स्त्री आणि सेक्स
वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होण्यात समाधानी लैंगिक जीवनाचा फार मोठा वाटा आहे. वैवाहिक जीवनात सुखदुःखाचा वाटा पतीपत्नीनं समानतेने उचलावा असं जर मानलं, तर लैंगिक जीवनात मात्र ती भोग्य वस्तू का ठरावी? भावनेच्या भरात तिनं आपली इच्छा व्यक्त केली तर तिला वाईट चालीची म्हणायचे आणि क्वचित प्रसंगी तिनं नापसंती दर्शविली, तरी ती पत्नी म्हणून तिच्या मनाविरुद्ध समागम करायचा, हा कुठला न्याय?
X
मला लवकर मरण येईल, असं कुठलं तरी औषध द्या डॉक्टर!" असं समुपदेशकाला एक मध्यमवयीन स्त्री त्राग्यानं म्हणाली. तिला शांत करत समुपदेशकाने तिची माहिती विचारली, तेव्हा कळालं की, बाई अतिशय त्रासलेली होती. निर्व्यसनी नवरा मोठ्या पगाराच्या चांगल्या नोकरीवर होता. घरात आर्थिक सुबत्ता होती. मुलाबाळांमुळं घरात गोकुळ नांदत होतं. तरीही ही बाई अतिशय त्रासलेली होती. आपली हकीकत डॉक्टरला सांगत ती म्हणाली, " काय सांगू डॉक्टर तुम्हाला? कमी म्हणावं, असं घरात काहीही नाही. सगळं आहे, पण माझा त्रास ना कुणाजवळ सांगता येतो, ना बोलता येतं. त्यामुळे मरून जावंसं वाटतंय."
"असा काय त्रास होतो आहे तुम्हाला?"
"काय सांगू डॉक्टर, माझ्या नवऱ्याला कधीही झोपायचं असतं माझ्यासोबत! वेळ नाही, काळ नाही. घरात कोणी आहे-नाही. त्याला कशाचं काही नसतं. त्याची इच्छा झाली की तो बोलवतो. माझं तर मरणच आहे याच्यात. घरात सासू सासरे मलाच बोल लावतात. कामं उरकली नाही, तरी नवरा चिडतो. कुणाला काय सांगावं, तेच समजत नाही. नवऱ्याला काही सांगायला गेलं की म्हणतो, तू आहेसच इतकी सुंदर!" या हकीकतीवरून आपल्या लक्षात येतं, की नवऱ्याला त्याची बायको सुंदर आहे, इतकंच कळतंय. मात्र ती या सुखापासून वंचित राहाते आहे, हे मात्र त्याला कळत नाहीय. किंवा स्त्रीचीही इच्छा होऊ शकते कामसुखासाठी, याची त्याला जाणीवच नाहीय.
लैंगिक संबंधांच्या बाबतीत आपण अनेक गैरसमजुतींचे बळी आहोत. सेक्स म्हणजे आपली मर्दुमकी गाजवायचे ठिकाण. सेक्सचा सरळ सरळ संबंध हा शारीरिक स्वास्थ्याशी जोडला गेला आहे. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या पुरुष हा स्त्रीपेक्षा वरचढ असल्याने स्त्रीला कामसुख देण्याची जबाबदारीही पुरुषाचीच! मात्र ही जबाबदारी पुरुषाकडे देताना आपण स्त्रीला इथेही दुय्यमच स्थान दिलं. लैंगिक क्रियेत तिचा सहभाग हा पुरुषाइतकाच महत्वाचा आहे. स्त्री पुरुषाची बरोबरी करूच शकत नाही, म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, मुलबाळ वगैरे गरजा भागत असताना इतर गोष्टींत पत्नीने हरकत घेऊ नये, असे अनेक सुशिक्षित तरुणांचा समज (?) आहे. पत्नीच्या भावनांची कदर व हक्कांबाबत विचार करायची यांची तयारी नाही. पत्नी हे एक शरीर असून ते केवळ भोगण्यासाठी आहे, असंच समजून अनेक जण वर्षानुवर्षे संसार (?) करत राहतात. शरीराच्या केवळ बाह्यरूपात गुंतल्यामुळे कामभाव तृप्तीच्या अंतरंगापर्यंत हे पोहोचूच शकत नाहीत.
केवळ वीर्यपतन करण्यासाठी स्त्रीच्या योनीचा पुरुषानं वापर करणं म्हणजे संभोग, असा संकुचित अर्थ अनेक जण लावतात. असा समज केवळ पुरुषच करून घेतात, असं नाही, तर अनेक स्त्रियाही असा गैरसमजाच्या बळी आहेत. वास्तविक पाहता अशा प्रकारे झालेला संभोग हा कधीही आनंददायी असू शकत नाही. त्यातून तृप्ती अथवा शांती मिळत नाही. उलट इंद्रियसुखाबाबत चुकीच्या कल्पना तयार होऊन, वासना धगधगत राहते. सेक्स म्हणजे पती पत्नीच्या प्रेमाचे सहजपणे, उत्स्फुर्तपणे लिंगाद्वारे व्यक्त झालेला आविष्कार आहे. निवांत क्षणी पती-पत्नी एकमेकांच्या ओढीने एकमेकांत मिसळतात. 'प्राणिजगतामध्ये सेक्स म्हणजे समागमाची इच्छा- डिझायर टू कॉप्युलेट! पण मानवाच्या सेक्समध्ये झालेल्या उत्क्रांतीमुळे सेक्स केवळ क्रिया न राहता एक नाते बनले आहे. म्हणूनच मानवात सेक्स हा रोमँटिकपणाचा प्रवास असून त्याचा शेवट लिंग-योनी संबंध आहे. म्हणजेच हा एंड पॉइंट आहे; सेंट्रल पॉइंट-केंद्रबिंदू नाही; परंतु हा रोमँटिक प्रवास टाळून लिंग-योनी संबंधाला जेव्हा केंद्रबिंदू केले जाते, म्हणजे त्याच्याचसाठी सर्व काही केले जाते, तेव्हा लैंगिक समस्या उद्भवतात. मात्र या सर्व प्रवासात स्त्रीचाही सहभाग असणं गरजेचं असतं.
व्यसनाधीनता आणि सेक्स
21DaysLockDown : घरबसल्या लोक सर्च करत आहेत 'देसी सेक्स' आणि 'पोर्न फॉर वुमेन'
पुरुषाप्रमाणेच स्त्रीही या दिव्य अनुभवाची अधिकारी आहे. दोघांपैकी एकाला जर संभोगाची इच्छा नसेल तर दुसराही त्या वेळेस संभोग न करण्यातच समाधान मानतो, कारण त्याने तृप्तीचा अनुभव घेतलेला असतो. त्यामुळे रोजच हे घडले पाहिजे, याचा अट्टाहास नसतो. तेवढी स्थिरता बुद्धीला आलेली असते.