स्त्रियांनी आपली गर्भधारणा पुढे ढकलावी; ब्राझील सरकारचं आवाहन
X
ब्राझीलमध्ये करोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांनी शक्य असल्यास आपली गर्भधारणा एक किंवा दोन वर्षासाठी पुढे ढकलावी असं आवाहन ब्राझील सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केल्याचं वृत्त The Brazilian Report या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
ब्राझीलमध्ये करोनाने हाहाकार माजवला असून आतापर्यंत एक कोटी 37 लाखांहून जास्त लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये तीन लाख 65 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोना रुग्णसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा आता अमेरिका आणि भारताच्या नंतर जगात तिसरा क्रमांक लागतोय. भारताच्या तुलनेत ब्राझीलची मोठी लोकसंख्या करोनाला बळी पडली आहे.
करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील बेड्स आणि औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ब्राझीलने आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मागितली आहे. करोना महामारीचे संकट असल्यामुळे स्त्रियांनी आपली गर्भधारणा पुढे ढकलावी असं आवाहन ब्राझील सरकारने केलं आहे. 21.4 कोटी लोकसंख्या असलेल्या ब्राझीलमध्ये करोनाने उद्रेक केला आहे. भारतापेक्षा ब्राझीलची परिस्थिती वाईट आहे.