गुडघ्याभर पाण्यात उतरून अदिती तटकरेंनी घेतला बचाव कार्याचा आढावा
X
राज्यातील अनेक भागात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने कोकणातील जनजीवन कोलमडून गेलं. रायगड जिल्ह्यातील कर्जत व महाड हा परिसरही जलमय झाले आहेत. तर पुराने वेढा दिलेल्या परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी गुडघ्याभर पाण्यात उतरून परिस्थितीचा आढावा घेतला.
अदिती तटकरे यांनी फेसबुक वर पोस्ट करत माहिती दिली की, "महाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाड शहर तसेच लगतच्या परिसरात पाणी साचले आहे. याठिकाणी प्रत्यक्षात हजर राहून पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी लगतच्या दासगाव व केंबुर्ली परिसरात साळुंखे रेस्क्यू टिमने पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत सुखरूप ठिकाणी हलविले. नागरीकांना वेळेवर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत",असं अदिती यांनी म्हंटलं आहे.
कोकणातील अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते. तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण,रायगड जिल्ह्यातील कर्जत व महाड भागाला अधिक फटका बसला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोरातील 27 गावांचा संपर्क तुटला होता. मात्र प्रशासनाने वेगवान हालचाली करत लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.