Home > रिपोर्ट > इतिहासाने राजघराणी वगळता इतर महिलांची दखल का घेतली नाही?

इतिहासाने राजघराणी वगळता इतर महिलांची दखल का घेतली नाही?

इतिहासाने राजघराणी वगळता इतर महिलांची दखल का घेतली नाही?
X

इतिहास! वर्तमानातील प्रत्येक क्षण हा इतिहासात जमा होत असतो. त्यामुळे घडून गेलेल्या गोष्टी या कायम आपल्याला इतिहासातच सापडतात. त्या वाचताना आपण त्यात अक्षरशः रमून जातो. इतिहास शोधताना आपण आधी नजीकच्या गोष्टींपासून सुरू करता करता आणखी मागे मागे गेलो आहोत. पण हाच इतिहास आपल्याला कधी कधी अर्धवट माहिती देतोय का? असा प्रश्न यापुर्वीही अनेकदा विविध मुद्द्यांमुळे उपस्थित झाला आहे. साहजिक आहे कारण इतिहासदेखील माणसांनीच लिहिला आहे. लिहिणारी व्यक्ती कोणत्या हेतुने तो लिहितेय हे देखील अशावेळी महत्वपुर्ण ठरतं. असं म्हणण्याचं कारणही आहेच जे पुढे या लेखात आपल्याला उलगडेलच!

आपण जर इतिहासात डोकावलो तर त्यावेळी स्त्रियांना मानसन्मान सोडा पण त्यांचं अस्तित्व हे फक्त चुल आणि मुल इथपर्यंतच मर्यादीत होतं. हा आता आपण म्हणाल की जिजाऊ, सईबाई, सोयराबाई, धाराऊ या कोण होत्या? आपलं म्हणणं बरोबर असलं तरी त्या राजघराण्याशी निगडीत होत्या. या किल्ल्यांपासून दुर असलेल्या इतर मावळ्यांच्या, सेनापतींच्या, किल्लेदारांच्या, सरसेनापतींच्या पत्नींची नावं आपल्या वाचनात आल्याचं आपल्याला आठवतंय का? म्हणजे नेतोजी पालकरांच्या पत्नीचं नाव, येसाजी कंक यांच्या पत्नीचं नाव, सरसेनापती हंबीरराव यांच्या पत्नींचं नाव आपल्याला कुठे वाचल्याचं आठवतंय का? अगदी हाच प्रश्न गेल्या काही दिवसांत प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांनी देखील उपस्थित केला होता.

प्रविण तरडे यांचा २७ मे ला सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होतोय. या सिनेमाच्या लिखाणाला सुरूवात करण्यापुर्वी त्यांनी इतिहासाची पानं चाळायला घेतली. ती चाळताना त्यांच्या सिनेमाचे नायक असलेल्या सरसेनापती हंबीरराव यांच्या पत्नीचं नावच त्यांना कुठे आढळलं नाही आणि त्यांना धक्काच बसला. ज्या मातेच्या पोटी स्वराज्याच्या महाराणी ताराराणी यांचा जन्म झाला त्या माऊलीच्या नावाची नोंदच इतिहासामध्ये नाही. आम्हाला देखील याबद्दल खूप शोधून देखील काहीच माहिती मिळाली नाही. हे किती वाईट म्हणावं लागेल की इतिहासकारांना, बखरकारांना या शूर वीरांच्या अर्धांगिनी बद्दल माहिती देणं सोडा पण साधी नोंद करणंही महत्वाचं वाटलं. या पुरुषप्रधान संस्कृतीचं हे इतकं वाईट देणं आहे.


पुरूषसत्ताक स्त्रिदात्य मानसिकतेमधून इतिहासलेखन

इतिहासाने कधीच महिलांची दखल घेतली नाहीत असं नाही जिजाऊ, ताराराणी, यांच्याबद्दल पुरेशी माहिती या बखरींमध्ये उपलब्ध आहे कारण फक्त एकच ते म्हणजे राजघराण्यातील आहेत आणि म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. हे असं का याबद्दल आम्ही इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांच्याशी संपर्क साधला. तर त्यांनी फक्त एकाच वाक्यात आम्हाला याबद्दल सांगितलं ते म्हणजे, "पुरूषसत्ताक स्त्रिदात्य मानसिकतेमधून आपल्याकडे इतिहासलेखन झालं आहे." या मानसिकतेमुळेच महिलांचं इतिहासातील महत्व कमी करण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तो जाणूनबुजून केला नसेल पण आपल्याकडील पुरूषप्रधान संस्कृतीचे संस्कार झाल्यामुळेच नकळत का होईना पण त्याच मानसिकतेतून इतिहासलेखन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.

वंशवृक्ष लिहिण्याची पद्धत चुकीची!

हाच प्रश्न आम्ही इतिहाकार इंद्रजित सावंत यांना विचारला. त्यांच्या मते हे का केलं गेलं असावं असं आम्ही त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, " आपल्याकडे वंशवृक्ष लिहिण्याची पद्धत जी होती तीच पुरूषप्रधान होती. त्या वंशवृक्षाममध्ये फक्त मुलांचीच नावं लिहीली गेली. मुलींची नाही. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात कायम स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आपल्याला ही नावं इतिहासात सहज मिळत नाहीत. महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे क्रांती झाली. त्यामुळे महिलांचं महत्व लोकांना पटलं आणि महिला शिक्षणालादेखील सुरूवात झाली. राजघराण्यातील काही महिलांनी सक्रीय राजकारणात सहभाग घेतला त्यामुळे आपल्याकडे त्यांची नावं उपलब्ध आहेत. आपल्याकडे इतिहास जपून ठेवण्याची पद्धतच नाहीये. जो काही इतिहास लिहिला गेला तो फक्त राजकीयच! राजकीय वगळता इतर गोष्टींचादेखील इतिहास असतो हेच मुळी आपल्या इतिहासकारांना उमगलेलं नाही. अजुनही सगळा जोर हा राजकीय इतिहासावरच आहे. राजघराण्यातल्या असल्यामुळेच आपल्याला फक्त जिजाऊ, छत्रपती ताराराणी, सईबाई, सोयराबाई, येसुबाई आणि इतर महिलांची नोंद मिळते." असं ते म्हणतात. जे एका अर्थी आपल्याला पटतं देखील!

याशिवाय आम्ही ज्येष्ठ इतिहासकार राम पुनियानी यांना देखील याबाबत विचारलं तेव्हा ते म्हणाले की, "आपल्याकडे त्याकाळी पितृसत्ताक संस्कृती असल्याने इतिहासात राजघराण्यातील महिला सोडल्या तर इतर महिलांची नावं आढळत नाहीत. अहिल्याबाई होळकर, रजिया सुलतान अशा काही महिलांची अपवादात्मक कारकिर्द आपल्याला पाहायला मिळते. यापुढे जर आपण शोधायला निघालो तर आपल्याला तसे संदर्भ मिळतीलही पण शोधलं पाहिजे." असं ते म्हणाले.

एकंदरीत काय तर पुरूषी मानसिकता असलेल्या काळात महिलांनीदेखील कर्तृत्व गाजवलं आहे. ज्यांनी तलवार हाती घेतली त्यांनीही आणि ज्यांनी तलवार हाती घेतली नाही त्यांनीही....पण लिहिणाऱ्यांनी त्यांची दखल कधीच घेतली नाही. म्हणून तर औरंगजेबासारखा पातशहा ज्या छत्रपती ताराराणीच्या कार्यकाळात मरण पावला त्या स्वराज्यसौदामिनीच्या जन्मदात्रीची दखल नक्कीच घेतली गेली असती. येसाजी कंक, संताजी घोरपडे, नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर अशा अनेक योद्ध्यांची नावं घेता येतील ज्यांच्या पुढील पिढ्यांनी देखील स्वराज्यासाठी आपली देह झिजवली. पण त्यांना जन्माला घालणाऱ्या मातांची, त्यांच्यासोबत कायम उभ्या राहणाऱ्या आणि त्यांना निर्धास्तपणे रणांगणांवर पाठवणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनींची दखल आपण घ्यायला विसरलो आहोत जी येत्या काळात घेऊ शकतो. फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे.

Updated : 23 May 2022 2:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top