Home > Max Woman Blog > अनामिकासाठी श्वासदान करणारी मृत्यूच्या उंबरठयावरची स्त्री.. सुझन हॉलर्टस

अनामिकासाठी श्वासदान करणारी मृत्यूच्या उंबरठयावरची स्त्री.. सुझन हॉलर्टस

अनामिकासाठी श्वासदान करणारी मृत्यूच्या उंबरठयावरची स्त्री.. सुझन हॉलर्टस
X

सोबतच्या तसबिरीमधल्या बाई म्हटल्या तर साधारण वृद्धा आहेत आणि म्हटलं तर एक असाधारण महिला आहेत..

बेल्जियमच्या या असामान्य स्त्रीचं नाव सुझन हॉलर्टस.

करोना व्हायरसनं यांचा बळी घेतला तेंव्हा त्या नव्वद वर्षांच्या होत्या. त्यांना २० मार्च रोजी इस्पितळात दाखल केलं तेंव्हा त्यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली होती. त्यांना आराम पडावा म्हणून डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर काल पहाटेच्या सुमारास त्यांना कृत्रिम श्वसन प्रणालीवर ठेवण्याचं ठरलं.

आपल्याला व्हेंटीलेटरवर ठेवलं जाणार हे लक्षात येताच त्यांनी आपल्या मनातला निर्धार बोलून दाखवला. त्यांचं मत ऐकताच ड्युटीवरील डॉक्टरांच्या अश्रूंचा बांध फुटला, मेट्रन नर्स आपल्या भावना रोखू शकल्या नाहीत. सुझन मात्र शांत संयत होत्या, एक आगळी प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर होती.

त्या नंतर अवघ्या काही तासात काल त्यांचं प्राणोत्क्रमण झालं...

त्यांनी डॉक्टरांना काय सांगितलं होतं हे ऐकताच तुम्ही देखील भारावून जाल !

आपल्या अखेरच्या काळात सुझननी डॉक्टरांना विनंती केलेली, "कृपया मला व्हेंटीलेटर लावू नका. त्याची सध्या किती कमतरता आहे ते मला ठाऊक आहे. माझ्याऐवजी एखाद्या तरुणाला व्हेंटीलेटर लावा. त्याचा त्याला उपयोग होईल! माझं वय नव्वद वर्षे आहे. माझं आयुष्य मी पुरेपूर आनंदात जगले आहे, माझ्या आयुष्यावर मी प्रसन्न आहे. आता उरलेले क्षणदेखील मला प्रसन्नतेत घालवायचे आहेत !"

देहदान केलेली माणसं मी पाहिलीत मात्र कुणा अनामिकासाठी आपले श्वासदान करणारी मृत्यूच्या उंबरठयावरची स्त्री सुझनच्या रूपाने दिसली.

त्याग, समर्पण आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या बाबी व्यक्तीच्या आयुष्याचं मोजमाप बदलून टाकतात, उत्तुंगतेवर नेतात !

- समीर गायकवाड

Updated : 1 April 2020 7:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top