Home > News > माझा बच्चू मी देशाला वाहिलाय !

माझा बच्चू मी देशाला वाहिलाय !

माझा बच्चू मी देशाला वाहिलाय !
X

‘’सर्वांनी आपापला स्वार्थ बघितला तर गोर गरिबांची सेवा कोण करणार? त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा कोण फोडणार? यासाठी माझा लाडका बच्चू मी देशसेवेसाठी सोडला आहे" हे उद्गार आहे. मंत्री बच्चु कडू यांच्या मातोश्रींचे. नव्वदी मध्ये असणाऱ्या इंदिरा कडू आपल्या मुलांच्या लहानपणीच्या आठवणीत रमतात.

मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना, त्या सांगतात सर्वात लहान म्हणून मी त्याचे नाव बच्चू ठेवले. तो लहानपणी खूपच खोडील होता. भावंडे सतत पोहायला जात असायची. ती आली की मी त्यांच्या कंबरेचे करदोडे ओले आहेत का ते तपासायची.

बच्चू कडू यांच्या घरातील वातावरण पुरोगामी होते. घरांमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा वावर असायचा. त्यांचे वडील गोर गरीबांची सेवा करायचे. यातूनच त्यांना लोकसेवा करण्याचा वारसा मिळाला. त्यांच्याकडे चांगले संघटन कौशल्य होते. त्या बळावर त्यांनी कॉलेज मध्ये विद्यार्थी चळवळीत काम सुरू केले. सुरुवातीला त्यांनी शिवसेना या पक्षात काम केले. त्या काळात कमरेला तलवार घेऊन फिरणाऱ्या बच्चू कडू यांना केवळ धर्मासाठी लढण्यापेक्षा सर्व जाती धर्मातील लोकांची सेवा करावी. त्यांच्याकरीता काम करावे असे वाटू लागले.

या करीता त्यांनी रुग्णसेवेचे काम सुरू केले. आणि गावातील पहिला रुग्ण ते उपचाराकरीता मुंबईला घेऊन गेले. त्या ठिकाणी राहून प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी त्या रुग्णावर उपचार करून घरी आणले. या गोष्टीची गावात चांगली चर्चा झाली. कुणाला मोतीबिंदू झाला आहे, कुणाचे ऑपरेशन करायचे आहे. कुणाला इतर काही आजार आहेत. असे रुग्ण शोधून त्यांनी उपचार मिळवून द्यायला सूरवात केली.

एखाद्याची फाईल कोणत्या टेबल ला किती दिवस थांबली. त्या फाईल ने प्रवासात काय काय खाल्ले याचा मागोवा घेत त्यांनी प्रशासनात दबदबा निर्माण केला. एका रुग्णाच्या उपचाराकरीता पैशाची आवश्यकता होती. त्यांच्याकडे पैसे नव्हते. ते तडक घरी आले आणि आईला त्यांनी सांगितलं मला पैसे दे नाहीतर मी पराठी विकतो. हा जाऊन पराठी (कापूस ) विकेल म्हणून आईने पैसे दिले. स्वतः च्या वडिलोपार्जित संपत्तीमधून लोकांना मदत करत त्यांनी परीसरात संघटन निर्माण केले. मुजोर अधिकाऱ्यांना धडा शिकवला.

हे ही वाचा

आर आर आबांचा नातू

“माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे आभार” – पंकजा मुंडे

त्यांनी केलेली आंदोलने प्रसिद्ध आहेत. त्यांना चित्रपट पाहण्याचा छंद आहे. त्यातूनच पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन त्यांनी केले. कार्यालयात साप सोडणे दवाखान्यात उलटे टांगून घेणे. आदिवासी वन पट्टयांच्या मागणी साठी जमिनीत गाडून घेणे दारूच्या दुकानापुढे दूध वाटप संडास भ्रष्टाचार सहभागी अधिकाऱ्यांना सडलेले संडासाचे भांडे भेट देणे अशी आंदोलने त्यांनी केली.

हे करत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबातून फार मोठा पाठिंबा मिळाला. ते वयाने लहान असले तरी त्यांची इतर सर्व भावंडे त्यांना मोठ्या भावाप्रमाणे आजही मान देतात. त्यांचे मोठे बंधू भैय्यासाहेब कडू सांगतात बच्चू म्हणेल ती आमच्या कुटुंबाची पूर्व दिशा असते. आम्ही त्याच्या कामात त्याला पूर्ण सपोर्ट करतो. हे करत असताना आम्ही त्यांच्या पदाचा कधीही स्वतः साठी उपयोग करत नाही. मी मंत्र्याचा भाऊ आहे. अशी ओळख कधीही सांगत नाही.

बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू या उच्चशिक्षित आहेत. त्या संत साहित्याच्या अभ्यासक आहेत. त्या देखील सार्वजनिक जीवनात काम करतात. त्या म्हणतात सार्वजनिक जीवनात सक्रिय असल्याने त्यांच्या पतीचा कुटुंबाला तितकासा वेळ मिळत नाही. पण ते त्यांची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत असल्याचा त्यांना अभिमान आहे. बच्चु कडू यांच्या संघर्षामध्ये त्यांना कधी भीती वाटली का असा प्रश्न करताच त्या हळव्या होत सांगतात.

"भीती तर वाटतेच पण आपण या भीतीने काम करणे सोडून त्यांना कोंडून तर ठेवू शकत नाही ना?" अनेक प्रसंग आले त्या प्रसंगात ते सहकुटुंब आंदोलनात उतरले. त्यांनी स्वत:च्या जीवाची कुटुंबाची कधीच परवा केली नाही.

सकाळी लवकर सुरू होणारा बच्चू कडू यांचा दिवस उशिरा मावळतो. मंत्रालयातील त्यांच्या दालनात तसेच घरातही लोकांची रीघ लागलेली असते. लोकांच्या सगळ्या समस्यांवर ते लक्ष देतात. त्या सोडवण्याकरिता त्याचा पाठपुरावा करतात. त्यांच्या कामाची पद्धती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी फटकावले आहेत. याबाबत तुम्ही कायदा मोडता का? असा प्रश्न करताच ते सांगतात कायदा अमलात आणण्यासाठी मी कायदा मोडतो.

प्रहार जनशक्ती पक्षाचे काम महाराष्ट्रभर उभे राहिले आहे. अनेक भागात नेटवर्क उभा राहतं आहे. लोकांची प्रामाणिकपणे सेवा करणारे बच्चू कडू आज मंत्री झाले आहेत. भविष्यात त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारावी या सदिच्छा त्यांचे कार्यकर्ते देत आहेत.

Updated : 5 July 2020 12:48 AM IST
Next Story
Share it
Top