नवलच! हुंड्यापोटी एकवीस नखी जिवंत कासव, काळ्या रंगाचा लॅब्रो़डोर दिला नाही म्हणून लग्नाला नकार
X
हुंड्यापोटी रोख रक्कम, गाडी, सोनं दिले नाही म्हणून लग्नाला नकार दिल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, मात्र औरंगाबादमध्ये हुंड्यापोटी एकवीस नखी जिवंत कासव आणि काळ्या रंगाचा लॅब्रो डॉग दिलं नाही म्हणून मुलाकडील मंडळींनी लग्नाला नकार दिल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार १० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२० याकाळात रमानगरात घडला. त्यावरुन सहा जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विटभट्टी व्यवसायिक अनिल मगनगराव सदाशिवे (५५, रा. गल्ली क्र. २, रमानगर) यांच्या मुलीचा विवाह नाशिक येथील तरुणाशी ठरला होता. साखरपुडा करण्यापुर्वी नाशिक येथील रविंद्र चराटे, लता चराटे, आकाश चराटे, पुनम चराटे, माधुरी चराटे (सर्व रा. डायमंड कॉलनी, नाशिक रोड) आणि संतोष उमले (रा. बाळापुर, जि. अकोला) यांनी हुंड्यापोटी दोन लाख अकरा हजार आणि सोन्याची अंगठी घेतली.
पण मुलाकडील मंडळी यावरच थांबली नाही, तर मुलीला नोकरीला लावून देतो असे म्हणत त्यांनी दहा लाखांच्या रकमेसह, एकवीस नखी जिवंत कासव, काळ्या रंगाचा लॅब्रो डॉग, समई यासह आणखी पैशांची मागणी केली. मात्र, सदाशिवे याची पुर्तता करु शकले नाही. त्यामुळे चराटे कुटुंबाने लग्नाला नकार दिला. विनंती करूनही चराटे कुटुंब आयकून घेत नसल्याने अखेर, सदाशिवे कुटंबानी पोलिसात धाव घेतली. त्यावरुन उस्मानपुरा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.