Home > रिपोर्ट > कोरोनाच्या लढ्यात पिंक आर्मी मैदानात

कोरोनाच्या लढ्यात पिंक आर्मी मैदानात

कोरोनाच्या लढ्यात पिंक आर्मी मैदानात
X

शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके, गरोदर माता स्तनदा माता , आणि किशोरवयीन मुलींना पुरक आहार पुरवणे, आरोग्य तपासणी, लसीकरण संदर्भसेवा, आरोग्य शिक्षण, व पूर्व शालेय शिक्षण इत्यादी नित्याची कामे करत कोरोनाच्या लढ्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी अग्रेसर राहात अंगणवाडी, सेविका अर्थात पिंक आर्मी कोरोनाची लढाई लढत नित्याच्या सेवाही निरंतर देत आहेत.

ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प राबवला जातो. जिल्ह्यात १८५४ अंगणवाड्या कार्यरत असून शून्य ते सहा वयोगटातील १ लाख ३० हजार बालके आणि २१ हजार स्तनदा, गरोदर किशोरवयीन मुलींना सेवा पुरवण्यात येत आहे.

याकाळात सहा महिने ते तीन वर्षापर्यंतची बालके, गरोदर व स्तनदा माता, व ११ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुली यांना महिन्यातील २५ दिवसांसाठी घरपोच आहार पुरविण्यात येत असून अंगणवाडी सेविका गृहभेटी देऊन आहार देत आहेत. ३ ते ६ वर्षे वयोगटातील अंगणवाडीत जाणाऱ्या बालकांना सध्या अंगणवाड्या तात्पुरत्या सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद असल्याने पूरक पोषण आहार १५ जुलै पर्यन्त घरपोच दिला जाणार आहे. याशिवाय पात्र बालकांचे लसीकरण केले जात असून अंगणवाडी सेविका,आशा, ए.एन.एम.यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न दिसून येत आहेत. बालकांची वृध्दी सनियंत्रणा अंतर्गत बालकांची गृह भेटीद्वारे, वजन-उंची मोजमापे, आरोग्य बाबत विचारपूस, कुपोषित बालकांना अतिरिक्त आहार दिल्याचे खातरजमा करणे अशी कामे दैनंदिन पार पाडली जात आहेत

कोरोना लढ्यात अग्रस्थानी

कोरोना संबंधित लोकांमध्ये जनजागृती, रुग्ण आढळून आल्यास त्या क्षेत्रात सर्वेक्षणात सहभाग, लाभार्थ्यांची घरोघर जाऊन विचारपूस आवश्यक तेथे आरोग्य यंत्रणेशी संपर्क करून संबंधितांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यात अंगणवाडी सेविका तत्परतेने काम करतात. कोरोना कालावधीत आरोग्य विभागाच्या जोडीनेच अग्रस्थानी कार्यरत आहेत.

आदिवासी लाभार्थ्यांसाठी संस्थांचे उत्तरदायित्व

महिला व बालविकास विभागामार्फत जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या गटांतील आदिवासी क्षेत्रात गरोदर, स्तनदा माता व सहा वर्षांपर्यंत ची बालके असणाऱ्या 1820 आदिवासी कुटुंबांना 4.5 टन अन्न ( जे शिजवल्यानंतर 22.5 टन), 7.2 टन तेल डाळी मसाले इत्यादी जीवनावश्यक वस्तू 720 कुटुंबियांना वाटप करण्यात आले. याचा आदिवासी क्षेत्रात बालकांबरोबर याच कुटुंबीयांना सुद्धा प्रत्यक्ष लाभ झाला. यात सुद्धा कुटुंब निश्चिती साहित्य वितरण यात अंगणवाडी सेविका हिरीरीने सहभागी झाल्या. शासनाकडून प्राप्त घरपोच आहाराबरोबरच अशा अशासकीय संस्थांकडून मिळालेल्या मदती या अमुल्य असून कुपोषणाच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक गोष्टी दरम्यानच्या कालखंडात दिसून येत असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी( महिला व बाल विकास) संतोष भोसले यांनी सांगितले.

पूर्व शालेय शिक्षणात डिजिटल तंत्राचा वापर

ठाणे जिल्ह्यात पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत डिजिटल साधनांच्या वापरा द्वारे पूर्व शालेय शिक्षण देण्याचा अभिनव प्रयोग करण्यात येत असून पालक प्रेरणा उपक्रमाअंतर्गत पालकांचे व्हाट्सअप ग्रुप पूर्ण जिल्हाभर करण्यात आलेले असून 'प्रथम' या एनजीओ च्या सहाय्याने नियमितपणे वेळापत्रकानुसार घटकनिहाय व क्षेत्रनिहाय कृती पालकांपर्यंत पोहोचवल्या जातात व त्याद्वारे पालक कृती करून घेतात. साध्या प्रकारचा फोन असलेल्या पालकांना एसएमएस द्वारे कृती पाठविण्यात येतात. यात पालकांचा सहभाग व प्रतिसाद उत्कृष्ट प्रकारचा आहे.

मोबाईलच्या माध्यमातून अहवाल सादरीकरण

अशा सर्व आघाड्यांवर कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी ताई आपल्या कामगारांचे अहवाल नियमित CAS द्वारे मोबाईल वरून सादर करतात व त्यांच्या प्रत्येक कामकाजाची नोंद होते. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग संतोष भोसले यांनी सांगितले.

कुपोषण निर्मूलन ना बरोबरच सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडणे एक सक्षम, चतुरस्त्र, कुशल, समाजाशी घट्ट नाळ जोडलेले अतिशय कर्तृत्ववान मनुष्यबळ महिला व बालविकासाची शक्ती असून कोणत्याही परिस्थितीत न डगमगता काम करण्याची वृत्ती अंगणवाडी सेविका, मदतनीस पर्यवेक्षिका यांच्यात दिसून येते.

Updated : 22 May 2020 8:28 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top