धक्कादायक बसचा प्रवास !अरुणाच्या मुसाफिरीतून ,भाग-8
X
दुसऱ्या दिवशी सकाळी माझा पुढचा प्रवास सुरु झाला.रमेश सकट 3मुलं मला सोडायला आली होती.पहिल्या 2 बसेस सुपर एक्सप्रेस असल्यामुळे त्या थांबल्या नाहीतच.मग आम्ही तिथून जवळच असलेल्या टपरीवजा हॉटेल मध्ये गेलो. आम्ही सर्वांनी आलू बोंडा आणि गरम जिलबी खाल्ली. मस्त अद्रक चा चहा पिऊन गाडीची वाट बघायला सज्ज झाले.एक ऑर्डनरी बस थांबली. ती औरंगाबादलाच जात होती.तिथवर या बसने निघून जाण्याचा निर्णय मी लगेच घेतला.आणि त्या बस मध्ये चढले.औरंगाबादला बसमधून उतरल्यावर मला लगेच पंढरपूर बस दिसली.त्या बस मध्ये चढण्याची इच्छा झाली.एक बस तर चक्क नागपूरची लागलेली होती.क्षणभर नागपूर बस मध्ये बसण्याचा मोह झाला.पण तो आवरला. कारण अजून पूर्ण मन भरले नव्हते आणि अजून 1450 रु शिल्लक होते.अजून बरच फिरता येऊ शकत होत.शिवाय ते अगदीच धूसर वाटून गेलं. पंढरपूर व्हाया सोलापूर असं कंडकटर ओरडला.आता सकाळचे साडे दहा वाजायला आले होते.मी त्याला विचारलं, ही बस पंढरपूरला किती वाजता पोचेल?"
"रात्री 9 वाजता.तुम्हाला कुठे जायचे आहे?"
"सोलापूरला किती वाजता पोचेल?"
"अहो तुम्हाला कुठे जायचे आहे ते सांगा ना बाई.उगाच माझं डोकं नका खाऊ."
"बर, तुम्ही आधी सर्वांच्या तिकीट कापा,मग सांगते मी मला कुठे जायचे आहे ते."
मी एक चक्रम बाई आहे, अशी त्याने माझ्या बद्दल समजूत करून घेतली आणि मान हलवून पुढे गेला.
मी कंडक्टर शेजारच्या सीट वर बसले.माझी छोटी बॅग वर टाकली.या बस मध्ये बसणारी बहुतांश पुरुष मंडळी,जी साठी च्या पुढे होती त्या साऱ्यांनी डोक्याला फेटे बांधले होते.उंच म्हणजे पोटऱ्यांपर्यंत वर असं धोतर आणि स्त्रियांनी डार्क कलरची लुगडी नेसली होती. याचं रहस्य काही मला कळेना.आमच्या बस मध्ये काही शाळेची मुले मुली पण होते.स्वतःच्या गावातून 15/20कि. मी.च्या अंतरावर ते बस ने शाळेत जात होते.काही विद्यार्थी तर अतिशय गरीब घरातील आहेत, हे त्यांच्या कपड्यांवरूनही लक्षात येत होते.मला त्यांच्या आईवडिलांच्या शिक्षणाप्रती असलेल्या महत्वाचं कौतुक वाटलं.तेवढ्यात एक मुलीला एका मुलाने धक्का दिला . ती त्याच्यासोबत तावातावाने भांडायला लागली.आणि बाकी त्याच्यासोबत असलेली मुलं फिदीफिदी हसत होती.त्या मुलीच्या बाजूने मात्र तिची एकही मैत्रीण बोलत नव्हती.मी दोन तीन मिनिट त्यांच्यात काय चालतय, हे पाहिलं आणि मुलं जेव्हा जास्तच तिची हेटाळणी करायला लागली, तेव्हा त्या मुलांना रागावले.आणि तिच्या मैत्रिणींना पण रागावले.मुलांनी आम्ही सहज गम्मत करत होतो, म्हणून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांची चांगलीच शाळा घेतली.एक आजोबा म्हणाले,"रोजचा गोंधळ आहे हा यांचा.शाळेत जात्यात का मैदानात मस्त्या करायला जातात, ते तो हरीच जाणे."
"मग तुम्ही रागावत नाही का?"
"ते आमच्या रागावण्याला काय जुमानतात बाई? तुम्हाला कसे चूप बसले माहिती नाही ,नाहीतर आम्हालाच वेड लावतात।"
तोवर कंडकटर त्यांच्या जागेवर येऊन बसले.मी त्यांना म्हणाले ,"तुम्ही मुलांना रागवत का नाही ते मुलींना धक्का मारतात तरी"
" काय लक्ष द्यायचं बाई, पोराबाळांकडे."
" अहो तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर ही मुलं मुलींची चेष्टा करतात,त्यांना धक्के मारतात ,ती मुलगी एकटी त्या मुलांसोबत भांडते आहे आणि तुम्ही म्हणता,कशाला लक्ष द्यायचं?"
"आता मी माझं काम करू का त्यांच्याकडे पाहू?"
"प्रवाशांनकडे लक्ष ठेवणे हेही तुमचे कामच आहे.आज धक्का दिला, उद्या आणखी काही करतील, चालेल तुम्हाला?"
" बाई, तुम्हाला कुठे जायचे आहे, ते सांगा.उगा त्यांच्या नादी लागू नाका."
"काय रे काय नाव तुझं."
"विजयराजे जाधव"
त्याने दणक्यात नाव सांगितले.त्यावरूनच पाणी कुठे तरी मुरतय,हे लक्षात आलं.
" काय करतात तुझे वडील?"
त्यानी काही उत्तर देण्याच्या आतच ते म्हातारबुवाच म्हणाले," जाऊ द्या बाई विषय नका वाढवू."
"विषय कुठे वाढवते आहे, मी तर फक्त त्याच्या वडिलांबद्दल विचारते आहे.मला पण कळून घ्यायचं आहे, ही असं वागणारी मुलं कुणाची असतात, काय करतात यांचे बाबा .कोणते संस्कार करतात ते मुलांवर की तेही गावभर फिरतातच. कोणत्या शाळेत जातो रे तू?"
दात विचकटत तो माझ्या अगदी समोर आला.
" तुम्हांसनी काय करायच हो बाई. आमच्या मधी तुम्ही काय म्हून पडताय?मी सावित्रीबाई फुले विद्यालयाचा विद्यार्थी आहे.आणि माझ्या पप्पा ला नाही हा काही म्हणायचं.तुम्ही आपलं काम करा ना."
मोठयांशी असं बोलतात काय रे? आधी त्या मुलीची माफी माग."
" तिची आणि मी माफी मागणार?चल हट".त्यानी एका मुलासमोर हात पुढे केला.त्यानी त्याला टाळी दिली.
"तू तिला धक्का दिला, तिच्यावर तुम्ही सगळे हसले,हे चुकीचं नाही काय?"
"ओ बाई दिमाख नका न खाऊ.एक तर आधीच माझ्या रोजच्या जागेवर तुम्ही बसल्यामुळे मला उभं रहावं लागत आहे, वरून तुम्हीच मला शहाणपण शिकवता"
"अच्छा, ही तुझी जागा आहे तर.बरं मी उभी राहते,तू बैस तुझ्या जागेवर.,पण तू तिची माफी माग."
" त्या महारडी ची मी माफी मागायची?काय येड लागलं का तुम्हाला? आणि तुम्हाला का हो तिची एवढी काळजी?कोण व्हा तुम्ही?"
त्याच्या उर्मटपणाचा आता मला खूपच राग आला. नववी, दहावीचा मुलगा तो. वय ते काय आणि आपल्या समकक्ष मुलीला तो जातीवाचक शिवी देतोय.मी माझ्या सीटवरून उठले,त्याला प्रेमाने माझ्या अगदी पुढ्यात उभे केले आणि म्हणाली,"तुला मुलींना धक्के मारण्याची एवढी हौस आहे ना,तर मार मला धक्का.मार."आता अख्खा बसच लक्ष माझ्याकडे गेलं.कुणीही काहीही बोलत नव्हतं.सारे प्रवासी फक्त आमच्याकडे बघून राहिले.ड्रायव्हर त्याचं काम शांतपणे करत होता.पण कंडकटर अस्वस्थ.जणू काय त्याच्यावरच काही संकट आलंय.
"मार ना, मार मला धक्का."
ती मुलगीच म्हणाली, "जाऊ द्या मॅडम, हा विषय वाढवू नका.तो ऐकणार नाही."
मी त्याला धक्का दिला. "मार मला."
"बाई, सांगून ठेवतो, लै समोर जाऊ नका. महागात पडन."
तो हे बोलताच मी त्याच्या कानाखाली वाजवली.
तो एकदम भेलकांडला.कंडक्टर सह खूप सारे प्रवासी एकदम उठून उभेच राहिले.अगदी ते म्हातारंरबुवा सुद्धा.ती मुलगी तर रडायलाच लागली.अगदी थोडा वेळ तो मुलगा गंगारला पण लगेच सावरून बोललाच, " तुझ्या माय ची त, थांब आता तुला दाखवतोच"त्याने खिशातून मोबाईल काढला.कुणाला तरी तावातावात एका बाईने मला नाहक खूप मारल्याचं सांगितलं. त्याने कंडक्टर च्या हातात मोबाईल दिला.बहुधा पलीकडून त्याला खूप शिव्या मिळाल्या आणि काहीतरी ऑर्डर मिळाली.होय साहेब, होय साहेब.कुणीतरी बाई,हो, माहीत नाही, वगैरे शब्द फक्त माझ्या कानावर पडत होते.म्हणजे पुढल्या माणसानं गंभीर दखल घेतली आहे, एवढं मला कळलं.
त्या शिवीमुळे आणि मुलीला छेडल्यामुळे माझं जे रक्त तापलं होत, ते मीच स्वतः हळूहळू शांत केलं. राग नव्हे. मी पर्स मधून पाणी काढलं. ते प्यायले.आणि थोडावेळ डोळे मिटून शांत बसले.तोच कंडक्टर ने फोन ठेवला आणि माझ्यावर ओरडला," घ्या आता, भोगा. चूका तुम्ही केल्या आणि आता भोगाव सगळ्यांना लागणार.त्याने ड्रायवर च्या मागे टिकटिक वाजविली आणि गाडी औरंगाबाद पोलीस स्टेशन ला घ्यायला सांगितली.
सगळ्या प्रवाशांनी गलका केला. खूप आरडाओरडा झाला.सगळे माझ्यावर तुटून पडले. ज्यांना त्याचा रोजचाच त्रास वाटत होता, तेही आता माझ्यावरच ओरडायला लागले. ते म्हातारबाबा तर सारखे म्हणायला लागले," बाई, त्या पोराची माफी मागा आणि विषय संपवा."
"मी आणि या टीचभर पोराची ज्यांनी माझ्यासमोर मुलीला धक्का मारला, तिला डोळा मारला, तिला जातीवाचक शिवी दिली त्याची माफी मागायची."
"बाई तो सभापतीचा भाचा आहे."
"असेना का.तो सोनिया गांधीचा पोरगा असेल, तरी मला फरक पडत नाही."
"बाई, ऐका आमचं. विषय वाढवू नका."मागाहून सुद्धा असेच आवाज यायला लागले.आता तर 'या शहरी बायांना काही काम नसत, उगाच विषयाला फाटे फोडतात, एखाद्या श्रीमंत साहेबाची बायको असेल म्हणून मिजास दाखवून राहिली, पोरांच्या भांडणात आपण पडाच कशाला, एवढं काय केलं होतं, त्या पोरानं, धक्काच त मारला होता पासून त हे पोरगी पण काय कमी आहे का"
इथवर भडिमार झाला.
मी शांत बसून राहिले.माझ्यामुळे इतर प्रवाशांना त्रास झाला,कुणाचं काही अर्जंट काम असू शकेल,या साऱ्या गोष्टी माझ्या लक्षात येत होत्या.पण माझं काही चुकलं, असं मला अजूनही वाटत नव्हतं.आणि कोण तो सभापती आता बघू याच, हा विचार डोक्यात होताच.पोलिसांची मला भीती वाटण्याचं कारणच नव्हतं.पण ती पोरगी खूप घाबरली. ती मला सारखी रिक्वेस्ट करत होती. मी तिला तू घाबरू नकोस, हे सांगत होती.तुला काहीही होणार नाही, मी सगळं बघून घेईल।तुला फक्त त्यांनी तुला धक्का दिला एवढंच सांगायचं आहे."मी हे तिला सांगत नाही, तोच त्या मुलीला खुप जोरात सु लागली.ती घाबरली होती.ती आपली एक मांडीडी दुसऱ्या मांडीवर दाबायला लागली.आणि कम्बर मागे मागे घ्यायला लागली.तिची अडचण माझ्या लक्षात आली. मी गाडी थांबायला सांगितली.कंडकटर तिकडे दुर्लक्ष करायला लागला. झालं ती पोरगी भोकांड पसरून रडायलाच लागली.पोरानं पुन्हा तिची टर उडवण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी त्याला इतर मुलांनी साथ न दिल्यामुळे तो गप्प बसला. कंडकटरला मी दम भरला."अहो ती गाडीत सु करेल ना." हा इशारा लागू पडला.त्याने जरा अंतरावर गाडी थांबवली. ती पोरगी लगेच पळाली.आता सारे आणखीच चिडचीड करायला लागले. मात्र गाडी थांबताच पुरुष उतरायला तयार.त्यांना केव्हाही लागलेलीच असते.मी म्हणाली,"ती गाडीत बसल्याशिवाय कुणाही पुरुषांनी उतरायचं नाही."तो दिवस कदाचित माझा शिव्या खण्याचाच होता.
पोलीस स्टेशनला गाडी येऊन उभी राहिली.मी तर तयारच होते.आता खरी कसोटी माझी आणि त्या सभापतीची तर होतीच, पण पोलिसांची पण होती.पोलीस आता राजकारण्यांचा न्याय करणार की सत्याची बाजू बघणार.आणि मी त्यांना ते कितपत पटवून देणार, हे मला बघायचे होते.लोक तर पार मला खाऊ का गिळू म्हणूनच बघत होते.मुलगी उतरायला तयार नव्हती.तिला कसं तरी कन्व्हीन्स केलं. मी आणि ती उतरल्यावर मग तो मुलगा विजयराजे जाधव उतरला,आणि कंडकटर च्या मागोमाग ते म्हातारंबाबा पण उतरले.बहुदा विजयच्या ओळखीचं कुणीतरी आधीच तिथे येऊन तयार होतं., तो त्यांच्याजवळ जाऊन लगे रडायला लागला. माझ्याकडे बघून हातवारे करू लागला. ,मी तिथे न थांबता त्या मुलीला - सावित्रीला घेऊन सरळ आत गेले.कोण psi ड्युटी वर आहे हे विचारताच एक पोलीस म्हणाला, "अच्छा, त्या बस मधला गोंधळवल्या बाई आपणच का? बसा."
"इथे नाही, मला डायरेक्ट साहेबांसोबतच बोलायचं आहे.'
"अहो बाई, आता इथे नका न गोंधळ घालू.बसा. साहेब सभाप्तीसाहेबांसोबत बसले आहे."
माझ्या लक्षात जे यायचं ते आलं. मी 10मिनिट थांबले आणि सहज उठल्यासारखं करून सरळ उप निरीक्षक जिथे लिहिलं होतं तिथे जाऊन एक्सक्युज मी सर विचारलं.
" येस, बोला"
"सर ,नमस्कार.मी अरुणा सबाने, मला तुमच्याशी बोलायचं आहे.मी त्या बस मध्ये जी घटना घडली, ती."
"अच्छा अच्छा आपण का? चालतय,चालताय,बसा जरा पाच मिनिटं.बोलवतो मी तुम्हाला."
"सर मी 10 मिनिटांपासून बाहेर थांबले आहे."
"चालतय चालतंय, बस की जरा बाहेर.जावा,जावा बस बाहेर."
"साहेब त्या मुलाच्या आगाउपणामुळे 50/60प्रवासी वेठीस धरल्या गेले आहेत. हा विषय लवकर संपवा. काय तुमची कारवाई आहे ती करा.आणि सगळ्यांना मोकळं करा."
"काय घाई आहे बाई. बस की जर." कडक पांढऱ्या कपड्यातला पुरुष बोलला.
ए"एक्सक्युज मी.?"
" मी प्रताप शिंदे, सभापती.राष्ट्रवादी चा"
" व्हेरी गुड"
सर, ती मुलगी बाहेर बसलेली आहे.तिला बोलावते,तुम्हाला काय चौकशी करायची आहे ती करा.
पुढे बाईंवर काय प्रसंग ओढवला असेल, वाचा उद्या अरुणाच्या भ्रमंतीतून...