राज्यातील मंदिरं खुली, भाविकांची रिघ
X
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील धार्मिक स्थळं सरकारने गेली ८ महिने बंद ठेवली होती. पण आता अनलॉक अंतर्गत काही अटी आणि शर्तींसह धार्मिक स्थळं खुली करण्यात आली आहेत. दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील पाली सुधागड येथील अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी बल्लाळेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. याबरोबरच महड येथील अष्टविनायक क्षेत्र दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिरा सभोवताली असणारे व्यापारी तसेच पर्यटनावर आधारित रोजगार काही महिने ठप्प होता. दुकानदारांसमोर देखील रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता, पर्यटन व मंदिरे खुली झाल्याने लहान मोठ्या दुकानदारांनी या निर्णयाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.
याबरोबरच जिल्ह्यांतील इतरही प्रार्थना स्थळे व पर्यटन स्थळे खुली झाली असून पर्यटक व भाविकांनी शासन नियम व अटींचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तर दुसरीकडे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे परळी येथील श्री वैजनाथ मंदिर, आठ महिन्यानंतर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आज सोमवार निमित्त मंदिर उघडल्याने, भक्तांनी सोशल डिस्टनसिंग ठेवत मोठ्या शिस्तीत दर्शनाला सुरुवात केली आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशासह महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातुन भक्त इथे दररोज दाखल होतात. आज पहाटे 5 वाजल्यापासून भक्तांनी दर्शनाला सुरुवात केली आहे.