स्त्री म्हणजे शक्ती...
X
कालचा संभाजी राजे मालिकेचा भाग पाहून डोळे पाणावले नाहीत असा इसम महाराष्ट्रात नसेल.
महाराणी येसूबाईची कालची दाखवलेली भूमिका मला इतिहासाशी तंतोतंत वाटते.
वास्तविक शिवाजी महाराजांची 8 लग्न झाली होती, मात्र संभाजी महाराजांनी एक आणि एकच विवाह केल्याचे पुरावे आहेत, या व्यतिरिक्त उपस्त्री बाबत काही मिथक पसरवले गेले. हे सांगायचं कारण म्हणजे संभाजी महाराज यांचे महाराणी येसूबाईंवर किती प्रेम होते हे अधोरेखित करणे होय. आपल्यावर अफाट प्रेम करणाऱ्या व्यक्तीची अत्यंत क्रूर आणि निर्घृण हत्या झाल्यावर धीरोदात्त भूमिका घेणाऱ्या येसूबाई काल दाखवल्या...
माहेरवर असणारा फितुरीच्या ठपका, लहानगा शाहू आणि पतीचा मृत्यू याहून काय आभाळ कोसळायचं बाकी होतं? पण या माउलीने नेत्रातून अश्रू बरसवण्याऐवजी तलवार उपसली. कालचा भाग इथेच संपला आणि मालिकाही संपली, पण पुढे काय???
ती उसळलेली तलवार, विधवा आलाप करण्याऐवजी हरहर महादेव ची घोषणा देत "औरंग्या पती मारू शकतोस स्वराज्य मारू शकत नाहीस, प्राण घेऊ शकतोस पण स्वाभिमान घेऊ शकत नाहीस..." म्हणत फुंकलेले रणशिंग केवळ एक भावनिक आणि तात्पुरत्या गर्जना नव्हत्या, वास्तविक शंभुराजेंच्या परम आणि अद्वितीय बलिदानानंतर येसूबाई आणि शंभुपुत्र शाहू बद्दल लोकांच्या मनात अनुकंपा आणि सहानुभूती होती. माझा मुलगा छत्रपती बनून बापाच्या हत्येचा बदला घेईल हा सामान्य विचार त्यांनी केला नाही, महाराणी येसूबाई बनण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या कुलमुखत्यार होत्या, या प्रसंगातही त्यांनी विवेकी आणि मुत्सद्दी भूमिका घेतली, गडावर अनेक सरदार हे राजाराम महाराजांना मानणारे होते, तसेच शाहू वयाने फारच लहान होते, शाहूंना गादीवर बसवून पुन्हा फंदफितुरी आणि गृहकलह होऊ नये या विचारांती त्यांनी राजाराम महाराजांना गादीवर बसवलं,आणि त्यांना हाताशी धरून त्या राजकारभार पाहू लागल्या. शंभुराजेंच्या हत्येनंतर स्वराज्य भेदरून जाईल आणि शरण येईल या खोट्या आशेवर जगणारा औरंग्या पुन्हा स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी सरसावला होता, त्याच्या उन्मत्त फौजांनी रायगडाला वेढा दिला, राजाराम महाराज छत्रपती झाले होते, स्वराज्याच्या धन्याने वेढ्यात फार काळ अडकून राहणे घातक होते; त्याचमुळे वेढा फोडून राजाराम महाराजांनी जिंजी जवळ करावी आणि तिथेच स्वराज्याची नवी राजधानी उभारत राजकारभार पुढे न्यावा हा धाडसी निर्णय त्या स्त्री ने घेतला, स्वतःला आणि स्वतःच्या लेकराला क्रूरकर्म्या औरंग्याच्या फौजेच्या वेढ्यात अडकवून त्यांनी स्वराज्य तारलं!
राजाराम जिंजीला पोहोचले तरी रायगड पडला नाही, एक नाही दोन नाही तर तब्बल आठ महिने! तब्बल आठ महिने महाराणी येसूबाईंनी रायगड झुंजत ठेवला...
याहून मोठ्या काळजाची स्त्री मी इतिहासात पाहिली नाही!
येसूबाईंना अटक झाली, तब्बल तीन दशकं त्या शत्रूच्या छावणीत होत्या.
आता त्याचा इतिहासही पाहू,
ज्यावेळी येसूबाईंना अटक झाली त्यावेळी त्यांचं वय 25 ते 30 च्या दरम्यान असावं (दुर्दैवाने येसुबाईंच्या जन्मतारखेचा उल्लेख मला कुठे सापडला नाही, तज्ञांनी मार्गदर्शन करावं.) संभाजी महाराजांचं मृत्यू वेळी वय 31 वर्ष होतं, याहून हा अंदाज बांधता येईल.
पतीची निर्घृण हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या छावणीत राहणं! हा विचारच करवत नाही.
त्यात 25-30 वर्षाचं वय आणि स्त्री जातीच्या अब्रूचे धिंडवडे काढणाऱ्या मोगली छावणीत वास्तव्य!
आता विचार करा, एखाद्या सामान्य स्त्री ने अशा वेळी मृत्यू जवळ केला असता, पण त्या वीरांगना होत्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई होत्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या अर्धांगिनी होत्या.
30 वर्ष नजरकैद सुद्धा इतकी सामान्य नव्हती, त्यातली पहिली 17 वर्ष महाराष्ट्रात स्वतःच्या राज्यात, जिथं महाराणी बनून वावरल्या तिथं कैदी बनवून वावरावे लागले, हा अपमान पचवणं किती जिकरीचे असेल!
जिथे फौजेचा डेरा तिथं वास्तव्य, हि हेळसांड सहन करावी लागली.
नंतरची 12-13 वर्ष त्यांना दिल्लीत स्थलांतरित केलं, तिथं जाणून बुजून शाहू राजेंना आणि येसूबाईंना वेगवेगळ्या कैदेत ठेवलं!
मुद्दामहून माता पुत्राची ताटातूट केली, ह्या सगळ्या मानसिक खेळया खेळून येसूबाईंचे कणखर मन तोडायचे, त्यांचे मनोधैर्य नेस्तनाबूद करायचे प्रयत्न झाले पण त्यातूनही ती वज्रहृदयी स्त्री डगमगली नाही!
तब्बल तीस वर्षानंतर तत्कालीन मोगल सम्राट फारूखसियर याच्या विरोधात बाळाजी विश्वनाथ, शाहू महाराज यांनी तत्कालीन मोगल सुभेदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत देऊन महाराणी येसूबाईंची सुटका करण्यात आली...
हा इतिहास इथंही संपत नाही, स्वराज्यात परतल्यावर मराठ्यांच्या गादीचे कोल्हापूर आणि सातारा असे दोन भाग पडल्याचे त्यांनी पाहिले, दुफळीने स्वराज्य पुन्हा पुन्हा धोक्यात येईल हे जाणून त्यांनी तत्कालीन कोल्हापूर गादीचे संभाजी राजे आणि सातारा गादीचे शाहूराजे यांच्यात 1730 च्या सुमारास मैत्रीपूर्ण तह घडवून आणला, 'वारणेचा तह' म्हणून याचा इतिहासात उल्लेख आढळतो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी सर्व हालअपेष्टा, यातना सहन करणाऱ्या येसूबाईंनी मृत्यू प्रसंगी स्वराज्याची पताका नर्मदा पार फडकताना पाहिली, हे त्यांच्या बलिदानाचे त्यांना मिळालेले फळ म्हणता येईल...
आम्हाला केलेला 'जोहर' खूप अभिमानाने सांगितला जातो; मात्र दुर्दैव मराठ्यांचे आणि महाराष्ट्राचे, आमच्या महाराणी येसूबाईंनी आजन्म जोहरची अग्नी अंगावर झेलत वात बनून पेटत ठेवलेली स्वराज्याची ज्योत सांगितली जात नाही.
स्वराज्याच्या हवन कुंडात समिधा बनून जाळलेले सर्वस्व सांगितलं जातं नाही...
महाराणी येसूबाईंसाहेबांना मानाचा मुजरा.
© Ashutosh Ashok Shipalkar