जीवनशाळेची सहल...
X
सहल म्हटलं की किती छान वाटत ना... मौज, मजा, मस्ती, निसर्गरम्य ठिकाणे... आणि त्यामध्ये मित्रमैत्रिणी-शिक्षक शिक्षिका त्यांच्यासोबत धम्माल करण्याची मज्जा काही औरच असते. शाळेची सहल खरतर शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी एक जिव्हाळ्याचा विषय असतो. अशीच सहल रयत भवन जीवनशाळेची गंमत जंमत सहल उत्साहात पार पडली. या रयत भवन शिक्षण संस्थेमार्फत पारंपरिक शिक्षण पद्धतीबरोबर कौशल्य आधारीत शिक्षण देण्यासाठी दरवर्षी एक सहल असतेच या सहलीचे प्रसंग रयत भवन शिक्षण संस्थेचे सदस्य डॉ.संजय दाभाडे यांनी आपल्या लेखात मांडला आहे.
रयत भवन , विश्रांतवाडी येथे आमची वस्तीतील मुलांसाठी ' जीवनशाळा ' आहे. रोज संध्याकाळी मुलांचे वर्ग होतात, सांस्कृतिक कार्यक्रम , पुस्तक वाचन , महानायकांचे स्मृतिदिन असे नियमितपणे सुरु असते आणि दरवर्षी एक सहल पण असते .आजच्या सहलीत २५ मुले व आम्ही सगळे मिळून ३२ जण सहलीला गेलेलो पुब्याजवळील कार्ला येथे.
पहाटे ६ वाजता निघायचं असं ठरवलं होतं पण अखेरीस ६ .३० ला आम्ही निघालो. पहाटे ४ .३० वाजता उठून आम्ही मुलांच्या नाष्ट्यासाठी छान कांदा - पोहे मोठे थर्मास भरून कॉफी बनवली , बघता बघता पहाटेच्या गारव्यात सहल निघाली .
मुले बस मध्ये गाणे लावून धमाल नाचत होती.
वडगाव मावळ जवळ बस थांबवून सगळ्यांनी मस्त अमृततुल्य चहा घेतला.
धमाल करत सहल कार्ल्याला पोहोचली नि सगळ्या पायऱ्या मुलं झपाझप चढून गेली.
आम्हा संयोजकांना त्रास होऊ नये म्हणून मुले खूप शिस्तीने वागत होती नि सतत दोन दोन च्या रांगांचा नियम पाळत होती.
लेण्यांपर्यंत जाण्यासाठीच्या शेकडो पायऱ्या मुलांनी एका
दमात पार पाडल्या.
मुलांची हीच एनर्जी विलक्षण मोलाची असते , ह्या
एनर्जीला फक्त संधी हवी असते हे अश्या
वेळी प्रत्ययास येते.
अखेरीस आम्ही लेण्यांपर्यंत पोहोचलो.
इसवीसन पूर्व २०० ते इसवीसन ५०० वर्षे ह्या कालखंडातील कार्ल्याच्या लेण्या आहेत. त्यातील
मुख्य चैत्यगृह ( प्रार्थना स्थळ ) खूपच भव्य नि देखणं आहे.
मुले ते बघून भारावून गेली.
स्तूपा समोर मुलं बसली असतांना त्यांच्यासमोर
एकूण बुद्धिस्ट कालखंड अगदी थोडक्यात मांडला . लेण्यांची निर्मिती , तत्कालीन भारतीय समाजाची सांस्कृतिक भरभराट , नि बुद्धांच्या संघातील स्रियांचं स्थान ह्याबद्दल थोडं बोलून मुलांना आवाहन केलं कि इथून प्रेरणा घ्यायची ती स्त्री -पुरुष समतेची .
त्यांनतर वरच्या भागातील विहार ( आरामाचे स्थान )
बघितली ....तिथून संपूर्ण निसर्गरम्य परिसर किती आल्हाददायी वाटत होता....मुलं
ते सगळं डोळ्यांत नि हृदयात साठवत असावीत .....वस्त्यांमध्ये , दाटीवाटीच्या नि पत्र्याच्या खोल्यांत राहणाऱ्या मुलांना निसर्गाचा हा उल्हसित करणारा अनुभव किती सुंदर वाटत असेल हे जाणवलं नि छान ठिकाणी राहण्याचं ह्या मुलांच्या आयुष्यात येईल का , ह्या प्रश्नाने अस्वस्थ वाटलं ....ह्या मुलांमधून एकही मुला मुलीची शाळेतून गळती होऊ नये ह्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करायला हवी असं ठामपणे ठरवलं.
त्यांनतर आम्ही सगळे एका शेतात झाडाखाली बसलो , छान वनभोजन झालं , मुल भरपूर खेळलीत.
हळू हळू संध्याकाळ होत गेली नि आम्ही बसमधून माघारी निघालो. बस मध्ये मुले पूर्णवेळ नाचत गात होती.
मध्ये थांबून आम्ही गरमा गरम कॉफी घेतला नि अखेरीस आमच्या रयत भवनला पोहोचलो ...रात्र झाली होती...
दुसऱ्या दिवशी २६ जानेवारी ....मग मुलांनी सर्कल केलं , एका मुलीने तिरंगा घेऊन तो उंच फडकावला , राष्ट्रगीत म्हणत झिंदाबाद चा नारा देऊन , ' हिंदू मुस्लिम सीख इसाई , हम सब भाई भाई ' , इत्यादी नारे देत मुलं पालकांचे हात हातात घेऊन घराकडे दिसेनाशी झाली.
ह्या सहलीच्या यशस्वीतेसाठी जीवनशाळेच्या शिक्षिका आशाताई पारडे , जीवनशाळेचं सर्व कामकाज बघणारा आमचा तरुण मित्र माजिद शेख , जनवादी महिला संघटनेच्या उत्साही कार्यकर्त्या कॉम्रेड हिराबाई घोंगे , माझी पत्नी डॉ.संगीता ....सर्वांच्या कष्टातून हि खूप छान सहल यशस्वी पार पडली.
-डॉ.संजय दाभाडे,रयत भवन शिक्षण संस्थेचे सदस्य