वादग्रस्त इंदुरीकरांच्या पाठीशी का उभी राहतेय नारीशक्ती
X
सम विषम तारखेच्या वादग्रस्त विधानावरुन सुरु झालेलं इंदुरीकर महाराजांचं प्रकरण अधिकच तापत चाललंय. आपल्या विनोदी किर्तनशैलीमुळे प्रसिद्ध इंदुरीकरांचं वक्तव्य त्यांच्या अंगलटी आलंय. त्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. त्यांच्यावर राजकीय वर्तुळातूनही टीकाही करण्यात आली. मात्र, या वादाला खतपाणी मिळालं ते भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या विराधामुळे आणि इंदुरीकरांच्या समर्थकांकडून त्यांना केलेल्या ट्रॉलींगमुळे... हा वाद आता इंदुरीकर महाराज विरुद्ध तृप्ती देसाई असा रंगलाय.
वास्तविक पाहता महिलांविरोधी किंवा महिलांवर हास्यात्मक वक्तव्य करण्याची इंदुरीकर महाराजांची ही काही पहीलीच वेळ नाही. यापुर्वीही त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. परंतू कीर्तन सोडून शेती करतो म्हणण्याची पाळी इंदुरीकर महाराजांवर पहील्यांदाचं आली आहे. आपण त्यांची काही वादग्रस्त वक्तव्य पाहुयात ...
- "चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."
- "पोरीच्या अंगात जितके कपडे कमी, तितकी पोरगी फटकावली पाहिजे."
- "नोकरीवाल्याच्या बायकांनो सांगा, काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज."
- "नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"
- "पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म?"
- "पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे."
- "गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या."
पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने इंदुरीकरांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही गुन्हा दाखल झालाच पाहीचे अशी भूमीका घेतलीय. अशातच तृप्ती देसाई यांनी अहमदनगर पोलिस अधीक्षकांना भेटून ४ दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन करु असा इशारा दिला आहे.
तृप्ती देसाई (Trupti Desai) यांची पोलिस अधीक्षकांची भेटही चांगलीच चर्चेत आली. या भेटीदरम्यान तृप्ती यांनी इंदुरीकरांना तिथे उपस्थित राहण्याचं आव्हान दिलं होतं. मात्र, “तु तारिख, वेळ आणि ठिकाण सांग, तुला तीथं येऊन *** करुन मारीन’ असं म्हणत ‘तु येऊनच दाखवं’ असं धमकीवजा आव्हान शिवसेना नेत्या स्मिता अष्टेकर (Smita Ashtekar) यांनी दिलं.
https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/491562775088193/?t=2
यानंतर प्रकरणाची वाढती तीव्रता लक्षात घेता इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) काल पत्रकाद्वारे माफी मागितली. “माझ्या वाक्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असं इंदुरीकर महाराज म्हणाले. परंतु माफीचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. माफीनंतरही तृप्ती देसाईंचा आक्रमकपणा कमी झाला नाही.
“आम्हाला नगरमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. प्रत्यक्षात कुणीही आडवे आले नाही. अडवणार म्हणणारे पैसे देऊन आणलेले कार्यकर्ते असावेत. त्यांचा काही तरी लाभ होत असावा, त्यामुळे ते आमचा विरोध करीत आहेत,” अशी टिकाही देसाई यांनी केली. पुढे त्यांनी गुन्हा दाखल न झाल्यास इंदुरीकर महाराजांना काळे फासण्याचा, तसेच मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला.
या वक्तव्यावर आता मनसे नेत्या रुपाली ठोंबरेही (Rupali Thombare) मैदानात उतरल्या आहेत. “आता हे खूप अती होतंय, तू येच ग श्रुपनखा, कोणच्या तोंडाला काळे फासले जाते ते बघ तुझ्या उघड्या डोळ्यांनीच. तू काळ फासायला असलीस तर आम्हीच एक लाख रुपये देऊ तुला. असे खुले आव्हान पाटील यांनी दिलं आहे. तसेच सदसदविवेकबुद्धीने धर्माचा प्रचार करत एखादा दाखला दिला तर त्यासाठी गुन्हा दाखल करण्याची काहीच गरज नसते. असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे इंदुरीकर महाराजांच्या बाजुने अनाथांची माय सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) याही उभ्या राहिल्या आहेत. “इंदुरीकर हे चांगले व्यक्ती आहेत,” असं मत त्यांनी व्यक्त केलं. “काही पौराणिक दाखले देत असताना किर्तनकार इंदोरीकर महाराज नकळत बोलून गेले असतील. त्याचं इतकं का भांडवल करताय? टीकाकारांनीही महाराजांच्या शब्दाला धरुन न बसता त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन वाद मिटवता घ्यावा.” असा प्रेमळ सल्ला सिंधुताईंनी टिका करणाऱ्यांनाही दिला आहे.
“इंदुरीकरांचं समाजासाठी योगदान फार मोठं आहे. त्यांनी आपल्या किर्तनांमधून समाज प्रबोधन केलं. या माध्यमातून त्यांनी तरुणांना वाईट मार्गातून बाजूला तर केलच शिवाय त्या तरुणांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्रही दिला. त्यामुळे इंदुरीकरांनी आपण चुकलो असं म्हणत आपलं कार्य सुरु ठेवावं.”