शीरोज, छपाक आणि छपरी मानसिकता...
X
कधी काळी माझ्यासाठी ऍसिड अटॅक म्हणजे पेपरमध्ये कुठेतरी इतर बातमीसारखी येणारी एक बातमी. या हल्ल्यातून होणारी वेदणा आणि त्या विषयामागचं गांभीर्य मी कधीच समजू शकले नाही. मात्र माझ्या मनात असलेलं हे सर्व चित्र अगदी पुसून गेलं जेव्हा मला या ऍसिड अटॅक पीडितांना भेटायची संधी मिळाली. त्यांना समजून घेता आलं. त्यांना जवळून ओळखता आलं. ते ठिकाण होतं शीरोज हँगआऊट.
एप्रिल 2019 मध्ये मी लखनऊ इथे बाईक टूर वर होते. शीरोज बाबत मी आधी थोडंबहुत ऐकलं होतं. आग्रामध्ये हे कुठेतरी असून कधीतरी तिथे नक्की जाऊ. पण म्हणतात ना "अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है". अगदी असाच प्रकार माझ्यासोबत घडला आणि शीरोज हँगआऊट नकळतपणे आमच्या डोळ्यासमोर आलं.
लखनऊमध्ये आम्ही मायावतींनी बनवलेले आंबेडकर उद्यान बघायला गेलो होतो. त्याबद्दल बरंच ऐकलं होतं. पण तिथे गेल्यावर निराशा झाली. अंधार झाला होता. लवकरात लवकर हॉटेलमधून परतून पुरेशी झोप घेऊन सकाळी लखनऊवरून मुजफ्फरपूरला जायचं होतं. आंबेडकर उद्यानातून बाहेर पडलो. बाईक काढायला घेतली आणि तिथे अगदी विरुद्ध दिशेला समोर शीरोज़ हैंगआउट दिसलं.
शीऱोज हँगआऊट हे एक कॅफे आहे. हे कॅफे इतर कॅफेसारखंच असलं तरी ते इतरांपेक्षा वेगळं ठरतं. हे कॅफे ऍसिड अटॅक पीडित मुली चालवतात. इथे एऩ्ट्री केल्याबरोबर तुमचं स्वागत करण्यासाठीही ऍसिड अटॅक पीडिता असेल, ऑर्डर घेणारी ही ऍडिड अटॅक पीडिता असेल व काउंटरवर बील घेणारी पण ऍसिड अटॅक पीडिता असेल.
कॅफेमध्ये एन्ट्री करताच आपले लक्ष वेधून घेते ते तिथे लागलेले ऍसिड अटॅक समस्येवर जनजागृती करणारे छोटे छोटे बोर्ड. तिथला प्रत्येक बोर्ड तिथे असणा-या मुलीसारख्याच इतर पीडित मुलींची कहाणी सांगतो. सोबत ऍसिड अटॅक पीडितांनी त्यांच्या न्याय व हक्कासाठी लढलेल्या लढ्यांची माहिती ही आपल्याला इथे दिसते. त्यांच्या विविध मागण्या त्यांच्या लढ्याला आलेले यश, यासोबत तिथे एक लायब्रेरीही आहे जिथे बसून आपल्याला आपल्या आवडीचे पुस्तक, मॅगझिनही वाचता येऊ शकतं.
कॅफेमध्ये बसताच तिथे ऑर्डर घेण्यासाठी एक ऍसिड अटॅक पीडिता आली. तिला बघून क्षणभर मी स्तब्ध झाले. ऑर्डर देतानाच कळत नकळत विविध निरीक्षणंही सुरू होतं. त्यांच्याकडे करुणा किंवा दयेच्या भावनेने नाही तर त्यांच्यात दिसणा-या जिद्द याकडे माझं सर्व लक्ष होतं. मात्र दुस-याच क्षणात विचार आला आणि स्वतःची कुठेतरी लाजही वाटू लागली. मी स्वतःला जागरूक नागरीक समजत असली तरी आजपर्यंत आपण त्यांच्या समस्येकडे कधी गांभीर्याने बघितलेच नाही याची लाज ही वाटू लागली. जे डोळ्यासमोर आलं ते सरळ ऑर्डर केलं.
थोडा वेळ फक्त कॅफे न्याहाळत होते. एक चक्कर बाजूलाच असलेल्या लायब्रेरीतही मारली. या कॅफेबाबत आजपर्यंत जे काही वाचलं होतं. त्यापेक्षा अधिक खोल आणि सविस्तर तिथे अऩुभव मिळत होता. काही वेळातच ऍसिड अटॅक पीडिता ऑर्डर घेऊन आली. आम्ही शेवटचे ग्राहक असल्याने तिच्यासोबत गप्पा मारत बसले. त्यांनी कॅफेच्या सह संस्थापकांशी भेटही घालून दिली. त्यांच्यासोबतही बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी जी माहिती दिली ती धक्कादायक तर होतीच शिवाय काळीज पिळवटून टाकणारीही होती. समाजातील सर्वच लोकांमध्ये अद्यापही ऍसिड अटॅक पीडितांकडे बघण्याचा दृष्टीकोण त्यात दिसून येत होता. केवळ समाजच नाही तर लोकप्रतिनिधीही या गंभीर प्रश्नाकडे कसे बघतात हे त्यांच्याशी बोलताना कळलं.
शीरोज आठवण्याचं कारण म्हणजे छपाक मुव्ही. तसं बघितलं तर छप्पाक ही स्टोरी काही दीपिका पादुकोनची कहाणी नाही तर ऍसिड अटॅक पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांची आहे. ऍसिड अटॅक नंतर तिने केलेल्या संघर्षाची ही कहाणी आहे. दीपिका व मेहना गुलजारने ऍसिड अटॅक सारखा गंभीर विषय लोकांसमोर मांडला. त्यातून पैसे कमवणे हा हेतू तर आहेच मात्र या विषयाची तीव्रता लोकांना कळावी यासाठी पिक्चरच्या माध्यमातून एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मात्र काहींना केवळ दीपिकामुळे हा विषय लोकांसमोर येऊ नये असे वाटते. ही एक ऍसिड अटॅक सारखीच एक गलिच्छ विचाराची मानसिकता आहे.
मी काही दीपिकाची फॅन नाही आणि नाही मला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायला आवडंत. किंवा तिने जेएऩयू बाबत घेतलेल्या भूमिकेमुळे मला तिच्याबाबत आदर निर्माण झाला आणि मी छपाक बघण्याचा विचार केला, असं ही नाही. माझ्या जोडीदाराला हा सिनेमा बघायचा होता. त्यामुळे मी गेली. सिनेमा उत्कृष्ठ वगैरे आहे असे नाही पण ऍसिड अटॅक पीडितांची वेदणा, त्यांचा लढा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न यातून केला गेला आहे.
मुव्ही बघताना सर्वाधिक आनंद देणारी गोष्ट म्हणजे ज्या ऍसिड अटॅक पीडित मुलींसोबत मी फोटो घेतले त्या मुलींना मुव्हीमध्ये बघण्याचा योग आला. मोबाईलच्या छोट्या स्क्रिनवर येताना थोड्या लाजणा-या मुली सिल्वर स्क्रिनवर मात्र आत्मविश्वासाने वावरताना दिसल्या. अऩेकदा मी मोबाईलवरचे जुने फोटो चाळत असते. मात्र त्यांना मोठ्या पडद्यावर बघणे माझ्यासाठी सरप्राईजिंग होते. केवळ एखाद्या सिनपुरता नाही तर अनेक सिनमध्ये त्या मुलींना मुव्हीमध्ये स्थान देण्यात आलंय. आता त्यांना एक अभिनेत्री म्हणूनही ओळख मिळतये हे माझ्यासाठी आऩंदायी घटना आहे. ऍसिड फेकणारा हिंदू होता की मुस्लिम अशा नसलेल्या वादात मुव्हीला ढकलून तो न बघण्यासाठी आवाहन करणे हा निर्लज्ज पणाचा कळसच आहे.
आपण ऍसिड अटॅक पीडितांना नेहमी बघत नसलो तरी समाजात असलेलं ही नागडं सत्य आपण नाकारू शकत नाही. देशात दरवर्षी सुमारे 300 ऍसिड अटॅकच्या घटना घडतात. कालपरवाच एका तेरा वर्षीय मुलीवर ऍसिड फेकल्याची घटना वाचली. कुणाचं काय वाईट केलं असेल त्या मुलीने? तिच्या खेळण्या बागडण्याच्या वयात तिच्यावर ऍसिड फेकण्याचा विचार कुणाच्या मनात येऊ तरी कसा शकतो?
शीरोज चालवणारी संस्था "छांव फाउंडेशन" याची लक्ष्मी अग्रवालही कधीकाळी भाग होती. ती आजही ऍसिड अटॅक पीडितांच्या हक्कासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करते. #StopAcidAttack या अभियानातून ती ऍसिड अटॅक पीडितांना समाजाच्या मुख्यधारेशी जोडण्याचा प्रयत्न करते. यासोबतच काही इतर संस्थाही कार्यरत आहे.
मुव्हीवर बहिष्कार हा उपाय होऊ शकत नाही. मुव्ही बघितलाच पाहिजे असेही गरजेचे नाही. किंवा मुव्ही बघितल्याने त्यांच्या समस्या सुटेल असे ही नाही. मात्र मुव्हीच्या माध्यमातून नसेल पण इतर मार्गातूनही त्यांच्याशी जुळणे गरजेचे आहे. त्यांच्या वेदणा, त्यांचे दु:ख, त्यांचे लढा समजून घेणे गरजेचे आहे. त्यांना नोकरीची गरज आहे. त्यांना उपचारासाठी पैसे हवे असतात. त्यांच्या अशा अनेक समस्या आपल्याला कळायला हव्यात. त्यांच्याप्रती असलेली आपली संवेदना जागृत असली पाहिजे. एखादी ऍसिड अटॅक पीडिता नोकरी करून सावण्यासाठी धडपडत असेल तर तिच्या जिद्दीला बळ देण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना बळ देण्यापेक्षा अशा घटना भविष्यात कधी होऊच नये यासाठी अशी डोक्यात शिरलेली छपरी ऍसिडीत मानसिकता निघली पाहिजे.
शीरोजमध्ये गप्पा करताना कळलं की ती जागा सरकार त्यांना खाली करायला सांगत आहे. एकीकडे ऍसिड अटॅक पीडितांच्या न्यायीक हक्कासाठी तर दुसरीकडे त्यांना स्वावलंबी बनवणा-या शीरोज वाचवण्यासाठी अशी दुहेरी लढाई त्यांना लढावी लागत आहे. हे सर्व धक्कादायक असलं तरी आपण कधी लखनऊ किंवा आग्र्याला गेला तर एकदा तरी वेळ काढून या कॅफेला नक्की भेट द्या.
- स्नेहल वानखेडे