आमिताभ आणि ती अविस्मरणीय भेट
'' महानायक अभिताभ बच्चन यांना भेटावं त्यांच्याशी बोलावं त्यांच्यासोबत फोटो काढावा अशी अनेकांना इच्छा असते . पण हे काही सहज सोपं नाही हेही आपल्या सर्वांना माहित आहे. पण ''अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है।'' अगदी शाहरुख खानच्या या डायलॉग प्रमाणे लेखक रवींद्र पोखरकर यांच्यासोबत घडले आहे. अभिताभ बच्चन यांना भेटण्याची त्यांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली आणि या सगळ्या भेटीदरम्यान आलेला अनुभव त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. त्यांनी फेसबुक वर केलेल्या एका पोस्टमुळे त्यांना कसं अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळाली, त्यांचा हा अनुभव अत्यंत भन्नाट आहे...
X
ओम शांती ओम चित्रपटातील शाहरुख खानच्या तोंडी असलेल्या या डायलॉगची मला नुकतीच प्रचिती आली. त्याचीच ही सारी कहाणी..मागील महिन्यात ६ जुलैला एका फोटोसह मी इथे एक पोस्ट लिहिली होती.अमिताभ बच्चन समोर बसलेत आणि माझा मुलगा त्यांचे फोटो काढतोय असा तो फोटो होता.अमिताभच्या अभिनयावरील माझं प्रेम आणि त्याला प्रत्यक्ष कधीच भेटता न आल्याची खंत मी त्या पोस्टमध्ये व्यक्त केली होती आणि चला आपण नाही पण आपल्या मुलांची तरी त्यांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने अमिताभशी कुठे ना कुठे भेट घडते याचा आनंद व्यक्त केला होता.
तर..ती पोस्ट 'कौन बनेगा करोडपती' च्या युनिटसोबत काम करीत असलेल्या माझ्या मुलांच्या एका जिवलग मित्रापर्यंत पोहचली.त्याने मला फोन करून सांगितलं की तुमची ए बी सरांना (हे अमिताभ बच्चन यांचं शॉर्टफॉर्म असल्याचं त्यानेच सांगितलं.) भेटण्याची तीव्र इच्छा पूर्ण होऊ शकते,पण त्यासाठी तुम्हाला 'केबीसी'चा जो नवीन सिझन सुरु होतोय त्याच्या डेमो शूटसाठी मुंबईच्या फिल्मसिटीत यावं लागेल.तिथे तीनचार तासांचा वेळ द्यावा लागेल. तुम्हाला मान्य असेल तर मी तशी व्यवस्था करतो.
मी ते अमान्य करण्याचा अर्थातच प्रश्नच नव्हता.मग पंधरा दिवसांपूर्वी ठरलेल्या वेळी बायकोसह फिल्मसिटीत केबीसीच्या सेटवर पोहचलो. आपल्याला टीव्हीवरून दिसणारं प्रत्यक्ष शूट दुसऱ्या दिवसापासून तिथे सुरु होणार होतं,पण सगळी सिस्टीम बरोबर काम करतेय की नाही ते चेक करण्यासाठी त्यादिवशीचं ते डेमो शूट होतं.अर्थात तेही सगळं खऱ्या एपिसोडप्रमाणेच शूट होणार होतं. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट साठी निवडण्यात आलेल्या दहा लोकांमध्ये मी एक होतो.आमच्या कॉलरला माईक वगैरे लावून सेटवर ठरलेल्या खुर्च्यांमध्ये आम्हाला बसवण्यात आलं.बायको समोर प्रेक्षक गॅलरीत बसली.अमिताभ येण्याआधी एकदोन वेळा रंगीत तालीम घेण्यात आली आणि मग मी ज्या क्षणाची अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आला.
अमिताभ सेटवर आला..प्रचंड उत्साह..चेहऱ्यावर प्रसन्न हास्य..अतिशय विनम्रतेने आम्हा प्रत्येकाच्या जवळ येत त्याने हस्तांदोलन केलं.डेमो असूनही वेळ काढून शूटसाठी आल्याबद्दल आमचे आभार मानले. त्याच्या त्या विनम्रतेने आणि सौजन्यशीलतेने मी भारावून गेलो.मग साधारण तासभर ती डेमो शूटची सगळी औपचारिकता पार पडली.आम्हा दहा जणांपैकी एकालाच हॉट सीटवर जाण्याची संधी मिळाली आणि त्यातच त्यांची सगळी ट्रायल पूर्ण झाली.अमिताभ ज्या पद्धतीने सगळ्या युनिटच्या लोकांशी बोलत होता,सूचना करत होता,दुरुस्त्या सुचवत होता,शो मधील नवीन बदल समजून घेत होता ते सगळंच पाहणं म्हणजे एक वेगळा अनुभव होता.तो सदियों का महानायक,सुपरस्टार का आहे ते सगळं लक्षात येत होतं.एखाद्या सीरियलमध्ये फुटकळ रोल मिळाला की आभाळाला हात टेकल्यागत माजोरडेपणा अंगात भरलेले काही कलाकार पाहिलेत मी..आणि इथे गेली जवळपास पन्नास वर्षे बॉलिवूडवर राज्य करणारा अनभिषिक्त सम्राट ज्या नम्रतेने मेकअपमन पासून ते चहा आणून देणाऱ्यापर्यंत सगळ्यांशी वागत होता ते खूप काही शिकवणारं होतं.शूट संपल्यावर आम्हा दहा लोकांसोबत अमिताभचा एक ग्रुप फोटो काढण्यात येईल असं आम्हाला आधी सांगण्यात आलं होतं.मला त्याला प्रत्यक्ष भेटायचं होतं फक्त..ते झाल्याने मी समाधानी होतो.ग्रुप फोटोही मला चाललाच असता. पण अमिताभने त्याची आमच्याशी झालेली भेट आमच्यासाठी अविस्मरणीय करण्याचा चंगच बांधला होता बहुदा..तो फोटोग्राफरला म्हणाला की माझ्याकडे काही वेळ आहे.आपण स्वतंत्र फोटो काढू.मी म्हटलं,माझी बायकोही सोबत आहे.तर म्हटला की बुलाईये उनको भी..आणि मग मस्त आम्हा दोघांना त्याच्या दोन्ही बाजूला उभं करून हा छान फोटो काढला.
दिल बाग बाग हो गया..अक्षरशः हवेत तरंगतच घरी परतलो..
(अमिताभच्या अनेक बाबींविषयी मतभेद आहेत, रहातील.पण त्याच्या चित्रपटांमधून-अभिनयातून त्याने अनेक वर्षे दिलेला आनंद त्याहून खूप मोठा आहे.त्यामुळे उगाच 'काय त्याचं तुम्हाला इतकं अप्रूप' छाप भोचकपणाच्या कमेंट टाळल्यास जरा बरं होईल. )