स्त्रियांना हे स्वीकारावं लागतं !
X
आपल्या समोर वाढलेल्या परिस्तिथीचा स्वीकार केला ना.. की सारं काही सोपं होऊन जातं.
काल ट्रेनमध्ये एका 30 ते 35 वर्षांच्या बाईला कानातले, अंगठी, केसांतले क्लिप्स म्हणजेच अशा छोट्या छोट्या गोष्टी विकताना पाहिलं. आता तुम्ही म्हणाल, यात काय नावीन्य?? हे तर 10 वर्षांच्या मुली पण ट्रेनमध्ये करतात. पण त्यात नावीन्य हे होतं की ती बाई गरोदर होती. अगदी 2 ते 3 महिन्यांची नव्हे तर तब्बल 7 ते 8 महिन्यांची.
इतकं मोठं पोट घेऊन दोन्ही हातात सामान घेऊन अगदी वाऱ्यासारखी ती ट्रेनच्या गर्दीत वावरत होती. प्रसंगी त्या गर्दीतल्या चढणाऱ्या-उतरणाऱ्या बायका तिच्या पोटावर धक्केही मारत होत्या. ज्याक्षणी ती एक पॅसेज ओलांडून दुसरीकडे जात होती आणि त्याचवेळी दुसरी बाई तिच्या बाजूने घुसण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी त्या बाईचा जोरात तिच्या पोटावर लागलेला धक्का बघून माझे डोळे क्षणभर मिटले आणि मुठी आवळल्या गेल्या. किती दुखलं असेल तिला..? पण ही पठ्ठी अशी काय वावरत होती जणू काही तिच्या आतमध्ये अजून एक जीव वाढतोय याची तिला जाणीवच नव्हती.
हा प्रकार बघून मला फार वाईट वाटलं.. कारण 8 महिन्यांची गरोदर असूनही जी स्त्री जीवावर उधार होऊन पैसा कमवते तिची किती मजबुरी असेल.. किंवा सत्य परिस्तिथी तिने किती सहजरित्या accept(स्वीकार) केली असेल.
आज ऑफिसमध्ये बघते तेव्हा अगदी 6 महिने पण होत नाही तोच बाळांतपणातील सुट्टी (maternity leave) घेऊन बायका घरी बसतात. स्वतःला, आपल्यात रुजणाऱ्या जीवाला त्या जिवापलीकडे जपतात. प्रत्येक महिन्याला सोनोग्राफी, बाळाची वाढ नीट होण्यासाठी औषधं, पोषक आहार घेतात. तर दुसरीकडे या स्त्रिया कोणत्याही औषधपाण्याशिवाय आहे ते सत्य स्वीकारून आपलं कुटुंब सांभाळतात.
त्यामुळे यातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे..पहिलं म्हणजे प्रत्येक महिलेने बाई(स्त्री) असण्याचा गर्व बाळगावा.. कारण ती या जगाची निर्मिती करताना तिच्यासोबत वाढणाऱ्या गोष्टींना (कुटुंबीयांना)कधीच खुंटू देत नाही. दुसरी म्हणजे रडत-कुढत बसण्यापेक्षा हे असंच आहे..! आणि हे असंच राहणार आहे..! जे होईल ते होईल.. बघून घेऊ, हे स्वीकारून, संकटातून मार्ग काढून स्वतःचं आयुष्य आनंदी बनवणं हे प्रत्येकाला जमावं. आणि प्रत्येकाने आपल्या जवळच्या व्यक्तीच्या संघर्षाचा कायम आदर करावा.
-प्रतीक्षा मोरे.