Nashik Bhujbal Covid Care Center : ३० टक्के बेड महिलांसाठी राखीव
नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेल्या कोविड सेंटरमध्ये महिलांना ३० टक्के बेड राखीव ठेवण्यात आले आहे. वाचा कोण-कोणत्या सुविधा मिळणार...
X
कोरोनाच्या संकटात ऑक्सिजन बेड मिळत नसताना छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये 180 बेडचं नवीन कोविड केअर सेंटर उभारलं आहे. या कोविड सेंटरचं उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. यावेळी पवार यांनी छगन भुजबळ यांचं कौतुक केलं. भुजबळांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा असून हे कोविड केअर सेंटर राज्यातील इतर संस्थाना कोरोनाच्या लढाईत काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असं मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
स्वयंसेवी संस्थानी आजवर तयार केलेले कोविड सेंटर विलगीकरण व्यवस्था म्हणून तयार करण्यात येत होते. मात्र, छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता असलेले नावीन्यपूर्ण कोविड सेंटर उभे राहत आहे. या कोविड केअर सेंटरमधून संकटग्रस्त रुग्णांना मदतीसाठी मोठा आधार मिळेल असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. कोविडचे मोठे संकट देशावर आणि राज्यावर असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्था संघटनाची मदत आवश्यक असून त्यांनी यामध्ये पुढे येण्याची आवश्यकता आहे.
नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेल्या कोविड सेंटरचा आदर्श घेऊन राज्यात इतर ठिकाणी देखील शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करण्यात यावे असे आवाहन करत राज्यातील सहकारी आणि स्वयंसेवी विविध संस्था या नाशिकमधील या कोविड सेंटरची प्रेरणा घेतील अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती शरद पवार यांना दिली. तसेच आभार व्यक्त केले.
असे असेल कोव्हीड सेंटर…
या कोविड सेंटरमध्ये १८० बेडसाठी ऑक्सिजन लाईनची स्वतंत्र जोडणी केलेली आहे. या ऑक्सिजन लाईनचे मटेरियल सुरत येथून मागवून ही ऑक्सिजन लाईन उभारण्यात आली आहे.
गुजरातमधून आणले साहित्य...
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले वेपोरायझर बडोदा, गुजरात येथून आणण्यात आले आहे. ऑक्सिजन व्यवस्थेसाठी लागणारे ड्युरा सिलिंडर वेल्लूर, कर्नाटक येथून आणण्यात आले आहेत तर पुरेशा ऑक्सिजन साठ्यासाठी आवश्यक असलेले १ केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक पुणे येथून आणण्यात आणले आहे. १८० रुग्णांना सतत पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे रुग्णांच्या सोयीसाठी दिल्ली येथून ५० एअर कुलर मागवून या ठिकाणी बसविण्यात आलेले आहे. सर्व बेडवर स्वतंत्र ऑक्सिमिटर आहे. सर्जन डॉ.अभिनंदन जाधव यांच्यासह ६ एमबीबीएस व ४ बीएचएमएस असे ११ डॉक्टर तसेच १५ प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक करण्यात आली आहे.
अशी असेल व्यवस्था... या कोविड सेंटरसाठी एक अॅडमीन, तीन फार्मसी ऑफिसर, पाच रिसेप्शनिस्ट, १५ वार्ड बॉय, १० सिक्युरिटी गार्ड भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉक्टर तसेच नाशिकमधील नामांकित फिजिशियन डॉ.शितल गुप्ता आणि डॉ.अतुल वडगांवकर यांचेही सहकार्य लाभणार आहे. रुग्णांना ने-आण करण्यासाठी किंवा संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या ठिकाणी रुग्णांना औषध उपचारासह दोन वेळचे पौष्टिक जेवण, अंडी आणि नाश्ता, फळांचा रस, चहा, रात्रीचे हळदयुक्त दुध, शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. त्याचसोबत रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी वाचनालय व बुद्धिबळ, कॅरम इत्यादी खेळ, कलाप्रेमींसाठी चित्रकलेची व्यवस्था यांसह करमणुकीसाठी ३ मोठे स्क्रीन तसेच दोन दूरदर्शन संच आणि चार मोबाईल चार्जर युनिट यांसारख्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
मोठ्या स्क्रीनवर सकाळी योगा व प्राणायमचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर मधुर संगीत, चित्रपट, सध्याच्या घडामोडी यासह सायंकाळी आयपीएल क्रिकेटच्या मॅचेस दाखविण्यात येणार आहेत. जेणेकरून रुग्णांचे मनोरंजन होऊन त्यांचा मानसिक ताण कमी होईल. तसेच आजाराची भीती दूर होण्यासाठी मदत होणार आहे.
नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. येथील काही ७० टक्के बेड पुरुषांसाठी तर ३० टक्के बेड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.