स्त्रीचं स्त्रीत्व ठरवणारे तुम्ही कोण!
X
वांझ बाईला स्त्रीत्व नसत अस एक नादान इसम बोलून गेलाय. स्त्रियांचा जन्म फक्त पोर काढायला झालेला आहे का ? बलवान,सशक्त संतती निर्माण करण्याचा कारखाना आहे कि काय ? पुरुषसत्ताक समाजामध्ये आणि अश्या बुरसटलेल्या मानसिकतेमध्ये असल्याच गोष्टी सुचणार.
मुळात स्त्रियांचं स्त्रीत्व ठरवण्याचा अधिकार हा फक्त स्त्रियांचा आहे त्यामध्ये पुरुषांचा काहीही संबंध नाही.वैद्यकीय दृष्ट्या मुल जन्माला घालू न शकणारी स्त्री सक्षम असेल आणि तिच्या जोडीदारामध्ये जर क्षमता नसेल तरीही वांझ ठरवल जात ते फक्त स्त्रीला कारण आपली पुरुषसत्ताक मानसिकता तशी आहे.
हा प्रश्न खरतर प्रत्येक स्त्रीने विचारायला हवाय कि आमच स्त्रीत्व ठरवण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी ?
समाजामध्ये अश्या अनेक कर्तुत्ववान स्त्रियांची उदाहरण आहेत ज्यांनी स्वतः मुलांना जन्म न देता संपूर्ण घराला कुटुंबाला शिक्षण दिल,शिकवलं आणि प्रगतीच्या वाटेवर नेल.त्या स्त्रियांना त्यांच्या कुटुंबात त्यांच्या कर्तबगारीवर सन्मानाचं स्थान मिळवलेल आहे.त्यांच्या प्रगतीला त्याच निपुत्रिक असण कुठेही आडव आलेल नाही.
एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जन्माला आल्यावर आपल आयुष्य जगण्याचा आणि त्यातून आयुष्याचा आनंद घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.लग्न करा , मुलांना जन्म द्या आणि त्यांच पालनपोषण करा हेच स्त्रियांच्या आयुष्याच इतिकर्तव्य आहे अस समजणे आणि त्याच पद्धतीने विचार करणे हा स्त्री आणि पुरुष दोन्हींचा पराभव आहे.
निपुत्रिक असणे हा निव्वळ योगायोग आहे ज्यामध्ये अनेक वैद्यकीय गुंतागुंती आहेत ज्याच्या त्या व्यक्तीच्या जन्माशी अथवा पापपुण्य ,धर्म या असल्या भंपक बाबींचा काहीही संबंध नाही.
त्यात अश्या गोष्टीची सांगड राजकारणाशी घालणे हा निव्वळ मूर्खपणा आहे.तुम्हाला काय वाद घालायचे आहेत ते खुशाल घाला, भांडा पण स्त्रियांचा काहीही संबंध नसताना कशाला वादात ओढता ?
“ बांगड्या भरा “ असे शब्द वापरणे, बांगड्या पाठवणे, स्त्रियांना अश्यातऱ्हेने “ वांझ “ म्हणून हिणवणे हा सगळ्या स्त्रियांचा अपमान आहे आणि त्याचवेळी ज्या माउलीने आपल्याला जन्म दिला तिचाही अपमानच आहे.
अशी माणसे समाजाला गुरुस्थानी असतील किंवा अश्या माणसांना समाज आदर्श मानणार असेल तर त्या समाजाचा ऱ्हास कुणीही थांबवू शकत नाही आणि अश्या समाजाला खड्ड्यात घालायला कुठल्याही शत्रूची गरज नाही.
-आनंद शितोळे