गणेश नाईकांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, जामीन मिळणार का?
X
गणेश नाईक यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होताना पाहायला मिळतेय. बेलापूर आणि नेरुळ येथील पोलिस ठाण्यांमध्ये बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला आयोगाने गणेश नाईक यांच्या विरोधात अटकेचे आदेश दिले होते पण गणेश नाईक सध्या अज्ञातवासात आहेत. अटकेच्या नामुष्की पासून वाचण्यासाठी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं प्रकरण सध्या गाजत असतानाच गणेश नाईक यांचे प्रकरण आता समोर आलं आहे. दिपा चौहान या महिलेने गणेश नाईकांनी पिस्तूल दाखवून धमकी दिली तसेच बलात्कार केला म्हणून त्यांच्यावर बेलापूर आणि नेरूळ येथील पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नाईकांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर त्या महिलेने महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली. या प्रकरणात चौकशी झाल्यानंतर महिला आयोगाने नाईक यांच्या अटकेचे आदेश दिले. पोलीस गणेश नाईक यांच्या घरी, कार्यालयात आणि मुरबाड येथील फार्महाऊसवर अटकेसाठी पोहोचले पण गणेश नाईक कुठेच नाही आहेत. ते सध्या अज्ञातवासात आहेत
अटकेची नामुष्की वाचावी यासाठी त्यांनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यांचे वकील शीतल उबाळे यांनी न्यायाधीश आर एस गुप्ता यांच्यासमोर नाईकांच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला. यावर दुपारी दोन वाजता सुनावणी करण्यात येणार आहे बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन सहसा मिळत नाही पण गणेश नाईकांना तो मिळणार का अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.