तृतीपंथ्यांना राजकारणात जागा मिळाली समाजात कधी मिळणार
X
निवडणुका लागल्यानंतर तृतीयपंथीयांची संभाव्य व्होटबॅंक कॅश करण्यासाठी राजकारणामध्ये त्यांना सोयीस्कररित्या घेण्यात आलं, निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर या सगळ्यांना आपापल्या पक्षात मिळणाऱ्या वागणुकीबद्दल लिहणं हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे..
तर आजचा विषय वेगळा आहे.
राजकारणाची दारं खुली केलेल्या ट्रान्सजेंडर्ससाठी आज मुंबईतल्या कोणत्याही सोसायट्यांमध्ये सहज प्रवेश मिळत नाही. ते तसलेच हाच दृष्टीकोन अनेकांच्या मनात आहे. सेक्शुअल अॅक्टीव्हीटी करणार,आमच्या इथलं वातावरण खराब करणार म्हणून सोसायट्यामध्ये साधी भाड्याने घरंही यांना नाकारली जातात. काल म्हाडाशी यासंदर्भात बोलले तर त्यांनी लॉटरीमध्ये आमच्याकडे त्यांच्यासाठी विेषेश जागा नाहीत असं स्पष्ट केलं. तेच कशाला कोणत्याही गृहयोजनेमध्ये तृतीयपंथींयाचा विचार करण्यात आलेला नाही. कागदोपत्री अनेक गोष्टी करण्यात आल्या असल्या तरीही प्रत्यक्षात मात्र ते नकोत..
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेली प्रिया पाटीलने काही महिन्यांपूर्वी वसईच्या नायगाव येथे भाड्याने घरं घेतलं. दोन्ही वेळा घर बदलताना तिला तुच्छतेची वागणूक देण्यात आली. प्रिया म्हणाली, मी कशी राहते. समाजात कशी वावरते, माझं सार्वजनिक वैयक्तिक पातळीवरचं वागणं कसं आहे हे समजून घेण्याआधीच मी इथे नकोच यासाठी उद्योग सुरु झालेत..मग मुंबईत ठराविक जातीधर्माचीच माणसं एकत्र राहण्यासाठी काही विकासक ऑफर्स देतात, तिथे इतर कुणाला प्रवेश दिला जात नाही, आम्ही एकत्र कॉलनी बांधू म्हणालो तर समाजाचे धाबे दणाणतात..अनेकांना रात्री अपरात्री घरातून सामानासकट बाहेर फेकून दिलं जातं..आज अनेक तृतीयपंथीय शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभे आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना यायचं आहे, स्वतःच घर असावं, असंही मनापासून त्यांना वाटतं..या सगळ्यांबद्दल कायम द्वेष, गैरसमज, ते नकोच हा दृष्टीकोन कधीपर्यंत मनात ठेवणार..आम्ही कायम झोपडपट्टीतच राहायचं, भीकच मागायची, हे त्यांचे प्रश्न रास्त आहेत....ते बदलले आहेत. बदलतायत आपण केव्हा बदलणार...? #तेसुद्धाआपलेच
(शर्मिला कलगुटकर या लेखिका आहे. त्या समाजातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर लिहित असतात)