'तू जे केलंस ते छान केलंस!' विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्काने असं का म्हंटल?
क्रिकेटर विराट कोहली याने नुकताच टेस्ट क्रिकेटच्या कॅप्टन पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. पतीसाठी लिहिलेली ही पोस्ट समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली. या पोस्ट मध्ये अनुष्काने नक्की काय म्हंटले आहे. त्याचा मराठीत अनुवाद भक्ती कोनालकर यांनी केला आहे...
X
इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी अपडेट असलेल्या काही सेलेब्रिटींपैकी एक म्हणजे अनुष्का शर्मा! परवा विराटनं टेस्ट क्रिकेटचा कॅप्टन म्हणुन राजीनामा दिल्यावर अनुष्का काही तरी पोस्ट करेल ही अपेक्षा होतीच. काल तिनं लिहिलेली पोस्ट वाचल्या वाचल्या ती मराठीत करावी असं वाटलं. क्रिकेट 'फॅालो' करणं मी केव्हाच सोडलं. त्यामुळे विराट माझा आवडीचा खेळाडू वगैरे नाही. पण यशस्वी कॅप्टन म्हणून त्याला टाळणं शक्य नाही. प्रत्येक यशस्वी बाईच्या मागे एक पुरुष असेलच असं दरवेळी ठामठोकपणे म्हणता येईलच असं नाही. पण बऱ्याच यशस्वी पुरुषांच्या बरोबर एक बाई असतेच. अनुष्काच्या पोस्ट मधुन ती दिसली!
अनुष्काच्या पोस्टचं हे भाषांतर नाही. फार फार तर याला स्वैर अनुवाद म्हणूया!
——
एम. एस. धोनी टेस्ट क्रिकेटमधुन निवृत्त होणार असल्यामुळे तुला कॅप्टन करण्यात आलंय हे तू मला सांगितलंस तो २०१४ मधला दिवस आजही मला लख्ख आठवतो. त्यादिवशी संध्याकाळी आपण तिघं - तू, मी आणि एमएस गप्पा मारत बसलो असताना एमएस गंमतीनं म्हणाला होता - आता तुझ्या दाढीचे केस किती पटापट पांढरे होतात बघशिलच तू! आपण त्यावर अगदी मनमुराद हसलो होतो. त्या दिवसानंतर दाढीचे केस पांढरे होण्याच्या पलिकडेही तुझ्यात किती आणि काय काय बदललेलं मी पाहिलंय! तुझी प्रगती पाहिलीये आणि तुझं आंतर्बाह्य जबाबदार होत जाणंही मी पाहिलंय. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणुन तुझा आणि तुझ्या नेतृत्वाखाली क्रिकेट संघानं मिळवलेल्या विजयाचा मला अभिमान आहेच, पण त्यापेक्षा कितीतरी जास्त अभिमान मला एक माणुस म्हणुन या काळात झालेल्या तुझ्या प्रगतीचा वाटतो. २०१४ मध्ये आपण किती तरुण, साधेसुधे - पोरकट होतो. चांगला स्वच्छ हेतू, सकारात्मकता आणि प्रेरणा हे एवढंच आयुष्यात पुढे जायला पुरेसं असतं असं वाटायचा तो काळ होता. ते खरंही होतं, पण कित्येक आव्हानांशिवाय ते शक्यही नव्हतं. यातली कित्येक आव्हानं तर मैदानाबाहेरची होती. But then, this is life, right? जीना इसीका नाम है! आपण अजिबात कल्पना केली नसेल तिथेच आयुष्य आपली परिक्षा घेतं. त्यातूनच कदाचित आपण कणखर होत जातो. पण, तुझ्या निकोप हेतूंच्या आड तू अगदी काही म्हणजे काही येऊ दिलं नाहीस, म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. You lead by example, जिंकण्यासाठी तू नेहमी तुझे सर्वोत्तम प्रयत्न केलेस. शंभर टक्के प्रयत्न केल्यानंतरही अपयश आलं तेव्हा 'मी कुठे कमी पडलो?' या विचारानं डोळ्यातलं पाणी आवरु न शकलेल्या तुला मी पाहिलंय. हा असा आहेस तू - जिंकण्यासाठी सगळा जीव पणाला लावणारा आणि यशानं हुलकावणी दिली तर कासावीस होणारा. प्रत्येकानं असंच असावं अशी साधी अपेक्षा करणारा. unconventional आणि मोकळाढाकळा! मला आणि तुझ्यावर प्रेम करणाऱ्या तुझ्या कितीतरी चाहत्यांना - आम्हाला तुझा सगळ्यात आवडणारा गुण म्हणजे ढोंगीपणा तुला अजिबात जमत नाही. तुझ्या सगळ्या व्यक्तीमत्वाचा पायाच तुझे निकोप हेतू हा आहे. प्रत्येकालाच ते कळेल असं अजिबात नाही. उलट, मला वाटतं तू डोळ्यांना जसा दिसतोस त्या पलिकडे कसा आहेस हे खुप मोजक्या आणि जवळच्या लोकांनाच माहिती आहे. तू पर्फेक्ट अजिबात नाहीस, तुझ्यात दोष आहेतच, पण तू कधी कुठे ते लपवलेसस? योग्य गोष्टींसाठी, कठीण आव्हानांसाठी तू नेहमी उभा राहिला आहेस. मोहात पडून एखादी गोष्ट जबरदस्तीने धरुन ठेवायचा तुझा स्वभाव नाही. अगदी, हे कर्णधारपद सुद्धा! हट्टानं अशा गोष्टी धरुन ठेवणारे स्वत:लाच मर्यादा घालुन घेत असतात, पण तू मात्र अजिबात तसा नाहीस… तू अमर्याद आहेस! Limitless!
सात वर्षांच्या तुझ्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत एक माणूस म्हणुन तू तावुन सुलाखुन निघालायस.. आपली लेक मोठी होताना तिच्या बाबाकडून हे सगळं शिकणार आहे!
तू जे केलंस ते छान केलंस! ❤️