री उशीरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.