मोदी सरकारने केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग थांबवावा अन्यथा... - ॲड. ठाकूर
X
देशातील जनहिताच्या संघर्ष लढ्यात नेहमी आक्रमक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या विदर्भातील एकमेव महिला आमदार आणि माजी महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकार विरोधात पुन्हा एकदा आसूड ओढला आहे. मोदी सरकारने केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग थांबवावा, अन्यथा मोदी नितीविरोधात रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. काँग्रेस अध्यक्षा तथा खासदार सोनिया गांधी यांच्या सक्त वसुली संचालनालयाकडून सुरू असलेल्या सततच्या चौकशी विरोधात आणि मोदी सरकारचा जाहीर निषेधाचे निवेदन ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांची भेट घेऊन त्यांना सादर केले.
केंद्रातील मोदी सरकारकडून सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू आहे. सक्त वसुली संचालनालयाकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना नोटिस पाठवल्या जात आहेत. हा एक दबाव तंत्राचा भाग असून, यातूनच सक्त वसुली संचालनालय, नवी दिल्ली मार्फत २१ व २६ जुलै २०२२ला चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत काँग्रेस अध्यक्षा तथा खासदार सोनिया गांधी यांना नोटीस पाठवण्यात आली होती. तसेच पुन्हा आज दिनांक २७ जुलै २०२२ रोजी सक्त वसुली संचालनालय कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगीतले आहे. सदर प्रकार जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी केला जात असून काँग्रेस अध्यक्षा तथा खासदार सोनिया गांधी यांना विनाकारण खोटया प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत असल्याने आम्ही केंद्रातील मोदी सरकारचा जाहीर निषेध करीत असल्याचे निवेदन अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)च्या वतीने ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांची भेट घेऊन त्यांना सादर केले.
मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा सुरू असलेला दुरुपयोग त्वरित थांबवावा, अन्यथा या मोदी नितीविरोधात रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा दिला आहे. तसेच आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला आपण जबाबदार असाल असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)चे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख, आमदार बळवंत वानखेडे, माजी आमदार विरेन्द्र जगताप, अमरावती शहर अध्यक्ष बबलु शेखावत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे आदींचा समावेश होता. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.