उद्यान वाचवण्यासाठी ८५ वर्षांची आजी बसली उपोषणाला, अखेर महापालिकेनं काढली समजूत
X
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसराच्या विकास कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पात स्टेशन शेजारी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान बाधित होत आहे. हे उद्यान वाचविण्यासाठी लक्ष्मीबाई ससाने या 85 वर्षीय आजीबाईनी उद्यानातच बेमुदत उपोषणास दोन दिवसांपासून सुरुवात केली होती. दरम्यान आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी उपोषणाला बसलेल्या ससाने आजींची भेट घेतली. उद्यानाची जागा जात असेल तर तितकी जागा या उद्यानाला मागच्या बाजूस देण्यात येईल असे लेखी आश्वासन अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी ससाणे यांना दिलं. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आल्याचं उपोषण करते लक्ष्मी ससाने यांनी सांगितलं.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या स्टेशन परिसर विकासांतर्गत महात्मा फुले चौक ते सुभाष चौक 24 ते 30 मीटर रस्ता रुंदीकरण करण्याचे नियोजीत आहे. यापूर्वी रस्ता रुंदीकरणात हे उद्यान दोन वेळा बाधीत होणार होते. आत्ता पुन्हा ते स्टेशन परिसर विकास प्रकल्पात बाधीत होत आहे. या प्रकरणी आजपर्यंत शेकडो नागरीकांनी हरकती घेतल्या आहेत. महापालिका उद्यानाची जागा घेणार असल्याने आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आहेत. मोक्याच्या ठिकाणी आंबेडकर उद्यान आहे. उद्यान बाधीत होण्यापूर्वीच आंबेडकरी अनुयायी महापालिकेच्या विरोधात एकवटले आहेत.