Home > News > कुपोषणमुक्त मुंबईसाठी ७१ नागरी बाल विकास केंद्रे कार्यान्वित

कुपोषणमुक्त मुंबईसाठी ७१ नागरी बाल विकास केंद्रे कार्यान्वित

कुपोषणमुक्त मुंबईसाठी ७१ नागरी बाल विकास केंद्रे कार्यान्वित
X

महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या आदेशानुसार मुंबईत एकूण ७१ नागरी बाल विकास केंद्र आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहेत. पहिल्या चेंबुर नागरी बाल विकास केंद्र येथून प्रातिनिधिक स्वरूपात या केंद्रांचे उद्घाटन एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांच्या हस्ते दिनांक दिनांक १० फेब्रुवारी रोजी पार पडले. मुंबईतील एम पूर्व व एम पश्चिम या प्रभागांतर्गत चेंबुर, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, ट्रॉम्बे व मुलुंड पूर्व या ६ प्रकल्पांमध्ये एकूण ७१ नागरी बाल विकास केंद्र कार्यान्वित झाले आहेत.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुंबई विभागात एकूण ३३ बाल विकास प्रकल्प कार्यरत आहेत. यामध्ये ५ हजार १३० अंगणवाडया नागरी झोपडपट्टी क्षेत्रात सुरू आहेत. मुंबईतील एम पूर्व व एम पश्चिम या प्रभागामध्ये अति कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे समजल्यानंतर या मुलांवर उपचार करण्यासाठी ऑगस्ट २०२१मध्ये शताब्दी रुग्णालय, गोवंडी याठिकाणी पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) सुरू करण्यात आले होते. यामध्ये मुलांचे वजन, उंची, दंड घेर याची बालरोग तज्ञांकडून तपासणी करून, अति तीव्र कुपोषित मुलांची नोंद करण्यात येते व या मुलांच्या पालकांना आहार तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येते.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ अखेर एकूण ११०० मुलांची तपासणी केली असता ३७३ अति तीव्र कुपोषित मुले आढळून आली. सदर मुलांचे अंगणवाडी क्षेत्रातच श्रेणीवर्धन व वाढ होणेकरिता ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर नागरी भागात नागरी बाल विकास केंद्र (UCDC) सुरू करण्याचे आदेश महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री ॲड. यशोमतीताई ठाकूर यांनी दिले होते. मंत्री महोदय यांच्या आदेशानुसार मुंबईतील एम पूर्व व एम पश्चिम या प्रभागांतर्गत चेंबुर, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, ट्रॉम्बे व मुलुंड पूर्व या ६ प्रकल्पांमध्ये एकूण ७१ नागरी बाल विकास केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यापैकी पहिल्या चेंबुर नागरी बाल विकास केंद्र येथे उद्घाटनप्रसंगी आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अंगणवाडी क्षेत्रातील अति तीव्र कुपोषित मुलांच्या पालकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. तसेच या मुलांच्या वजनात वाढ होऊन त्यांचे श्रेणीवर्धन होण्यासाठी वैज्ञानिक पध्दतीने तयार केलेला ऊर्जायुक्त पोषण पूरक आहार (energy dense nutritious food) मुलांच्या पालकांना सुपूर्द करण्यात आला.

सदर नागरी बाल विकास केंद्रातून अति तीव्र कुपोषित मुलांना दिवसभर ठेवण्यात येणार असून प्रत्येक २ तासांनी ऊर्जायुक्त पोषण पूरक आहार भरविण्यात येणार आहे. त्यांच्या नियमित जेवणासोबत संपूर्ण दिवसांत ९२ ग्राम एवढया आहाराचा त्यांना देण्यात येईल. पुढील ३ महीने करून त्यांचे अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका यांच्यामार्फत नियमित निरीक्षण व नियंत्रण करण्यात येणार आहे. या मुलांचे वजन साधारण श्रेणीत आल्यानंतर नागरी बाल विकास केंद्रातून सोडण्यात येईल. तसेच आरोग्य विभागाकडून आवश्यक ते औषधोपचार करून घेण्यात येणार आहेत. अशाप्रकारे ७१ नागरी बाल विकास केंद्रांच्या माध्यमातून कुपोषितमुक्त मुंबईसाठी महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. मंत्री महोदयांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनातून मुंबईतील ही कुपोषित मुले लवकरच सुपोषित होऊन सामान्य मुलांप्रमाणे आनंदाने पुन्हा नाचू- बागडू लागतील असा विश्वास एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

Updated : 11 Feb 2022 9:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top