खमक्या सरपंचताई कविता भोंडवेंची धैर्यगाथा
X
शरीर कधीच अपंग नसतं अपंग असतं ते मन. मनात काहितरी चांगलं करण्याची जिद्द असेल तर सर्व काही शक्य होतं. याचीच प्रचिती दिलेय नाशिक जिल्ह्यातल्या दहेगाव आणि वाघूळ या दोन गावांच्या सरपंच असणाऱ्या कविता भोंडवे यांनी. कविता अपंग असल्या तरी गावच्या विकसाची त्यांची जिद्द हट्ट्याकट्ट्यांनाही लाजवणारी आहे.
आज कविता भोंडवे यांची ओळख करुन देण्याचं कारण की, ‘ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक ठिकाणी नेट नाही, स्मार्ट फोन नाहीत मग मुलांनी शिकायचं कसं? सरकारने काहीतरी करावं.’ अशी मागणी राजकीय नेते, संघटना करत आहेत. पण कविता यांनी गावातील मुलांचे शैक्षणीक नुकसान होऊनये म्हणून एक वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी ‘तुमच्याकडील जुने बिघडलेले स्मार्ट फोन मला द्या…’ असं गावकऱ्यांना आवाहन केलं.
गावकऱ्यांनी कविता यांच्यावर विश्वास ठेऊन आपल्याकडील जुने बिघडलेले मोबाइल ग्रामपंचायतीत जमा केले. गावकऱ्यांनी दिलेले सर्व मोबाईल घेऊन कविता यांनी ते दुरुस्त करुन घेतले आणि गावात ज्या मुलांकडे शिक्षणासाठी स्मार्ट फोन नाहीत अशांना ते दिले. आज हि मुलं आनंदाने शिकत आहेत.
ते म्हणतात नं रिसोर्सेससाठी कधीही थांबून राहू नका. प्रयत्न करा मार्ग नक्की सापडेल. हे कविता यांनी खरं करुन दाखवंल आहे.
कविता गेल्या 9 वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातल्या दहेगाव आणि वाघूळ या दोन गावांच्या सरपंच आहेत. पण सुरुवातीला त्यांना आश्वासक वातावरण नक्कीच मिळालं नव्हतं. 'जी बाई स्वतःला सांभाळू शकत नाही, स्वतः दोन पायांवर चालू शकत नाही, ती गाव काय सांभाळणार' असं त्यांच्या तोंडावर त्यांना सुनावलं गेलं होतं.
सरपंच झाल्यानंतर कविता यांनी महिला बचतगटांचं काम सुरू केलं. त्यायोगे महिलांचं संघटन करावं असा त्यांचा मानस होता. बचतगटांमुळे महिलांचं जे संघटन झालं त्याचा फायदा गावात लवकरच दिसायला लागला. महिला आपल्या प्रश्नांबद्दल बोलायला लागल्या. राजकीय नेत्यांनी महिलांनी बोलणं फार लांबची गोष्ट होती, पण बचतगटांच्या मार्फत त्या कवितांकडे आपली गाऱ्हाणी मांडायला लागल्या.
आता आपलं पद राहो किंवा जावो, राजकारणात सक्रिय असो किंवा नसो महिलांसाठी आयुष्यभर काम करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. "माझं बायांना हेच सांगणं आहे की आयुष्यात सगळं मनासारखं घडतंच असं नाही. पण तुम्ही थांबू नका, बस्स पुढे जात राहा." कविता यांचा हा विचार खुप काही सांगून जातो.