"ही तर भाजपची स्क्रिप्ट इतकंच नाही तर.." रुपाली ठोंबरेंचा राज ठाकरेंवर आरोप
मनसे यापूर्वी लोकांच्या प्रश्नासाठी खळखट्याक स्टाइलने लढत होती. पण आताचा हा खळखट्याक भाजपने ईडी आणि सीबीआयचा जो धाक दाखवला आहे त्यामुळे केला जात आहे. रुपाली ठोंबरेंची राज ठाकरेंवर टीका...
X
एक मे महाराष्ट्र दिना दिवशी महाराष्ट्रात दोन सभा झाल्या. औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी सभा घेतली तर मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे ते सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी तीनही सभांमधून राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. परवा झालेल्या औरंगाबाद येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ठाकरे यांनी सडकून टीका केली. शरद पवार हे जातीयवादी आल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला तर दुसरीकडे मुंबईत झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत सुद्धा फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. आता हे सर्व झाल्यानंतर मनसेच्या पूर्व पदाधिकारी व मागच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांचा खास त्यांच्या शैलीत समाचार घेतला आहे. भोंग्यांवरून सध्या जे काही राजकारण सुरू आहे ते सर्व भाजपची स्क्रिप्ट आहे. इतकच नाही तर राज ठाकरे यांची सभा सुद्धा भाजपनेच नियोजित केली असल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे.
रुपाली पाटील यांनी काल मॅक्सवुमनला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंवर आरोप करत चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी म्हंटल आले की, मनसे यापूर्वी लोकांच्या प्रश्नासाठी खळखट्याक स्टाइलने लढत होती. पण आताचा हा खळखट्याक भाजपने जो ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवला आहे त्यामुळे केला जात आहे. मी पूर्वी जर मनसे पक्ष सोडला नसता तर आता ही परिस्थिती पाहता, आता मी पक्ष सोडला असता.
आता अशा प्रकारचे भडकाऊ भाषण केल्यानंतर अनेक कार्यकर्ते उत्साहाच्या भरात नको त्या गोष्टी करून बसतात. असाच मनसेमध्ये असतानाचा एक अनुभव रुपाली ठोंबरे पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. त्या म्हणतात की, माझ्यावर अनेक मोठे गंभीर गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल झाल्यानंतर कोणीही आपल्या सोबत नसतं आपल्याला स्वतःलाच आपलं पाहावं लागतं. मी स्वतः वकील आहे. माझ्या घरातले वकील आहेत म्हणून मला हे सर्व करता आलं. परंतु आपल्यालाचं जेलमध्ये काढावं लागतं. जेलमध्ये गेल्यानंतर अत्यंत वाईट अनुभव असतात. अस म्हणत त्यांनी उत्साहाच्या भारत काहीही केलं तर काय होत हे स्वतःच्या उदाहरणातून सांगत कार्यकर्त्यांना उत्साहाच्याभारत काहीही न करण्याचे आवाहन केले आहे.