पडद्यामागची कोरोना योद्धा...
सुमन यांच्या सारखे अनेक जण आपलं दुःख बाजूला ठेवून कोरोनाविरोधात खंबीरपणे उभा आहेत,पण त्याचं कधी कौतुक होतं ना कधी त्यांची चर्चा होते.
X
गेल्यावर्षी लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हा अनेक पाऊलं रस्त्यारून पायी चालत आपल्या गावाकडे जात असल्याचे चित्र देशभरात पाहायला मिळाले. मात्र जेव्हा लोकांना आपलं घर जवळ करावं वाटत होतं, तेव्हा शासकीय रुग्णालयात काम करणारी एक सफाई कामगार महिला आपलं घर सोडून रोज 10 किलोमीटरचा पायी प्रवास करून कोरोना काळात कर्तव्य बजावत होती.
औरंगाबादच्या बिडकीन शासकीय रुग्णालयात सफाई कामगार म्हणून सुमन मोघे ह्या गेल्या पाच वर्षांपासून काम करतात. कामाच्या ठिकाणापासून त्यांच्या घराचं अंतर पाच किलोमीटर लांब आहे. मात्र जाण्या - येण्याची कोणतेही सोय नसल्याने त्यांना रोज 10 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो.
कोरोनाच्या आधी रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकीस्वार यांना मदत मागून एखांद्यावेळची जाण्याची सोय होऊन जायची. मात्र आता शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या ह्या महिलेला कोरोनाच्या भीतीने लोकं गाडीवर बसवायला सुद्धा घाबरतायत.
पण याचं आपल्याला कधीच दुःख वाटलं नसल्याचं सुमन अभिमानाने सांगतात. कारण आज मी जे काम करतेय त्याचा मला अभिमान असून, सफाई कामगार का होईना पण कोरोनाच्या संकटात देशासाठी काही तरी करण्याची संधी मला मिळत असल्याचा आंनद असल्याचंही सुमन म्हणतात.
पायी यावं लागत असल्याने वेळ जास्त लागतो म्हणून घरून सकाळी 7 वाजताच निघावं लागते, पण याचं कधी दुःख वाटत नाही. आज मला जी सेवा करायला मिळत आहे त्याचा अभिमान वाटत असल्याचं सुमन म्हणतात.
सुमन यांच्या सारखे अनेक जण आपलं दुःख बाजूला ठेवून कोरोनाविरोधात खंबीरपणे उभा आहेत,पण त्याचं कधी कौतुक होतं ना कधी त्यांची चर्चा होते. मात्र तरीही ते निस्वार्थपणे आपली सेवा बजावत आहेत.