पोलिसांच्या छळाविरोधात 2 बहिणींचा संघर्ष, न्यायासाठी लढा
X
यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातून तीन मुली घरातून बेपत्ता होतात…. त्यांचे पालक पोलीस स्टेशनला जातात…. पोलीस जेव्हा त्यांची चौकशी करतात, तेव्हा त्यांना एका तरुणाचा धागा सापडतो…. पोलीस त्या तरुणाला ताब्यात घेतात… त्या तरुणाला बेपत्ता झालेल्या मुली कुठे आहे याची माहिती असते… तो त्यांना त्या पत्त्यावरील घरी घेऊन जातो.… त्या घरात 6 मुली असतात.. त्यातील 3 तरुणी घराच्या मालक असतात, तर 3 मुली ज्या बेपत्ता झालेल्या आहेत.. .यानंतर घरमालक असलेल्या दोन तरुणींवर पोलीस सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप ठेवतात. त्या दोघींना पोलीस स्टेशनमध्ये आणून खूप मारझोड केली जाते. त्यानंतर या दोन्ही तरुणींना मध्यरात्री पायीच घरी पाठवलं जातं…. हे करता कायद्याची जी काही मार्गदर्शक तत्व आहेत ती सर्व धाब्यावर बसवली जातात… संपूर्ण परिसरात मुली सेक्स रॅकेट चालवतात असा आरडा ओरड करताना पोलीस याबाबत खातरजमाही करत नाहीत… पण या प्रकरणातील तथ्य हे याच्यापेक्षा वेगळं आहे…. या संपूर्ण प्रकरणात जी मानहानी झाली… खोटेनाटे आरोप झाले… पोलीस ठाण्यात विनाकारण मारहाण झाली… या अन्यायाबद्दल आता त्या दोन तरुणींना न्याय हवा आहे… त्या तरुणींनी दिलेल्या माहितीवरून आणि मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण वेगळंच आहे.
सीमा (बदललेले नाव) रमा (बदललेले नाव) व छाया (बदललेले नाव) या तिघी बहिणी वणीतील पंचशील नगरमध्ये राहतात. आई-वडील काही वर्षांपूर्वी वारल्याने घरी त्या तिघीच राहतात. घराच्या काही खोल्या भाड्याने देऊन त्या आपला उदरनिर्वाह चालवतात. शनिवारी 11 जुलै रोजी एक तरुण संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास तीन मुलींना घेऊन सीमा, रमाच्या घरी आला. त्याने त्या दोघींना सांगितले की, तो जवळच राहतो आणि या तीन मुली जवळच्याच गावातील असून त्याच्या परिचयाच्या आहेत. या मुली धुणेभांडे करून शिक्षण घेतात. शिक्षणासाठी त्यांना काही दिवस शिक्षणासाठी खोली हवी आहे. आजूबाजूला चौकशी केली असता तुमची खोली भाड्याने द्यायची असल्याचे कळल्याने आम्ही इथे आलोय, असे त्याने सीमा आणि रमाला सांगितले.
सध्या लॉकडाऊन सुरू आहे. रोजगार बंद आहेत, अशावेळी कुणीतरी भाडेकरू स्वत:हून त्यांच्याकडे चालत आले होते. त्यांनी त्या तरुणाकडे चौकशी केली आणि मुलींचे आधार कार्ड मागितले. त्यावर त्या मुलींचे सामान आणि त्यांच्या कागदपत्रांची झेरॉक्स घेऊन येतो तोपर्यंत त्यांना इथेच राहू द्या, अशी विनंती करुन तो तरुण निघून गेला आणि त्या तीन मुली तिथेच थांबल्या.
दरम्यान सीमा आणि रमाने त्या मुलींकडे चौकशी केली असता त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती. त्या मुलींनी सांगितले की, त्या बाहेरगावच्या नसून वणीतील्याच शास्त्रीनगर येथील रहिवाशी आहेत. त्यातील दोन मुली नववीत तर तिसरी आठवीत शिकते. घरी मदत म्हणून धुण्याभांड्याचे काम करतो असेही त्यांनी सांगितले. जो तरुण त्यांना घेऊन आला होता त्यांच्याच वॉर्डात राहतो. तो ड्रायव्हर आहे. घरी आई-वडील भांडतात, मारहाण करतात त्यामुळे आम्ही त्रस्त होतो. त्या तरुणाला याची माहिती होती. तुम्ही घरातून बाहेर निघा मी तुम्हाला पुण्यात चांगली नोकरी लावून देतो असे त्यांनी आम्हाला पूर्वीच सांगितले होते. पुण्याला जाण्यासाठी गाडीचे भाडे म्हणून त्याने 15 हजार रुपये सांगितले. मात्र तेवढे पैसे नसल्याने आम्ही त्याला 5 हजार रुपये एडव्हान्स दिला. उरलेले पैसे नंतर देतो असे सांगितले. घरून पळून जाण्याचा दिवस ठरला. ठरल्याप्रमाणे आम्ही घराबाहेर पडलो. पण ऐऩवेळी लॉकडाऊनमुळे बाहेरगावी जाण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे आम्ही वणीतच काही दिवस राहण्याचे ठरवले व आम्ही इथे आल्याची माहिती मुलींनी सीमा रमाला दिली.
दरम्यान कागदपत्र आणि सामान आणायला गेलेला तरुण 3-4 तासांनी म्हणजे रात्री 9 वाजताच्या दरम्यान परत आला. पण त्याच्यासोबत पोलीस होते. या दरम्यान बाहेर अनेक घडामोडी घडल्या होत्या. एकाचवेळी तीन मुली बेपत्ता झाल्याने मुलींच्या घरी एकच खळबळ उडाली. त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे कळताच पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांनी लगेच तपासाची चक्र फिरवली. त्यांना या प्रकरणात ड्रायव्हर असलेल्या त्यांच्याच वॉर्डातील तरुणाची लिंक आढळून आली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला मुलींबाबत माहिती विचारली असता त्याने त्या तिन्ही मुली पंचशील नगरमध्ये एका घरी असल्याची माहिती दिली. त्यामुळे बेपत्ता मुलींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्या तरुणासोबत पंचशील नगरमध्ये पोहोचले.
पोलिसांनी अचानक घरी येऊन सीमा आणि रमाला शिविगाळ केली. तुम्ही मुली पळवून आणून घरी त्यांच्यामार्फत सेक्स रॅकेट चालवता असा आरोप त्यांनी केला. त्यातील महिला पोलिसाने दोघींना मारहाण करत गाडीत बसवून पोलीस स्टेशनात घेऊन गेले. पोलीस स्टेशनला नेल्यावर त्यांना एका खोलीत नेण्यात आले. तिथे पुन्हा त्या दोघींनाही पोलिसांनी शिविगाळ करत मारहाण केली. तुम्ही सेक्स रॅकेट चालवता हे मान्य करा, अन्यथा तुम्हाला असेच मारणार अशी ही धमकी त्यांना दिल्याचा आरोप सीमा आणि रमाने केला आहे. दोन तासांनी पोलीस पुन्हा खोलीत आले, एका कागदावर त्या दोघींच्या सह्या घेतली आणि त्यांना घरी जाण्यास सांगितले. रात्री 12.30 वाजताच्या सुमारास मुलींना पोलिसांनी गाडीतून न सोडता पायीच घरी पाठवले, असा आरोप त्या दोघींनी केला आहे.
या प्रकरणात पोलिसांच्या एकूणच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात जे नवीन कायदे आहेत आणि सुधारणा केल्या आहेत. त्यात एखाद्या महिलेचे सारखे सारखे फेसबुकचे प्रोफाईल बघणे हा देखील विनयभंग मानला जातो. अशावेळी पोलीसच दोन निराधार तरुणींना संपूर्ण वॉर्डासमोर कोणतीही खातरजमा न करता मानहानीजनक आरोप करतात. त्यांना मारझोड केली जाते. शिविगाळ केली जाते. पावसाळ्याच्या दिवसात मध्यरात्री अंधारात त्यांना गाडीने घरी सोडण्याऐवजी पायीच घरी जायला सांगितलं जातं.
सीमा रमाला पोलीस स्टेशनमध्ये नेले असताना तिथे बरीच खलबते झाली. त्या तरुणाने मुलींकडून जे 5 हजार घेतले होते ते परत करून हे प्रकरण तिथेच मिटवण्यात आले. पण या संपूर्ण प्रकरणात मात्र सीमा आणि रमाला मानहानी सहन करावी लागली. शिविगाळ, मारहाण सहन करावी लागली. त्यामुळे आता तिला न्याय हवा आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? पोलिसांवर कारवाई होणार का?
या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तो तरुण तीन मुलींना पुण्याला कशाला घेऊन जात होता? तो अल्पवयीन मुलींना कोणती नोकरी लावून देणार होता? याप्रकरणातील सत्य बाहेर आल्यानंतरही पोलिसांना त्या तरुणावर कारवाई का केली नाही? त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी पीडित सीमा आणि रमाने केली आहे.
[gallery ids="15231,15230,15229,15228"]