नोकरी सुटलेल्या महिलांसाठी राजस्थान सरकारची बॅक टू वर्क योजना... काय आहे ही योजना?
X
देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये महिला मतदारांचा टक्का दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्य सरकारांनी महिला केंद्रीत योजना राबवायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश मधील निवडणुकांमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी 40 टक्के महिलांना विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. एकंदरीत सर्वच राजकीय पक्ष महिला केंद्रित योजना राबवत असल्याचे दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून राजस्थान सरकारने विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी एका नवीन योजनेची घोषणा केली आहे. या योजनेमध्ये, लग्नानंतर नोकरी सोडावी लागणाऱ्या महिलांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
राजस्थान सरकारने खाजगी क्षेत्राच्या मदतीने नोकरी सोडून गेलेल्या या महीलांना पुन्हा नोकरी मिळावी किंवा घरून काम करता यावे यासाठी राज्य सरकारने बॅक टू वर्क योजना आणली आहे. या योजनेला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंजुरी दिली आहे.
या योजनेअंतर्गत, पुढील तीन वर्षांत 15 हजार महिलांना खासगी क्षेत्राच्या मदतीने पुन्हा नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेमध्ये विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या महिला कामाच्या ठिकाणी जाऊ शकणार नाहीत, त्यांना घरून काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
या महिलांना नोकरी देण्यासाठी राज्य सरकारचं महिला मंत्रालय सीएसआर संस्थेच्या मदतीने महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सिंगल विंडो सिस्टीमची सुविधा विकसित केली जाणार आहे. याशिवाय या महीलांना RKCL मार्फत कौशल्य प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
या संदर्भात एक पोर्टल तयार करण्यात येणार असून
या पोर्टलवर रोजगार संदर्भात माहिती दिली जाणार आहे. तसेच या पोर्टलवरती महीला अर्ज करू शकतात. यासोबतच, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मॉनिटरिंग कमिटी देखील स्थापन करण्यात येणार आहे.