भारती पवार यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार
X
‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती प्रतापराव पवार (वय ७७) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा आणि ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार, मुलगी अश्विनी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १८) पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
चित्रकलेचा वारसा आणि सामाजिक योगदान
पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील या मूळच्या मुंबईतील होत्या. त्यांचे बालपण शिवाजी पार्क येथे गेले. बालमोहन विद्या मंदिरातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रुईया महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत विशेष रुची असल्यामुळे त्यांनी पदव्युत्तर शिक्षणही घेतले. १९७० मध्ये त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला.
पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांमध्ये त्या पुढाकार घेत असत. औंध येथील बालकल्याण संस्थेत त्या तब्बल ३५ वर्षे कार्यरत होत्या. या संस्थेच्या विश्वस्तपदी राहून त्यांनी अनेक अनाथ मुलांना मदत केली. चित्रकलेच्या माध्यमातून त्या मुलांना शिक्षण आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत. संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
याशिवाय, ‘सकाळ’ संचलित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेच्या विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. अंध विद्यार्थ्यांसाठीच्या विविध उपक्रमांत त्या सक्रिय होत्या.
स्नेही परिवारात शोककळा
त्यांच्या निधनाने कुटुंबीय, स्नेही आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. समाजसेवा आणि चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना प्रेरित केले. त्यांच्या स्मृती कायम राहतील, असे अनेकांनी आपल्या शोकसंदेशांमध्ये म्हटले आहे.